गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४

।। मिरा के प्रभु गिरीधर नागर ।।


‘‘मिरा म्हणजे काय रे? ’’ किनार्‍याशी धडकणारा तुझा स्वैर सवाल....

तु कधी काय विचारशील हा कधी नियमच नव्हता ना ? आपल्यात ? अं ? भुरभुरत्या वाळुमध्ये अगदी एकतारता तुझी...तुझ्या प्रश्नांची..   मी मात्र खेकड्याच्या तिरकस चालण्याने तयार झालेल्या विथिकेसारखा वाकडा तिकडा..दोलायमान अवस्थेत... 

‘‘मिरा म्हणजे काय?’’

 मिरा..माहित नाही गं.. तुच सांग ना..मी अगदी तिचाच प्रश्न तिच्याकडेच भिरकवलेला..चणे फुटाणे खाऊन झालेल्या कागदी कोनासारखा...त्या मऊशार वाळुमध्ये तीची नाजुक बोटे काही अक्षरे गिरवत होती. निःसंगपणे येणारी लाट ते शब्द अनाहुतपणे पुसुन टाकत होती. 

मला नाही ना रे माहिती म्हणुन तर विचारलं ना तुला ? थोडीशी खट्टु होऊनच तु.

मीच काय गं सापडतो तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर मिळवायला ? मी.

सांगायचं नसेल तर नको सांगु. आई सारखी गुणगुणत असते म्हणुन विचारलं तर, तु मात्र ढुऽम फुगलेल्या बिलाव्यासारखा.  मिरा के प्रभु गिरीधर नागर...मैं तो दासी जनम जनम की .. वगैरे वगैरे तिची भाषा मात्र कळतं नाही. तिन्ही सांज गुणगुणत असते. देव्हार्‍याच्या धुपासोबतच तिच्या अस्पष्ट ओळी कानावर पडतात. छान वाटतं. मी अन् मुग्धा मुग्धपणे त्या ऐकत असतो. 

      हातातील कंकर पाण्याच्या दिशेने भिरकावत ती अशीच बोलतं असते. तीच हे असं स्वच्छंदी बोलणं मला का आवडतं ते माहीत नाही. तिच्या शब्दांत तत्वज्ञान वगैरे नसतं. उपदेशाची भाषा नसते. निखळं बोलणं, तिची बोलण्याची पध्दत, डोळ्यांची लाक्षणिक हालचाल, ओठांची लवलव, अन् प्रत्येक शब्दाभोवती गुंफलेलं, समेभोवती खळखळणारं निखळं हास्य ! बाकी देव कुणाला काय देऊन जातो ते कळतं नाही. तीची अनस्युत बडबड चालु असते.हो पण त्या बडबडीला अनावश्यक, वायफळ वगैरे जुलमी शब्द का लावावे ? काही लोक असेच असतात...अर्थगर्भ !  विवक्षित अर्थाने सांगणं तसं कठीण असलं तरी तिचे शब्द एवढे तलस्पर्शी का हे मला अद्याप न उकललेलं कोडं आहे.

अहो मिस्टर, मी तुमच्याशी बोलतेय !!  तु 

डोळ्यासमोर मोरचेलासारखा सुंदर हात वर खाली झुलताना दिसतो. मी भानावर येतो. एव्हाणा तुझ्या सिध्द झालेल्या कथ्थकातुन जन्माला आलेली एखादी अभिजात मुद्रा अन् डोळ्यांच्या भावपुर्ण विलासातुन साकार झालेल्या नेत्रपल्लवीने मला प्रश्न केलेला असतो.  ‘ काय कुठे हरवलाय ?

‘’ ते आपलं मिरा...’’   मी जरा अडखळतचं.

‘’ हो सांग ना रे... मिरा म्हणजे काय ?’’, अगदी मांजरीच्या पिल्लासारखी मिचमिचल्या डोळ्यांनी पाहणारी... तु ‘’ मी आण्णांना विचारुन सांगु का ?’’

‘’ आण्णांना ?’’                                                                                                                                                        ‘’ ‘’हो ‘’

‘’ का रे ?’’

 ‘’ असंच. म्हणजे मीरा राधा या आम्हाला घराच्या अंगणात तर भेटायच्या. तिन्हीसांजा झाल्या की शुभं करोती व्हायची. घरातील नंदादिप उजळायचा. अंगणात हळु हळु शाळाच भरायची चांदण्यांची......त्या चांदण्यांच्या शुभ्र प्रकाशात आण्णांनी कितीतरी गोष्टी आम्हाला सांगितल्या. श्लोक शिकवले, हार्मोनिअम घेऊन बसले की ते नेहमी गीतरामायण गात असत. त्या जर्मन स्वरांचे नाद अजुनही माझ्या श्रवणांच्या ठायी ताजे आहेत. आण्णा मिरेचं कोई कहीयो रे प्रभु आवन की  हे पद विशेष गायचे.  त्यातुनही, उच निच काही नेणे भगवंत हा मंगलाचरणातला अभंग गाताना मिराबाईसाठी घेतो विष प्याला हे कडवं किती गोड गायचे म्हणुन सांगु? ती अभिषेकी बुवांचीच करणी म्हणावी लागेल. नैमिषारण्यात शौनकादिकांनी जे सुख अनुभवले असेल तेच सुख त्या मंद चांदण्यांच्या प्रकाशात आम्ही अनुभवले. त्या आनंदाला तोड नाही. किती ही मोठे झालो तरी आज ते सुख विकत घेता येणार नाही. मी, प्रेमाताई, मयुरदा, माई, अमृतदा आण्णांभोवती रिंगण करुन बसत असु. शेणाने सारवलेलं अंगण. थंड पडलेल असायचं. पहाटे काढलेल्या रांगोळीवर जाईच्या मंडपातुन फुलांची पखरण व्हायची. गोठ्यातील पयस्विनींच्या गळ्यातील घंटांची निबंद चालणारी मंद किनकिन वातावरणात भरुन जायची. कृष्णकमळाभोवती पराग जसे गोलाकार बसलेले असतात त्याच स्थितीत आम्ही सारे बसायचो. आण्णानी गोष्ट सांगायला सुरुवात केली की सारी मंडळी आमच्या सारखीच आण्णांभोवती  गोल करुन बसायची. .सांगताना आण्णा आम्हाला शब्दांचे अर्थ सांगायचे. द्वंद्व, बहुव्रिहीतील उकल, संधी विग्रह सांगायचे.आण्णांची कथा ही कधी इतिहासात नव्हतीच. त्यांनी आम्हाला कथा सांगितल्याच नाहीत. तर त्या जिवंत केल्या. त्यांनी सांगितलेली कथा ऐकताना अंगी अष्टांगभाव दाटले नाहित अस कधी झालचं नाही. नऊ रसांत भिजलेली ही वाणी म्हणजे अमोघ वक्तृत्वाची जननीच ! मला आठवतं, एकदा अशाच सांजवेळी आण्णांनी मिरा आम्हाला सांगितली होती. पग घुंगरु बांध मिरा नाची रे..मै तो अपने नारायण की हो गई रे हे मिरेचं पद आण्णांनी मयुरला शिकवलं होतं. हे पद संपलं तेव्हा सहज मिरेचा विषय निघाला होता. आण्णांनी त्या रात्री दोन कथा सांगितल्या होत्या एक मिरेची अन् दुसरी आलवार भक्त कोदई.’’ केवढी बडबड करतो राव  मी. 

