गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

हरी हरी हरी गुण गाने लगी

‘’ ए अरे परवा… म्हणजे उशीरचं झाला असता मला पण रस्त्यातच मैथिली भेटली अन् वाचले…’’, तु

‘’ काका काही बोलले का मग? मी सहज

‘’अरे नाही बोलले… वेळेआधी पोचले ना मी घरी‘’ तु आपल्या वेणीतील गजर्‍याच्या फुलांशी खेळत…

दोन क्षण शांत जायचे.. पोकळ पोकळ..पोक्त…फक्त किनार्‍यावरती धडकणार्‍या लाटांचा गाज…

‘’ मला तुला एक विचारयचं आहे’’, पुन्हा तु… यावेळी जरा जास्तच उत्साहात

‘’विचार की त्यात काय…’’

‘’ बघ हं… म्हणजे… नाहीतर नको…पुन्हा कधीतरी ’’, भिडलेले डोळे चोरुन घेत…तु… केवढी विसंगत ना स्वतःशी…गांधारीच्या फुलांसारखी…कान्हुलिशी…भरगच्च…

‘’ बरं नको सांगु ‘’, मी पण मठ्ठ मुलासारखा

‘’ विचारायचं हेच कि, का छळतोस रे मला सतत?’’ फिर्यादीच्या तोर्‍यात तु…आवेगी…उत्साही… अधिक मुखर

‘’ अं? ‘’ प्रश्नार्थक नजरेने मी

‘’हसु नको …पण तु सोबत नसतानाही का जाणवतोस रे सतत…सोबत असल्यासारखा..? अं .. ? व्ही टी वरची प्रचंड गर्दी .. माझ्यासाठी प्रचंड एकांत..पाठीवरची लॅपटॉपची जड सॅक…घामात थबथबणारी मी…..वार्‍याची येणारी कोवळी झुळुक तुचं असतोस ना रे ? मंडईमध्येही भाजीच्या पिशव्या….तुझा विचार आला की एकटीनेच का रे हलक्या होतात ? तिन्हीसांजेलाही तसंचं..आजुबाजुला सगळी कडे फोडण्यांचे वास..काही अगदी अन्नपुर्णेच्या हातचे.. खमंग..काही मात्र तेलकट.. करपुन गेलेले. …अशावेळी देवघरातुन अंगवर येणारा निर्मळ, नितळ धुप तो तुच असतोस का रे रिहर्सल असो वा स्टेज… नाचताना तिहाईतल्या प्रत्येक उतरणीवर शेवटी तुच का रे दिसतो ? मग पैंजन थकुन जातात..पाय मात्र थकत नाहीत..मन नाचत राहतं…मोहुन ..मोहरुन.. ताई म्हणतात आज काल खुपचं छान नाचतेस, मुद्रांमध्ये जिवंतपणा, चैतन्य आलयं…ते चैतन्य वगैरे म्हणतात ते तुच असतोच काय रे वेलीवरची फुलं गोळा करताना, अंगणात, रायांगणात रांगोळी काढताना, डोळ्यात काजळ घालताना, का रे असतोस हजर.. तुझ्याही नकळतं ? माझ्या समोर…? सर्वव्यापी… ? समदर्शी… ? का रे का जाणवतोस… ? का दिसतोस.. ? सतत… सोबत असल्यासारखा… ?’’, शेवटी अगदी गुदमरलेल्या आवाजातच तु… आत्ममग्न, बेभान समोरच्या सागरासारखी…अं हं समुद्रासारखी नाही… कारण त्यालाही एक किनारा आहे, तुला मात्र किनारा नसतो…तु असं बोलायला लागलीस ना की मला काहीच सुचत नाही… निरव शांततेत एकमेकांशी भिडलेले डोळे पापण्या देखील लवु देत नाहीत..पण त्या शांततेला तडा देत…

‘’ चणेवाला…चना लेलो भैय्या… दस रुपय का चना…’’, नेहमीचा चणेवाला, त्याची आक्राळ विक्राळ पांढरी मिशी, घारे करडे डोळे, स्पष्ट ब्रजभाषा... चणे घेतले की तो निघुन गेला.