‘’कोदई ? ही कोण रे ?’’,  तुझा कूंहाकार 

कोदई ही मिरेची पुर्ववर्ती संत आहे. तिच्या नावाबद्दल अनेक प्रवाह आहेत. कदाचित वैजयंती हे तिच नाव असावं. बाकी तिला गोदा असंही ओळखतात. पोक्तपणे सांगता येत नाही पण तिचा काळ मिरेच्या किमान सातशे साडेसातशे वर्षे आधीचा. मिरेचं अन् कोदईचं चरित्र म्हणजे परस्परांना प्रकाशित करणारे दोन बिलोरी आरसेच. कोदई हे तमिळ नाव आहे. कोदई म्हणजे कुसुमांच्या हाराप्रमाणे कमनीय अन सुंदर असणारी !! 

‘’अन् मिरा म्हणजे ?’’

अगं थांब थांब सांगतो ना इतकं उतावळ असु नये गं. पहिली कोदाई तर समजुन घे.

‘’ ठिक आहे. पण आज मी मिरा ऐकल्या शिवाय इथुन अशी उठायची नाहीच, मग भले काहीही होवो’’,  तु तुझ्या नेहमीच्या हट्टीपणात..

‘’बरं, मग कोदई राहु दे मिरा ऐक’’, मी उगीचचं तिच्या मनाचा ठाव घेण्यासाठी.

‘’ नको नको आधी कोदई मग मिरा’’, तु अगदी निखालस..

 बरं..विल्लपत्तुर नावाचं एक खेडं आहे. राष्ट्रकुटांच्या राज्यामध्ये कदाचित राजा दंतीदुर्गाने वसवलेल्या मदुरा जिल्ह्यातील हे छोटसं गावं. विष्णुचित्त नावाचा एक विद्वान ब्राम्हण या नगरीमध्ये रहात होता. एकदा असाच पुजेसाठी फुले तोडायला गेला असता त्या पुष्पवाटीकेत त्याला एक नवजात कन्या दिसली. कुणीतरी अभागी स्त्री त्या अभागी जिवाला वाटीकेमध्ये टाकुन गेली होती. विष्णुचित्तालाही मुलबाळं नव्हतं त्याला मोठा आनंद झाला. ईश्वराने जणु त्याला प्रसाद दिला होता. विष्णुचित्त अन् त्याची भार्या त्या मुलीचं पालन पोषण करु लागले. पुष्पमालांमध्ये गुंडळलेली सापडल्याने नाव ठेवलं कोदई. हळुहळु कोदई मोठी होऊ लागली. व्दारकाधीशाच्या पुजेसाठी बनवलेल्या पुष्पमाला ती आपल्या गळ्यात घालुन फिरतं असे. वडिल विष्णुचित्त तीस रागे भरतं. पण कोदईने गळ्यात घातलेली माळ व्दारकाधिशाच्या गळ्यात घातली तर ती मुर्ती अधिक प्रसन्न दिसु लागायची. विष्णुचित्तास वाटले ईश्वराची अगाध कृपा आहे आपल्यावर ज्याने आपल्याला ही मुलगी दिली. शैशवावस्था संपुन जाणतेपणाकडे कोदई जाऊ लागली. तीचा हा प्रवास ईशभक्तीकडेच जाणारा होता. ती स्वतःस श्रीकृष्णाची सखी मानु लागली. गोपिका मानु लागली. अंतःकरणात कृष्णभक्तीची फुले विकसित झाली होती. देवा तुझी मी दासी ही भावना चिन्मयस्वरुप झाली होती. उपवर होताच  तिने विवाह करण्यास स्पष्टपणे नकार दिला.आपला विवाह पुर्वीच त्या भगवान श्रीकृष्णासोबत झाल्याचे तिने सांगितले. विष्णुचित्ताला मोठी काळजी वाटु लागली. एक दिवशी भल्या पहाटे विष्णुचित्ताला दृष्टांत झाला. तुझी पोर सत्य बोलतं आहे. विष्णुचित्ताला मोठा आनंद झाला. श्रीरंगम क्षेत्री त्याने मोठ्या थाटामाटात अवघ्या जगाला रंगवणार्‍या श्रीरंगासोबत रंगनाथासोबत तिचा विवाह लावुन दिला. कोदई त्या भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीसोबत पत्नी भावनेने राहु लागली. हे दिव्य होते. अव्दितीय होते. अभुतपुर्व होते. आयुष्याच्या वाटेवरती ती कृष्णमय होऊन गेली. असं सांगतात की, भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीतचं ती अंतर्धान पावली. जिवन एक व्रत म्हणुन व्रतस्थपणे ती जगली. ऐहिक जगताच्या क्षुधा, तृषा, मोह, शोक, जन्म आणि मरण या षड्उर्मीं पासुन मुक्त झाली. तिने तिरुधावै म्हणजे श्रीव्रत अन् नाच्चियार तिरमौली अर्थात कोदईचे श्रीसुक्त या आलवार भक्त परंपरेतील मोठ्या सुंदर रचना लिहल्या.

‘’ असं कसं जगता येईल रे ? इतकं आत्ममग्न? खरचं जगता येईल का रे कुणाला ? ‘’, तुझा सहज प्रश्न.. 

‘’ व्रतस्थ जगण्याएवढी दुसरी मजा नाही. ती कलंदरी कुणालाही साध्य होतं नाही. मन अन् बुद्धी दोन्हीही बळकट असाव्या लागतात.’’ 

‘’हो ना ! अन् मिरेचं काय रे ? तिची ही अशीच परिस्थिती असेल काय ?’’

बोलता बोलताच तिचा फोन वाजला.

‘’ बापरे काका.... . ‘’ काका, मी मैथिलीकडे आले आहे. हो निघतेच आहे आता....अर्ध्या तासात पोचते घरी ’’ हुऽऽश करतं तिने फोन ठेवला. 

‘’ चल मी निघते, काका घरी आलेत मी जर अर्ध्या तासात पोचले नाही ना तर........’’

‘’ अगं थांब गं काहीही झालं तरी मी मिरा ऐकवल्याशिवाय तुला सोडणार नाही ‘’, मिश्किलपणात मी.

‘’ अरे बाबा जाऊ दे ना... वेळेवर नाही ना पोचले घरी तर आयुष्यभर मलाच मिरा बनुन रहावं लागेल तुझी... ‘’  मिश्किलपणात काहीही बोलुन जातो ना आपणं... वेड्यासारखे .. ? बालिश ... ? अं .....?    असो, तु गेल्यावर मी तसाच त्या खडकावर बसुन राहिलो. सुर्यबिंब क्षितीजाला टेकले. पक्षी आपापल्या घरट्यांकडे निघाले होते. फस्स ऽऽ फस्स ऽऽ फुत्सारुन लाटा किनार्‍यावर आदळत होत्या. निःसंगपणे ...एकाकी..सुर्यास्त...                

रात्री मी घरी आलो. जेवणं झाली. झोपाळ्यावर आण्णा एकटेच गुणगुणत बसले होते. नाही पुण्याची मोजणी नाही पापाची जाचणी, जिणे गंगौघाचे पाणी हे अभिषेकींनी अजरामर करुन ठेवलेलं पद त्यांच्याभोवती सदै॓व रुंजी घालत असतं. झोपाळ्याच्या पितळी कड्यांवर हात हात नेत .....

‘’ आण्णा, एक विचारु ? ‘’, मी 

‘’ अरे वा !! विचार की ‘’, आण्णा प्रसन्नपणे हसत म्हणाले.

‘’ आण्णा मिरा म्हणजे काय हो ?’’, मी 

‘’ संस्कृतात मिरा म्हणजे उदकराशी, पुष्करीणी..सरोवर..दिर्घिका.. दुसरा अर्थ म्हणजे मीर म्हणजे श्रेष्ठ. मीर या शब्दातुनच मग मिरा हे नाव साकार होतं. कदाचीत मिहीर म्हणजे सुर्य हे मिरा या नावाचं व्युत्पत्ती स्थान असावं. सुर्यासारखी तेजःपुंज असणारी मीरा..का रे पण आज असं अचानक का विचारल ? ‘’

‘’नाही म्हणजे ते जरा मिरेचं पद आठवलं सहज म्हणुन विचारलं ‘’, मी जरा अवघडुनच उत्तर दिलं.

‘’ कोणतं ते ? ‘’, जेष्ठमधाची पुड दुधात टाकत त्यांनी सहज विचारलं. 

मी गडबडतचं म्हटलं ते ...... ...’’ नाही का.... प्यारे दरसन दिज्यो आय, तुमबिन रह्यो न जाय ... मिरा दासीं जनम जनम की पडी तुम्हारे पाय ’’ अगदी योग्य वेळी उत्तर आठवल्यासारखा खुश झालो.

‘’ अरे वा !! छान !  क्यों तरसावो अंतरजामी , आय मिलो किरपाकर स्वामी, मिरा दासी जनम जनम किं पडी तुम्हारे पाय, दिपा, मिरा नेहाची विदग्ध मुर्ती आहे. साधिका आहे. कल्याणकारी तुळशीच्या मंजिरी सारखी ती सुगंधी अन् पवित्र आहे. मिरेच्या भजनातील एक गुढ आहे. संयोग वियोगाने तिला जणु घेरुन टाकलं आहे. तिच्या कृष्णभक्तीच्या अनुरागांच्या भजनांमध्ये तिने मनमोहनासाठी मोत्यांनी चौक भरला, जाई जुईच्या फुलांनी शेज सजावली, पापण्यांची तोरणं बांधली, डोळ्यांची निरंजणे उजळवली. पण अनुरागापेक्षाही मिरेचा विषादयोग काळीज चिरुन टाकणारा आहे. शुन्य करणारा आहे. दग्ध करणारा आहे. निघोट आहे. तिच्या शब्दाशब्दांत प्राणांतिक वेदना आहे. तिचा विरहानुभव अधिक मुखर, अधिक मार्मिक, तलस्पर्शी ह्रदयस्पर्शी, काळजाला भिडणारा आहे.जब बैरीने कबरी पकरी, तंबही मान मरोरी, प्रभुजी लाज रखो तुम मोरीहा भौतिक ताप क्षीण, देहधर्म गौण, पण ह्रदयस्त वेदना निर्मळ, निखळ, जागृत, पवित्र अन् निस्सिम....!’’ आण्णा बोलत होते. मी शांत मनाने ही समुद्राची गाज ऐकत होतो. 

नानांची आण्णांना हाक आली. आण्णा उठले अन् नानांसोबत रायांगणात फिरायला निघुन गेले. आईला प्रेमाताईचा फोन आला. ती तिच्याशी बोलत बसली. ताईचं लग्न झाल्यापासुन रोज याच वेळी आई तिच्याशी बोलत असते. 