‘’अरे हो... विसरलेच...परवा आपणं मिरेबद्दल बोलत होतो ना?’’

‘’ हो ना...’’

‘’ मला कालच ऐकावसं वाटत होत खुप, पण काय करणार...आमच्या ताईसाहेबांच्या घरी जाण्याची आज्ञा मातोश्रींकडुन झाली मग काय करता....’’

‘’ बरं मग काय ऐकणार मिरेबद्दल?’’ ‘’ सगळं...म्हणजे तुला जे जे माहित आहे ते ते...’’

‘’अगं तुला काय माहित आहे ते तर सांग आधी म्हणजे त्या अनुरोधाने मला पुढे जाता येईल.’’

‘’ म्हणजे जे भौतीक आहे तेच माहितेय. पण तिच्याविषयी अधिक जाणुन घेण्याची इच्छा आहे. मला एवढंच माहितेय कि..एकमत नसलं तरी विद्वान म्हणणारे सर्व लोक मिरेचा जन्म पंधराव्या शतकाच्या अगदी शेवटी शेवटी झाला असं म्हणतात. पितृमहः दादा राव दादु यांचे चतुर्थ पुत्र रत्नसिंह यांच्या घरी तिचा जन्म झाला. लहाणपणी खेळता खेळता त्या गिरीधरालाच आपला पती म्हणुन स्विकारलं.वयाच्या तेराव्या वर्षी मेवाडच्या राणा संगाचे पुत्र भोजराज यांच्याशी तिचा विवाह झाला. विवाहानंतर मेडातच्या या राजकन्येने मेवाड गाठले खरे पण तिचं खरं प्रेम त्या सावळ्याच्या मुर्तीवरच..ही मुर्ती तिने मेवाडला आपल्या सोबत नेली. त्या सर्वांगसुंदर मनोहराची ती सदैव पुजा बांधायची. मिरेचं वैवाहिक जीवन तसं वैभवाचं सुख समाधानाचं, आनंदाचं विलासाचं. पण दुर्दैव आड आलं की दुर्गती केव्हा घात करील सांगता येत नसतं ना...लग्नानंतर अवघी सात वर्षे पुरी झाली नसतील तोच तिच्या सुखाला तडा गेला. तिच्यावर वैधव्याने झडप घातली. उण्यापुर्‍या विस वर्षाच्या मिरेवरती आकाश कोसळलं. पाठ सोडतं ते दुर्दैव तरी कसलं ?. त्यानंतर चार वर्षांनी पिता रत्नसिंह अन् त्यापाठोपाठ बाबर सोबत झालेल्या लढाईत श्वसुर राणा संगा विरगतीला प्राप्त झाले. नियतीने किती तरी विकृत खेळ मांडला होता. त्या खेळाचं फलीत एवढंच की मीरेचं आयुष्य अगदी होरपळुन निघालं. माहेरी अन् सासरीही जवळचं असं कुणीच उरलं नाही. मिरेने डोळे मिटले अन् ह्रदयस्त श्रीकृष्णाची करुणा भाकली. पायात घुंगरु बांधुन ती त्यासमोर नाचु लागली. मेवाडच्या रस्त्यातुन राजपथातुन ती गोविंदाला आळवु लागली. मेवाडच्या नव्या राजाला मिरेच्या दिराला ही गोष्ट रुचली नाही. त्याने तिचा अनन्वित छळ मांडला. मिरेचे हालहाल केले. पुजेसाठी पाठवलेल्या फुलांच्या टोकरित विषारी सर्प सोडले. विष प्रयोग केले. मेडत्याचे मिरेचे काका अन् चुलत बंधु जयमल यांना मिरेचा हा छळ पहावला नाही. त्यांनी तिला मेडत्याला आणले. माहेरी त्या गोविंदाच्या भजनासाठी अनुकुल वातावरण होतं. मिरेचं प्रभुस्मरण अन् भजन अखंड चालु होतं. मिरेची दैहिक अवस्थेत विदेही अवस्थेला प्राप्त होऊ लागली. व्दैत मावळले. अव्दैताचा साक्षात्कार झाला. पुन्हा एकदा दैव फिरले. जोधपुरच्या मालदेवाने मेडत्याची गादी बळकावली. मिरेच्या वैराग्यात अधिकच भर पडली. आता मन मेडत्यातही रमेना. तिने वृंदावनाची वाट धरली. वृंदावनात रुपगोस्वामींशी तिने खुप काळ धर्मचर्चा केली. वृंदावनात त्या बाकेबिहारीची सेवा केल्यानंतर तिने अखेर व्दारीकेची वाट धरली. दरम्यानच्या काळामध्ये तिच्या चुलत बंधुने जयमलाने पुनश्च मेडत्यावरती विजय मिळवला. आपल्या ताईला तो घरी घेऊन जाण्यासाठी तो व्दारिकेला आला.पण तिचे सारे बंध तुटले होते. षड्उर्मी दग्ध झाल्या होता. तिने बंधुस सांगितले. आता नाही येणे जाणे आता जगेन अन् मरेन ते या व्दारकाधिशासमोरचं. आपल्या माहेरी वा सासरी ती परत कधीच गेली नाही. व्दारीकेच्या द्वारकाधीशाच्या मुर्तीतचं ती विलीन झाली असं सांगतात..बसं मला तर एवढंच माहिती आहे.’’ निश्वास सोडत तु.