मी उठलो. केवड्याचा मत्त सुगंध वार्‍यावरती पसरला होता. माझ्या मनात आण्णांचे शब्द अजुन तराळत होते. डायरी उघडली. पहिला शब्द लिहला मिरा...शांत पाण्यावर तरंग उठावेत असचं झालं.  लिहावसचं वाटेना. मी पुन्हा बाहेर आलो. तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावरती, वृंदावनाला स्पर्श न करता बसलो. तिन्हीसांजा ढळुन गेल्यानंतर एकदा दिवे लागनी झाली की त्यानंतर आई आम्हाला कधी वृंदावनाला स्पर्श करु दिला नव्हता. तिला ते आवडत नाही. मी अंधश्रध्दाळु नाही. पण आईच्या श्रध्देपुढे जाता येत नाही.  मयुरदाच्या खोलीतुन तंबोर्‍याचा स्वर अन् नै रे लगन मोहे लागी चे स्वर कानावर येत होते. आण्णांचा शब्द अन् शब्द बरसणारा मल्हार होता. मी विचार करु लागलो. 

खरंच मिरा ही दंतकथा नव्हे ही खरीखुरी कहानी आहे. जी ऐकताना देहधारी चल सजीवही स्तब्ध व्हावे अन् अचल, जड निर्जिवांनाही चैतन्याचे रोह फुटावे. मिरा ही खरचं विशुध्द प्रेमाचा गाभा आहे. ज्याच्यावरती प्रेम तो मुर्ती स्वरुप, बुतत्याची ना लौकीक साथ ना सोबत...तरीही त्याच्या शिवाय दिवसा चैन नाही, रात्री झोप नाही. मिरा ही अशीच आहे. आत्मसंयमातुनच विरहावस्थेत समर्पणाची अन् त्यागाची भुमीका तयार झालेली. त्या प्रेमाची पराकाष्ठा म्हणजेच तीचा समर्पणभाव. हा समर्पण भावही त्यागध्वरामधुन निर्माण झालेला...कदाचित विरहाच्या अंतिम कक्षेत असं दिव्य समर्पण सिध्द होत असावं. समर्पण भावासाठी एक गोष्ट मात्र आवश्यक ते म्हणजे निखालस, निर्भेळ, अन् शुध्द अंतःकरण कारण चित्त शुध्दते शिवाय त्यागाचा, समर्पणाचा परीपाक घडणे कठीण ! कापट्य भरलेल्या अंतःकरणात समर्पणाची फुले कधी फुलतात काय

मनात कुठुनशी मिरा जागृत झाली. भाववेडी मिरा. आर्त मिरा...मुग्ध मिरा... मुक्त मिरा..उन्मुक्त मिरा... आण्णांच्या झोपाळयाशेजारच्या लेखणमोहिर्‍यातुन लेखणी अन् कागद घेतला. नक्षत्रपतिच्या नितळ प्रकाशात अन् वृंदावनाच्या कट्टयावर मिरेची ही विरहीनी जन्म घेत होती.

विरहातली वेदना, सख्या तुला मी सांगते,

काळजाचं निरुपण, दोन शब्दांत मांडते ।।1।।

 

होत मन वेडपिसं, मेघ मल्हार भंगतो,

भैरवीच्या रे स्वरांनी, ओठी केदार रंगतो ।।2।।

 

हाती हातीचं कंकण, जड होतं बेडीपरी,

विरहाच्या रे ऋतुत, शुध्द श्रावणाच्या सरी ।।3।।

 

डोळ्या डोळ्यांतीलं पानं, होत वेड कुणासाठी,

तुझी आठवं आठवं, भरलित दिठी दिठी ।।4।।

 

नको होतो विखापरी, पानातील गोड घास,

दोन आतुर पाऊले, होता तुझा गोड भास ।।5।।

 

पैल शब्द मुके होती, बोले अबोली विनिता,

राघवाच्या विरहात, खिन्न झाली असे सिता ।।6।।

 

एक विरह उर्मिला, शोभे सौमित्री अंगना,

लक्ष-मनांचा सुवास, तिच्या सोन्याच्या कंगना ।।7।।

 

पायी देहुडा, देहुडा, कुठे गेलासी माधवा,

तुझी मुरली मजसि, ऐकु येईल केधवा ।।8।।

 

ह्रदयातील वेदना, हास्य सुरेख झाकते,

विरहिनी मिरा राणी , तुझी करुणा भाकते ।।9।।

 

लेखणी मोहिर्‍याच्या संदुकीमध्ये ठेऊन मी वर आलो. झालेली कविता घडी घालुन डायरी मध्ये ठेवली. अकरा वाजले होते. डोळ्यांवरती झोप आली होती. झोपताना मोबाईल पाहीला. ओठावरती हासु उमटलं.. अपेक्षेप्रमाणे तुझा मेसेज....

‘’.’’          

‘’..’’   मी

‘’ व्हॉट्स अबाऊट मिरा...?’’, तु

‘’ मी अन् रा.....’’ ओठावर हसु दाबत मी..

‘’ ’’ तु चिडुन..... 

‘’ :-) ‘’ मी  

‘’ उद्या जर नाही सांगितल ना तर बघ...गुड नाईट .....’’, एकदम धमकीच...

‘’गुड नाईट स्वीट ............’’ मी.

‘’ दिपदा लाईट बंद कर आधी ...थांब मी उदया आईलाच सांगणार आहे तुझा मोबाईल काढुन घ्यायला.. ‘’ अंथुरणातुनच धमकी देत स्वाती..    काय करणार बाबा, मी घाबरलो अन् शांतपणे लाईट बंद करुन झोपी गेलो.                                                                       

 

।। रणे कृष्ण बिभत्सु संवाद भुतो रुगितार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै ।।


          ‘’ विवेकाची कमतरता ऐन तारुण्यात स्वाभाविक असते दिपा‘’. होतं असं कधीकधी; या गोष्टी होत राहतात. आणि म्हणुनच मनाशी अगदी रुजवुन घे की, ज्या समाजाने तुला तुझ्या मनासारखं घडु दिलं तो समाज तुझी ती ओळखं पुसुन टाकण्याचा अधिकार तुला कधीही देणार नाही. झाल्या गेल्या गोष्टी या तारुण्यसुलभ स्वतंत्रपणे जगण्यातील उणिवा म्हणुन सोडुन दे. त्या अवखळ पणे जगणार्‍या मनाच्या विद्रोहाच्या क्षणिक ठिणग्या होत्या..आणि हेही तितकच लक्षात ठेव की, वेड अशी चुक करत नाही अन् बुध्दी उन्मादाची इतकी गुलाम कधीच होत नाही. अधिक सरळ वागलास तर अधिक लवकर कापला जाशील. अरे केवळ दयेने दृष्टता, करुणेने क्रौर्य, अहिंसेने हत्या आणि शास्त्राने शस्त्र सर्वकाळी वशीभुत होत नाहीत, नव्हे करताही येत नाहीत. भगवान श्रीकृष्णही अर्जुनास मोहजनित षंढत्व, नपुंसकत्व त्याज्य ठरवुन त्यास तिलांजली देण्यास सांगतात. करुणाव्याप्त ह्रदयामध्ये मुळ स्वभावाचा नाश झाला की धर्माधर्माविषयीं सव्यापसव्य करण्यास बुध्दी असमर्थ होते. अर्जुनाचं ही तसच झालं आहे. कुरुक्षेत्राच्या युध्दभुमीमध्ये युध्दाशेने समोर उपस्थित झालेल्या आप्तेष्टांना मारुन आपणास इहलोक वा परलोक श्रेयस्कर होईल की नाही अशा प्रसंगी युध्द कामना मनात बाळगुन असणार्‍या स्वजनांशी युध्द करावे की न करावे या व्दिधा मनस्थितीतील किंकर्तव्यमुढ झालेल्या,अन् त्या विषिण्णतेमध्ये संन्यास घेण्यास उद्युक्त झालेल्या अर्जुनाला भगवान कर्मत्याग हा केवळ वेडेपणा असुन तो केल्याने स्वर्गप्राप्ती तर दुरच पण उलट त्यामुळे तुझी अपकिर्ती कशी होईल हे स्थुल युक्तीवादाने पटवुन देऊनही त्याचे समाधान होईना त्यावेळी अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे असा उपहास करुनच भगवंताने त्याला कर्मशास्त्राचे निरुपण केले आहे. ‘’ कितीतरी वेळ मी डोळे बंद करुन काळाच्या निर्मळ झर्‍यात वाहून गेलेले गितासंथेच्या पाठातील क्षण जगत होतो. खुप सुंदर स्थान होतं ते. विश्वेश्वराच हिरव्या गर्द वृक्षांनी वेढलेलं मंदिर, स्वरारोहांसह पक्षांच्या कूजनामध्ये समरस झालेली श्रीमद्भगवद्-गितेची कवणे, विशुध्द अंतःकरणांनी संथा देणारे गुरुजन, झाडांच्या डोलीतुन डोकवणारे शुक परंद, जलाशयाकडुन येणार्‍या विथीकांवर अंतरीय वस्त्रांमधुन टिपटिपणार्‍या पाण्यांच्या थेंबांनी जमीनीवरती भिजलेल्या नवथर रेषा, हिरवीगर्द वेळुंची बेटं, त्यातुन घुमणारी वार्‍याची बासरी, लतावेलींनी वृक्षराईंनी हातात हात गुंफुन उभारलेल्या कमानीतुन गेलेला सुंदर रस्ता...रात्री पडणारं निर्मळ टपोर चांदणं, उबेसाठी अंगाला बिलगणारा गार गार वारा, पहाटे उजळलेला शुक्राचा तारा, सुर्य उगवण्याच्या घटकाभर आधी दंवाने भिजलेली प्राजक्ताची ओली फुलं गोमयाने सारवलेल्या अंगणाच्या ओंजळित पडायची...लेकुरवाळी केळी बिचारी हळुच जागी व्हायची. अंगावरच नाही तर मनावरही कधी टिचभर ओरखडा पडत नसायचा. सारा सारा आठवणींचा खेळ, मधाळ, गोड, खट्याळ उनाड अल्लड आठवणी...या आठवणींच खुप लोभस असतात...एखादा सुखद प्रसंग आठवला की ओठांवरच्या हास्यासोबत नकळत डोळ्यात पाणी येत. कुणाला माहीत ? पण डोळ्यांनाही अशा आठवणी जाग्या होताना कदाचित  गहिरवरुन आल्यासारखं होत असावं..      

सहा टोल झाले. दिवस मावळतीकडे झुकला होता. स्वयंपाकात कुकरची शिट्टी तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची ओळख करुन देत होती. कुकर मात्र घामाघुम झाला होता. तिन्हीसांज झाली. पश्चिमेची लाली काळोखात बुडुन गेली. हातपाय धुतले. हातामध्ये कॉफीचा मग घेऊन ओवरीमध्ये येऊन उभा राहीलो. देवघरातुन शुभंकरोतीचा आवाज येत होता. स्वाती चार वर्षाची असेल तेव्हापासुन दररोज शुभंकरोती म्हणते. म्हणजे गेल्याच वर्षी तिचं हे एक तप पुर्ण झालं होतं. मोठं होताना आपण किती छोट्या छोट्या गोष्टी विसरतो ना ? मला तर शुभंकरोतीतील फक्त दीपमंत्रच लक्षात राहीला होता. विस्मरण माणसांना बळकट बनवतं ना ? मनाला हवं तसं त्यांच्या सोईस्कर वागायला शिकवतं. इष्टानिष्टता सोईस्कर रित्या ठरवता येते. मी हातातली कॉफी संपवुन देवघरात गेलो. आईने सुंदर पुजा बांधली होती. मोगरा, शेवंती, मंदार, जास्वंद, कण्हेर, दुर्वा, जाई फुलांच्या सुगंधी गावात देव वस्तीकरुन बसले होते. निरंजनाची प्रभा त्या फुलांवर सांडली होती. धुप अन् चंदनाचा संमिश्र सुवास दरवळत होता. मनात पावित्र्य अन् उत्कटतेचं कोवळ धुकं पडलं  विष्णुसहस्रनामाच्या श्लोकांसहितच सारं सारं मन निर्मळ झर्‍यासारखं झालं. कितीतरी दिवसांतुन देवासमोर हात जोडले होते. त्या बिचार्‍यालाही बरं वाटलं असेल. देवपुजा झाली आई अन् स्वाती स्वयंपाकघरात निघुन गेल्या. मीही माझ्या रुमकडे जायला निघालो. जिन्यातील पायर्‍या पायांखालुन हळु हळु संपत असतानाच आण्णा अन् डॉ. काकांचा आवाज आला. मी खाली आलो. ओवरीतील बैठकीवरती दोघे बसले. स्वातीने लगबगीने पाणी आणुन दिलं. मी सहसा काकांसोबत त्यांच्याविषयी वाटणार्‍या आदरामुळेच कदाचित बोलत नसायचो. त्यांच्या चर्चा अशाच चालु होत्या. आण्णा डॉक्टर काका बोलत बसले की मी त्यांच्या चर्चा ऐकत असे.त्यांच्यातील चर्चा केवळ सामान्य मनुजांचा संवाद नसुन तो भौतिकाचा अध्यात्मवादाशी मांडलेला मोक्षपट असे. केवळबाबा वाक्यम् प्रमाणम्म्हणुन ते दोघेही भाबडेप्रमाणे एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नसत. तर्क, देश, काल, मर्यादा यांचा नैतिक आकृतीबंध ते आपल्या वाद विवादात मांडत. मला त्यांच्या चर्चा ऐकण्याची नेहमीच उत्सुकता असायची. या दोघांमुळेच सोप्यावरती मी दंडकारण्य अनुभवले होते. दंडकारण्यातील सुत अन् शौनकांचा संवाद ऐकला होता.अथातो ब्रम्हजिज्ञासाया अथ पासुन सुरु होणारा वेदान्त तुकोबारायच्या साध्या वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा या इतिन्यासावरती संपलेला मी पाहीला आहे. आजही त्यांची तशीच गुढ चर्चा चालु होती. किचन मधुन आईचा आवाज आला. पाय निरुत्साहानेच किचनकडे वळले..