 किती तरी वेळ तु अशीच भान हरविल्यासारखी अखंड बोलत होतीस. मी मंत्रमुग्ध होऊन तुझं हे भाषण ऐकत होतो.

‘’ अगं खरचं मला तुझ्याकडुनच मिरा जास्त माहित झाली. माझी जान्हवी फक्त अर्धोदकातील पात्राएवढी... तु मात्र उगमापासुन गंगासागरापर्यंत अखंडपणे प्रवाहित. यापेक्षा अधिक मला माहित नाही. अन् यापेक्षा अधिक काय सांगता येईल मला ?

‘’नाही पण मला मिरा ही तुझ्या कडुनच ऐकायची आहे. अगदी तुला कळली तशी..’’ तुझी विनाकारण आर्जव...

 मग  मी उगीच तोंडाला चाळा म्हणुन बडबड सुरु केली

 ‘’खरं सांगु? मिरा सहजासहजी कळत नाही. किंबहुना मिरा कळुन घेणं हा अज्ञेयापासुनचा ज्ञेयापर्यंतचा, तमातुन तेजाचा लौकिकाकडुन अलौकीकाकडे जाणारा प्रवास आहे. मिराची साध्य अन् साधनातील एकतरलता प्रसन्न करणारी आहे. ज्ञानोत्तर भक्तीची ती भक्तीमंदीराच्या कळसावरती फडफडणारी ध्वजा आहे. ती योगिनी आहे संजिवनी आहे. मिरा या नावाचे, जलराशी, तेजा, श्रेष्ठा, असे अनेक भाषांतील घटीत अघटित अर्थ काढता येतील. मिळतील. पण मिरा या शब्दाचा मला उमगलेला प्रांजळ अर्थ शुध्द समर्पण भाव हाच आहे.’’

‘’ समर्पण भाव?’’

‘’हो शुध्द समर्पण भाव, निर्मळ अंतःकरणाचा परिपाक म्हणजे समर्पण...मिरेच्या कविता भावविश्वाचं वैभव द्विगुणित करणार्‍या आहेत. बघ ना. .. मिरेच्या जिवनाची सुरुवातही अशीच आहे. भग्नाषा, मानवी पराभव, अतृप्ती पण समर्पणानेच ती परमगतीला प्राप्त झाली. मिरेचा प्रवास खडतर असला तरी तिच्यावरती आलेले प्रसंग लोकविलक्षण आहेत असं म्हणणं जरा अधिक होईल. मिरेची प्रेमसाधना ही अद्वितीय, प्रांजळ, निर्भेळ, निशांत, गंभीर, अन् वर्धनीय आहे. ती स्वच्छंद आहे. उन्मुक्त आहे. मिरेच्या काही कविता ह्या शृंगाररसाने भारलेल्या आहेत. मात्र तस असलं तरी तिने शृंगाराचं उन्नयनीकरण केलं आहे असं म्हणण्याचं कारणच संभावत नाही. मधुराभक्तीचे हेच स्वरुप कि ज्यात शृंगाराचा अंगीकभाव पुसला जातो. मिरेचा शृंगार देहीकतेच्या शृंखलांनी बांधलेला नाही. शृंगारातुन प्रसरण पावलेली अरोध प्रणयभावना संयत झाली की ती मधुरा भक्ती दिव्यत्वाला पोचते. तिने देहीक मुल्य जाणले आहे. त्याची नश्वरताही तिच्या कवितेंत ठायी ठायी व्यापुन राहीलेली आहे. अन् हो मिरा तुझ्या सारखीच विद्रोही आहे. ‘’

‘’ विद्रोही अन् मी?’’, जराशा करड्या नजरेनेच तु

‘’ हो बघना, म्हणजे घरी सती जाण्याचा कुलाचार असताना देखील मिरा सती जात नाही. ती स्पष्ट बजावते.गिरीधर गास्यां सती न होत्सां मन मोहियो घननामीअन् मिरेने सती तरी का जावं तिचं भौतिक कुंम्कुम विखरुन गेलं असलं तरी तीने त्या गिरीधराचा आपला पती म्हणुन स्विकार केलेला आहे. ती यावत् चंद्र दिवाकरौ सौभाग्यवती आहे. खरचं सामंतशाही समाजामध्ये मिरा ही पहिली विद्रोही भक्त होती.  मला मिरा किती कळली हे माहित नाही. पण तिला वाचुन कळलं ऐवढचं, की ती भक्तीची अनन्यता आहे. अकंप आहे. स्तब्ध आहे. मुग्ध आहे. निरंजनी आहे. तिच्या रचनांमधील आत्मिक सारतत्व, गुढ आशय, वैषयिक अधिस्वर ललित अभिरुचीपुर्ण शब्दचित्रण आणि भावपुर्ण प्रवाहित्व मोहुन टाकणारे आहे.’’

‘’ ए थांब थांब मिरा शब्दाचा मुळ अर्थ काय? ‘’ तु मध्येच

‘’ सांगितलं ना संस्कृतात मिरा या शब्दाचा अर्थच जलराशी सरोवर...पाण्याला भक्तीचा स्पर्श झाला की पाणी पाणी रहात नाही त्याची परिणिती तीर्थात होते. हो मिरा म्हणजे अशीच तीर्थ स्वरुप आहे. प्रवाहपतीत झालेल्यांनी मिरा हे तीर्थ घ्यावं. अन् आनंदाचे धनी व्हावं. 

            बोलणं असचं अखंडीत चालु रहायचं ना आपलं असल्या विषयांवर..? कनकगोल हळुहळु रत्नाकराच्या कुशीमध्ये शिरला. तिन्हीसांजा झाल्या. ओल्या रेतीत उमटलेल्या आपल्या पाऊलखुणांचा पहिला फोटो आपण याच दिवशी घेतला ना.. ?  

    रात्री जेवणं उरकली. मी झोपाळ्यावरती झोके घेत आपल्या गप्पा आठवतं होतो. वाटलं का बरं तु असं अचानक विचारावं...मिरा तशी मला माहीत होती. पण आज तु शिकवलेली मिरा शब्दांत उतरवावी म्हणुन केलेला हा अल्लड प्रयत्न...