‘’ काय झालं गं..?’’ मी.                                                                                                                                      

‘’ अरे राजा, चहा घेऊन जा बाहेर..’’                                                                                                             

‘’स्वाती कुठे गेलीए ? तिला सांग..’’

‘’ अरे ती जरा आवरतेय तिचं, श्रावणीकडे जायचयं ना तुम्हाला आळवाच्या वड्या घेऊन स्वाती सांगत होती तिला आवडतात म्हणुन.. तोपर्यंत तु जा चहा घेऊन बाहेर....’’

 

हातात चहाचा ट्रे घेऊन मी बाहेर आलो. सतत घरापासुन बाहेर असल्याने पाहुण्यांसाठी चहा घेऊन जाणे हे काम मला जरा अवघडच वाटलं. त्यांच्यासमोर चहा ठेऊन मी पटकण स्वयंपाक घराकडे वळलो. श्रीमद्बगवत्-गीतेच्या निर्मिती विषयी ते चर्चा करत होते. अर्जुनाच्या बाबतीत समोर उभा राहीलेला सर्वसामान्य पण सामान्य जनांस वाटणारा लोकविलक्षण क्षण. परस्परविरोधी धर्माच्या कैचीमध्ये सापडलेला उन्मेषसुलोचन अर्जुन वेपथुश्च शरिरे मे रोमहर्षश्च जायते म्हणुन शोकसंविग्न मनोवस्थेत भगवान श्रीकृष्णाला उपदेश करु लागला की हे मधुसुदन, आप्तस्नेहींच्या रुधीराने सिंचित झालेल्या अवनीवरती मी सुखाने राज्य कसा करु शकेल ? धर्माचे सुक्ष्म स्वरुप  जाणणार्‍याने कुळाचा अन् कुलधर्माचा नाश होऊ देऊ नये. कारण कुळाचा नाश झाल्याने सनातन असा कुलधर्म नष्ट होऊन पुण्य कर्म अल्पत्वात आल्याने प्रायः पापाचे महत्व वाढते. पापामुळेच कुलस्त्रिया दुषित होऊन वर्णसंकर निर्माण होतात श्राध्द पिंडादी तर्पण क्रिया कापरासारख्या लुप्त होतात. राज्योपभोगासाठी स्वजन द्रोह घडुन त्यांचा नाश करणे त्यातुन कुल, कुलधर्म यांचा नाश अन् त्यायोगे होणारी आचारण भ्रष्टता जी कुलधर्मास अत्यंत विघातक आहे हे सर्व युध्द फलित असल्याने त्रैल्योकाचे अधिपतीत्व जरी बहाल केले गेले तरी मी युध्द करणार नाही.                                                   ‘’ दिपदा, चल पटकण नाहीतर परत यायला उशीर व्हायचा... ’’ अचानक उजवीकडुन आवाज आला, हातात कसलीशी पिशवी घेऊन स्वाती निघायला तयार झाली होती. त्या दोघांची चर्चा अर्धवट सोडुन श्रावणीकडे जाणं भाग होतं. सात सव्वा सातच्या सुमारासशम्यप्राश’  समोर गाडी उभा राहीली. स्वाती पटकन उडी मारुन जिन्याकडे पळाली. मागे ये असं हातांनी खुणावत स्थिर बुबुळांनी पाहणार्‍या पाखरा सारखी पाहु लागली. कदाचित श्रावणीला आश्चर्याचा सुखद धक्का तिला द्यायचा होता. जिन्याच्या पायर्‍यांशीच शब्दाची जुळवाजुळव करुन  स्वाती एकेक पायरी चढत होती. मीही तीच्या मागे नाटकातील कमी महत्वाच्या, केवळ रंगमंचीय गरज भागवणार्‍या पात्रासारखा चालत होतो. पायातील कमी होणार्‍या पायरी सोबत वरुन येणारा आवाज अधिक जवळ येत होता. शेक्स्पीअरच्या हॅम्लेटमधील सुंदर टु बी ओर नॉट टु बी हे स्वगत कानावरती पडत होते. 

To be, or not to be: that is the question:
Whether 'tis nobler in the mind to suffer
The slings and arrows of outrageous fortune,
Or to take arms against a sea of troubles

मी पुढे सरकलो नसतो तर स्वातीने अजागळासारखा सारा प्रवेश मोडुन टाकला असता. मला क्षणभर एल्सिनॉरच्या भक्कम किल्यातील राजवाड्यात आल्यासारखं वाटलं. श्रावणीची नाटकाची रिहर्सल सुरु होती. स्वतः श्रावणी हॅम्लेटची भुमिका साकारत होती. त्यामध्ये व्यत्यय नको म्हणुन मी स्वातीला डोळ्यांनीच दटावलं. जागीच खिळुन राहीलेल्या मुर्ती सारखे उभे राहीलो.  स्वातीलाही श्रावणीच्या हॅम्लेटविषयी जास्त माहित नसावं. ती एकटीच संवाद म्हणत होती. Nymph, in thy orison, be all my sins remembered या शेवटच्या पदासह तीने हलकेच दरवाजाकडे नजर वळवली. ऑफेलियाच्या जागी स्वाती उभी होती. चेहर्‍यावरील कुठलेही हावभाव न बदलता ती स्वातीकडे हॅम्लेटच्या तोर्‍यात आली गुडघ्यांवरती बसुन तिच्या हाताचं चुंबन घेतलं. Be all my sins remembered या आगंतुक ओळीवरती स्वातीनेयुप डीअरही जुजबी प्रतिक्रिया दिली अन् दोघीही खळखळुन हसल्या. श्रावणीचा ज्युलिअस सीझर मी पुर्वी पाहिला होता. एकंदरितच श्रावणीला पुरुषाची भुमिका करायला आवडायची.दया दाखवा अशी प्रार्थना हा ज्युलिअस सीझर कधी करत नाही अन् प्रार्थना केली म्हणुन कधी दया करत नाही कारण मी स्थिर आहे उत्तरेच्या नक्षत्रासारखा .....असख्यं माणसांनी हे जग भरलयं, जी आहेत बनलेली हाडांची रक्तामासांची, पण या माणसांच्या गर्दीत एकच माणुस मला असा ठाऊक आहे. की आसनाला ज्याच्या कधी कुणी ढळ लावु शकत नाही. आणि तो मी आहे. ज्युलिअस सिझर..सेनेट मधील ते ज्युलिअसचं मनोभावन भाषण मी कित्येकवेळा या दोघींकडुन ऐकलं होतं. मला ना हॅम्लेटपेक्षा सिझर अधिक मुखर वाटला. आळवांच्या वड्यांचा डबा तिला पोचता करुन आम्ही दोघे भावंड निघालो. स्वाती मागे बसल्या बसल्या वेड्यासारखी बडबडत होती. अनोळखी जगताचं अनोळखी दुःख..वगैरे वगैरे...  

रात्री जेवणं व्हायला रोजच्या पेक्षा जरा अधिकच उशीर झाला होता. स्वातीचीही परीक्षा संपली होती. झोपण्याआधी तीने हॅम्लेट काढलं होतं. अन् मोठमोठ्याने त्यातील स्वगतं वाचत होती. खरं सांगु का? मला हॅम्लेटची किव आली. त्याचा मुळ स्वभाव हा चिंतनशील अन् तत्वज्ञानाकडे झुकलेला आहे. वास्तविक शेक्सपिअर ने जो जगावं की मरावं हा प्रश्न हॅम्लेटच्या तोंडी घातला आहे. त्याच उत्तरही त्याने ऑफेलियाच्या दफन विधीच्या वेळी दिलं आहे. तरीही केवळ जगावं की मरावं या स्वगताविषयी मी विचार करतो त्यावेळी जाणवतं. की विट्टेनबर्गला हजारो पानांतुन जे तत्वज्ञान हॅम्लेटला मिळालं नाही ते स्वानुभवांतुन मिळालं आहे. किंबहुना श्रीमद्-भगवतगीतेमध्ये अर्जुनाच्या वाट्याला जो प्रसंग आला आहे तोच प्रसंग इथे हॅम्लेटच्या वाट्याला आला आहे. चुलत्याने वडीलांचा खुन करुन गादी बळकावली आहे अन् हॅम्लेटच्या आईशी लग्नही केले. तेव्हा असल्या पापी चुलत्याचा वध करुन बापाच्या ऋणांतुन मुक्त व्हावे की तक्तशीन राजा म्हणुन त्याची गय करावी या मोहात पडुन चिखलात रुतलेल्या राजहंसासारखी तरुण हॅम्लेटच्या मनाची काय अवस्था झाली अन् जगावे की मरावे ही विवंचना तो करु लागला.. मला त्याची ही विवंचना शब्दांच्या स्वाधीन करावीशी वाटली. सहज हातात पेन घेतलं. कल्पना, भावना आणि विचार यांच्या संघर्षातुन होणार्‍या नाट्याचा मोह आता फिका पडु लागला अन् आंग्ल भाषेतील हॅम्लेट जणु माझ्या आरुषी शाईत उतरला. 

काय जगावे ? कां न मरावे

प्रश्न उरे ह्रदयासी 

माधवा सांगना का रे ।। ध्वृ ।।

काय थोरपण असे सहाणे

दैवजात हे दुःख वाहणे

की झुंजावे दैवाशीही

बांधुन प्राक्तन पाठीस सारे

माधवा सांगना का रे ।। 1 ।।

अंत शेवटी निद्रेवाणी

मरण कोवळे काजळपाणी

सरते अवघीं क्लेश कहाणी

श्वासांचे ते तुटतां तारे

माधवा सांगना का रे ।। 2 ।।

जगता जगता मरण रंगणे

मरण सोहळा झोपी जाणे

रडवायला या निद्रेला

अधिर कां स्वप्नांनी व्हावे

माधवा सांगना का रे ।। 3 ।।

स्वप्नावस्था गमता भेसुर

चिरनिद्रेचा भेदुनियां ऊर

साद घालतीं स्पंदन धुसर

या श्वासांनो परत फिरत रे

माधवा सांगना का रे ।। 4 ।।

दुःस्वप्नांना भितो नाहितर

कलह वेदना अवघ्या कातर

न्याय आंधळा प्रेमही बोचर

सुसह्य हे जगण्यासी ना रे

माधवा सांगना का रे ।। 5 ।।

कशास जगणे सखया जिवन

कट्यार रोधी अवघी वणवण

एकच ह्रदयी घाव घालुनी

संथ समाधी घेईल वारे

माधवा सांगना का रे ।। 6 ।।

कशास ओझी अंगावरती

कण्हुण कशाला घर्म आहुती

अवकाशातील तुझ्या मंदिरी

न्याय निवाडा भितीच ना रे

माधवा सांगना का रे ।। 7 ।।

दुर देश तो ज्ञात जगाला

गेलो जो तो कधी न परतला

त्या देशींच्या सुन्न कल्पना

विवश जगाया करतील ना रे

माधवा सांगना का रे ।। 8 ।।

ओळखीचे हे दुःखच बरवे

डोळ्यांमधुनी श्रावण शिरवे

अनोळखी त्या देशामधले

दूःख देखणे नकोच बा रे

माधवा सांगना का रे ।। 9 ।।

उष्णरक्त निर्धार मनातील

विषिन्नतेने मलुल निजतील

अतुल योजना गगणभेदीं जरी

भ्याड विवेके नष्टच ना रे                                

माधवा सांगना का रे ।। 10 ।।

 

कविता पुर्ण तर झाली. मनात मात्र प्रश्नांनी गर्दी केली. खिडकीशी जाऊन मी विचार करत होतो. प्रत्येकाच्याच मनात हे प्रश्न येत असतील ना ? भले अर्जुनावरती आलेली परिस्थिती वेगळी अन् हॅम्लेटवरती कोसळलेली वेगळी. अशा प्रश्नांचं वादळ मोहाच्या प्राकारावरती येतच. काळ, प्रसंग, परस्थिती, व्यक्ती भिन्न असतात. जेव्हा परस्पर विरोधी धर्म समोरासमोर उभे राहतात. प्रेय अन् श्रेय यामध्ये विवक्षित अर्थाने निवड करता येत नाही. धर्माचे सुक्ष्म रुप दृष्टी गोचर होत नाही. त्यावेळी धीरगंभीर बुध्दीचा श्रेष्ठ मनुष्य श्रेयाची निवड करतो. वास्तविक हॅम्लेटवरती गुदरलेला प्रसंग लोकविलक्षण आहे का ? की त्याचा प्रश्न नवीन आहे ? निश्चितच दोन्हीही नाही. शोचनीय विवंचनेत त्याने जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते अनादी कालापासुन निर्माण झालेले आहेतच. अर्जुन अन् हॅम्लेटचेही प्रश्न भौतिकवादात गुंतलेले नाहित. वास्तविक या दोघांनाही पडलेला प्रश्न हा विवंचनेतुन शोचनीय अवस्थेतुन निर्माण झालेला आहे. विषादातुन निर्माण झालेला आहे. किंबहुना अशाच प्रकारचे प्रश्न केनोपनिषद अन् श्वेताश्वतरोपनिषदात मिळतात. श्वेताश्वतरोपनिषदाच्या प्रारंभिच  किं कारणं ब्रह्म कुतःस्म जाता जीवाम केन क्व च संप्रतिष्ठाः । अधिष्ठिताः केन सुखतरेषु वर्तामहे ब्रह्मविदो व्यवस्थाम् ।। म्हणजे ब्रह्म म्हणजे काय ? कोणापासुन आम्ही उत्पन्न झालो ? कशामुळे जगत आहोत आम्ही ? जिवनाचा मुख्य आधार तरी कोणता ? कुणाचा अधीनतेमध्ये राहुन सुख दुःखादी अवस्था एका निश्चित व्यवस्थेत भोगत आहोत आम्ही ? जन्मापुर्वी अन् मृत्युनंतर त्याचप्रमाणे जिवंतपणी आमची कोणात पुर्णावस्था असते ? कर्माकर्म विवंचनेत अशा प्रश्नांची उगमस्थाने निश्चित असतात. अर्जुनाचे किंवा हॅम्लेटचे विषादावस्थेतील भाषण अन् शंका या निराधार नसुन मोठमोठ्या पंडितांनाही हे प्रश्न पडले आहेत पडत आहेत अन् पडत राहतील सबब कर्म त्यागापेक्षा विचारी पुरुष कर्माचरण करणे पसंत करतो. विषादातुन निर्माण झालेलं गिताशास्त्र म्हणुनच जगतावरती अमृताचे शिंपण करित आहे. दिवसभराच्या गोष्टी मी आठवुन पाहिल्या; ‘ ज्या समाजाने तुला तुझ्या..ही गुरुजींची वाक्यं असोत वा गितोपख्यानातील अर्जुनाचं मोहजनित भाषण, हॅम्लेटचं एल्सिनॉर मधील स्वगत असो वा असो माझ्या सारख्या सामान्य माणसाची काळीज कहानी...सारं सारं एकसारखचं..  पाण्यावरच्या तरंगासारखं... सारी सुख दुःख समान..तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्अस सांगणारा माधव प्रत्येकालाच कर्मयोग सांगायला येईल कसा ? मला तो माधव भेटला; आणि म्हणाला, कधी काळी मोहग्रस्त होऊन अर्जुनासारखा परस्पर विरोधी धर्मात अडकलास अथवा शेक्सपीअरसारखाच जगावं की मरावं हा प्रश्न उपस्थित झाला तर..पळपुट्यासारखा कर्मत्याग करुन पळुन जाऊ नकोस. अश्रु ढाळु नकोस. व्यर्थ विलाप करु नकोस. माहित आहे ना..मी अर्जुनाला काय म्हणालो..? सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युध्दाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि...   

अंगावरती रोमांच उभे राहिले, डोंगर दर्‍यातुन भटकणार्‍या वार्‍यासारखं अशरीरी झाल्यासारखं झालं. ह्रदयातुन एक अनोळखी प्रवाह वाहत होता. मन सुन्न वार्‍यासारखं झालं होतं. अंतःकरणात मणभर चांदणं दाटलं होतं.  लिहलेली कविता वार्‍यावरती एकटीच फडफडत होती. कळत नाही, आज जे जे झालं ते केवळ माझ्याकरिताच झालं होतं काय? पथभ्रष्ट झालेल्या मला सन्मार्ग दाखवण्यासाठी ?..हो खरंच.. असचं झालं असेल....                            

सांग ना, कुठला अगम्य हात हा खेळ खेळत असेल ?