विणेच्या तारांना का हे प्रश्न आताची पडले

काळिज राजकन्येचे हे कोणासाठी रडले ? ।।१।।

 

ही तहान भुक विसरोनी, लागली कुणाच्या भजनी  ?

तो कृष्ण एक चंद्रमा ही मिरा वाटे रजनी ।।२।।

 

झंकारली विणा जेव्हा, शहारला यमुना काठ

ही मिरा नसे अमिरा, ही कृष्ण भक्तीची लाट ।।३।।

 

ही जेव्हा स्मरते कृष्णा, घनव्याकुळ होऊन गाते,

पायींचे पैंजन थकते, मग कृष्णप्रिया ही होते ।।४।।

 

दो नेत्रांनी ही जेव्हा ओवाळी श्रीकृष्णाला,

ही तिचीच ती ना उरते ही जाणिव ना कोणाला ।।५।।

 

जन निंदा करते सारे, कुणी बुद्धीभ्रष्टही म्हणती,

ही मिटते डोळे तेव्हा, मनी कृष्ण कृष्ण ही गणती ।।६।।

 

ओठांस लावते आता, हा अक्षय जहरी प्याला,

मन कान्हा कान्हा म्हणते, ना अंत तिच्या प्रेमाला ।।७।।

 

मग कृष्ण जहरही होतो, त्या वेड्या मिरेसाठी,

ती कृष्ण-कृष्णमय होते, या शतःजन्मांच्या गाठी ।।९।।

 

कविता पुर्ण होते न होतेय तोच..‘’ काय दादासाहेब? कविता करताय ? आम्हांस नाही ऐकवणार ?’’, संकट स्वाती..

‘’ घ्या घ्या ताईसाहेब... तुम्हाला कविता न वाचुन दाखवणे म्हणजे मरीआईला नैवद्य न दाखवता प्रसाद भक्षण करण्यासारखेच कि हो...  ‘’ वडा करुन मी मोकळा...

‘’ हो हो... मी मरिआई अन् तु म्हसोबा.....म्हसोबा कुठला‘’, वाकुल्या दाखवत अन् रागारागात पाय आदळत संकट किचनकडे मार्गस्थ होते. अशावेळी नेमका माझा मोबाईल वाजतो. नक्कीच तुझा मेसेज असणार म्हणुन मी उठतो. मोबाईल उचलतो. अर्ध्या जिन्यात पोचतो तोच ..

‘’ जा जा डॉट आला असेल..... आपल्याला काही कळतं नाही बुवा.. आईला सांगायलाच पाहीजे ’’, कमरेवर हात ठेऊन लटक्या रागाने स्वाती..आपल्या मेसेजींगची शैली पण भारी हा.. मी मनात काहीसा विचार करत बेडवरती पोचतो. मेसेज उघडतो. .

‘’.’’ तु

‘’..’’

‘’ मोठ्याने श्वास घे ना रे....  :-) ’’,तु

‘’ का गं काय झालं? ‘’, मी

‘’ लवकर गॅलरीत जा अन् मोठा श्वास घे’’, तु पुन्हा... ‘’ ओकेहे बघ आलो... आता गॅलरीतचं आहे. घेतला मोकळा श्वास...मोठ्याने ऽ ऽ ऽ ऽ..काय झालं गं..? ’’, मी

‘’ आत्ता छान वाटलं... किती गुदमरल्या सारखं झाल होतं ...... ;-)’’ तुझा रोमॅन्टिक रिप्लाय...

तुला हे असलं सुचतं कुठुन काही कळतं नाही.. रिप्लाय काय करावा हेही कळतं नाही. माझ्याही नकळत हसतो. ही रात्र संपुच नये असं वाटतं.. गार वारा अंगाला झोंबत असतो. पिधानाचा योग ...चंद्राला खळी.अगदी तुझ्या गालावर पडलेल्या खळीसारखी... टिपोर चांदणं मग भरुन रहायचं आपल्या दोघांच्याही मनात...   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा