गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

ती कुठे राधिका आता...

खुप दिवस तसं लिखाण बंद. वेळच मिळत नसायचा. अं हं...साफ खोटं ..खरंतर मी मुद्दाम काढत नव्हतो...कामावरुन खुप उशीरा घरी येणं रोजचच झालं होतं. मनाचा विषिण्ण गाभारा पुर्णपणे लिंपुन घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता. आई म्हणते रिकामं मन म्हणजे सैतानाची वस्ती...स्वतःस कामात गुंतवुन घेत जा म्हणजे कशाचच काही वाटणार नाही. विज्ञान सांगत एका दिवसात माणसाच्या मनात साठ हजार तर्‍हेतर्‍हेचे विचार येत असतात. खरंच येतात का हो ? डिपेंड करतं.. मेय बी.. .साला.. काय मस्त उत्तर आहे ना.. मी स्नानसंध्या व्रतवैकल्येही सोडलेली. कुणी विचारलं तर मी ‘ स्वग्रामी सर्वही साचार। ग्रामांतरी अर्धआचार ‘ ही ओवी माझी कुमकुवत बाजु तोलुन धरण्यासाठी वापरत असे.. केवीलवाणा प्रयत्न...माझ्या पापण्यांच्या आडुन डोकावणार्‍या नास्तिकतेने माझा ताबा घेतला होता काय ? कि बुडुन गेले होतं माझं आस्तिकत्व डोळ्यांच्या खारट पाण्यामध्ये..? समजु लागलो होतो मी स्वतःला नास्तिक..? अहं ब्रम्हास्मि असं असणारं तुझं चैतन्य , निराकार अस्तित्व मनाच्या निर्माण झालेल्या रुणझुणत्या डोहाच्या गर्त्यात अंतर्धान पावलं होतं ? आजकाल असलेच निराशावादी विचार जखडुन टाकायचे लिहायला बसलं की.. केनोपनिषदातील अनेक प्रश्न समोर... जन्म दिला म्हणुन हे शरीर आई वडिलांचे सर्वस्व आहे की लग्नवेदी वरच्या सप्तपदीसरशी सखी राज्ञी म्हणुन नात सांगणार्‍या भावी पत्नीची ती लौकीक संपत्ती आहे ? आधिनतेमुळे ते स्वामीचे आहे की स्नेहामुळे आप्तेष्ठांचे ? आहुतित्वामुळे ते अग्नीचे आहे की भक्षत्वामुळे कुत्रे वगैरे प्राण्यांचे भक्ष्य आहे ? पंचमहाभुतांकरवी उत्पन्न झालेल्या मनुष्यनामक या मृत्पिंडास आपले म्हणावे की शुध्द संबंधितांचे ? कित्येक दिवस मी असंच काहिसं लिहायचो. भीषण वाटायचं..वाटायचं आपल्याला जगण्याची तिळमात्र आसक्ती का नसावी...? तुझ्या अस्तित्वाचे गहनगंभीर घंटानाद मी आजही का शोधतोय ? डोळ्यातील तुझ्या चिन्मय अस्तित्वाच्या सजल भावना कुठे लुप्त झाल्या आहेत ? मी डायरी घट्ट बंद करुन अंधारात निपचित बसुन रहायचो कित्येक तास..अनाहतपणे..

 आजकाल हेच गणित होऊन बसलं होतं. अस्तमान सुर्यासोबत काजळलेली धुसर तिन्हीसांज. मी माझ्या खोलीमध्ये एकटाच. वाचत बसलेला. रेडीओचा स्लॉटही बंद. उदासवानी संध्याकाळ. दिवेलागणी झाली होती. देवघरातुन धुपाचा वास येत होता. अंधारलं होतं. मी हातपाय धुवुन ओवरीवरती बसलो. स्वातीने कॉफीचा कप हातात दिला. मी काहीच न बोलता कॉफी घ्यायला सुरुवात केलेली..

‘’ दादा काय झालं ? नाराज आहेस ?’’

‘’ नाही..नाराज नाही. जा किचनमध्ये जा आईला मदत कर ‘’ मी

स्वाती काहीच बोलली नाही. तीने दोनही कप उचलले. रिकाम्या मनाने मी उठलो माझ्या खोलीत गेलो. लिहायला बसलो. कित्येक दिवस लिखाण बंद असल्याने पेनातील शाई अळुन गेली होती. मी दौत घेवून शाई भरुन घेतली. खोलीमधील लाईट अजुन लावली नव्हती. टेबल लॅम्प फक्त चालु होता. लिहायला सुरुवात करणार तोच..

‘’ दादु , मला ना तुला एक गोष्ट दाखवायची आहे ’’

‘’ स्वाती तुला सांगितलं ना आईला बर वाटत नाहीए तिला जरा कामात मदत कर ‘’,मी जरा रागावुन

आमचं काम उरकलयं केव्हाचचं ‘’

‘’ मग जा जरा पुस्तकं उघडा ‘’

संध्याकाळी स्वाती ओवरीतल्या झोपाळ्यावर वाचत बसलेली असते. आज ती अचानकच वर आलेली. तीच्या हातात पुस्तक होतं. तरीही मी तिला ओरडुनच बोललो.

‘’ काय रे दादु ओरडतोस कशाला मी तुला काही दाखवणार होते ‘’, समजुतीच्या सुरात स्वाती.

‘’ काय दाखवणारेस ? अन् हे काय किती वेळा सांगितलयं तुला माझ्या पुस्तकांना डायर्‍यांना हात लावायचा नाही एकदा सांगितलेल कळत नाही का तुला ? ‘’

एरव्ही मी असा कुणालाही रागवुन बोलत नाही पण का कुणास ठाऊक आज मी जरा जास्तच चिडचिड करत होतो. तीच्या डोळ्यात खळकन पाणी आलं तिने हातातील पुस्तक माझ्या टेबलवरती ठेवलं अन् मुसमुस करत खाली गेली. मी पुन्हा लिहायला बसलो. मयुरदा शेजारच्या खोलीत तनपुरा घेऊन तेरोही गुण गावे चा आरोह सजवत होता. ही चिज खुप सुंदर आहे. तिची गती धाटणी सुंदर आहे अप्रतिम आहे. हे पद तो नुकताच शिकला होता. खुप दिवसांनी घरी रियाजाची मैफिल सजली होती. तबल्यावरती दर्शनदा अन् आण्णा संवादिनीची साथ करत होते. दिवाळी पहाटला हे पद मी कित्येकदा ऐकलं होतं. मी पटकन डायरी बंद केली. पलीकडे गेलो. आई एकटीच प्रेक्षक.. हाताने सम दाखवणारी...मी उभ्या उभ्या भिंतीला टेकुनच ऐकत होतो. समोरच्या खिडकीतुन पार्श्वपतीनाथाचा चांदण्यात निथळणारा सूंदर कळस डोळ्यांत भरत होता. खिडकीत मंद मंद वारा वहात होता. स्वरसप्तकाला भेदुन जाणारा संचारी अन् अभोगा हे दोन्ही द्रुतत्रितालात घेऊन त्याने ‘ जगत तारी द्रुत पिनाक ‘ छेडला. स्वाती अन् मला ही जागा खुप आवडायची. मला अचानक स्वातीची आठवण झाली. ती तिकडे नव्हती. मी झरझर जिन्याच्या पायर्‍या उतरलो. ओवरीकडे निघालो. झोपाळा एकटाच स्वतःशीच झुलतं होता. गिर्दीवर पुस्तक पडलं होतं. वार्‍यावरती त्याची उघडी पान फडफडत होती. मी ते पुस्तक काचोळ्याशी ठेवत स्वातीला हाक मारली. ती तिकडे नव्हतीच. मी वृंदावनाकडे गेलो. आकाशात टपोर चांदण पडलं होतं. दिगंशावरती सप्तर्षी उजळले होते.निदसुरी झालेली केळीची खुंट चंद्रप्रकाशात मोहक वाटत होती. शक्यतो ती रुसल्यावर इकडेच येत असे. चंद्रप्रकाशात पलभेसारखी सावली असलेली स्वाती वृंदावनाला टेकुन एकटीच बसली होती. मी तिला प्रेमाने हाक मारली ..

‘’ माई..ए माई..’’

मला पाहताच तिने तोंड फिरवलं. रुसली होती. तिच्या केसावरुन मी प्रेमाने हात फिरवला.

‘’ अगं ऐकलतं का ? बघ

मयुरदाचा वरती रियाज चाललाय, तेरोही गुण गावे म्हणतोय तो. बघ ना काय निषाद लागलाय.. पिनाऽऽऽऽऽक चल वरती पटकन..’’ मी तिला स्वरपाठ देत होतो.वास्तविक त्याची तिला गरज नव्हती. तिचा स्वर जात्याचाच शुध्द होता. मुस्तेय होता.

‘’ तु जा.. तु गाणं ऐक ’’ अचाट वाथंगपणा

‘’ अगं माई मी तुला न्यायला आलो तुला आवडतं ना हे गाणं ?’’ मी प्रेमाने म्हणालो.

‘’ मला नाही यायचं जा तु...आधी हवं ते हवं तस बोलायचं अन् मग लाडीगोडी लावायची ‘’, अगदी

नाकाच्या शेंड्यावरचा राग..

मी दोन्ही कान पकडले. कान धरुन उठाबश्या काढायला सुरवात करणारच तोच ...

‘’ पुरे पुरे कुणाला वाटेल बहिणीवर याच खुपचं प्रेम आहे ’’, डोळ्यांच्या ओलसर पापण्या आपल्या पालथ्या हातांनी कोरड्या करत स्वाती म्हणाली.

‘’ नाही का मग ? ‘’

‘’ चल चल कुणाला खरं वाटेल ’’

‘’ बरं काय सांगणार होतीस ? ‘’

‘’ जेवल्यावरती दाखवेल ‘’, हळुवार आवाजात स्वाती.

माडीवरती गेलो. स्वरबहार चालुच होता. रंगीले राम कि अखियां, जागी सारी रतियां, रंग दे चुनरिया. बेदर्दी बन गये मोरे सैंया कित्येक गाणी झाली. आईच्या आग्रहास्तव धन्य मी शबरी श्रीरामा, जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशीरथी, अन् शेवटी आजी सोनियाचा दिनु ..

स्वातीने वातेर्‍याने चारी कोपर्‍यातील समयांच्या विष्णुवाती सारख्या केल्या. तारा उतरवुन मयुरदाने तानपुरा बाजुला केला. आई अन् माईने जाऊन ताटे केली. मयुरदासाठी आईने खास गोड सांजा केला होता. जेवणं उरकली. जरा वेळ ओवरीपासुन मागच्या अंगणातील केळीपर्यंत शतपावली केली. अन् मी माझ्या खोलीत आलो. माझ्या काहीस लक्षात आलं मी वरुनच हाक मारली...

‘’ माई....ऽऽ‘’

‘’ काय दादा ‘’

‘’ अग काय दाखवणार होतीस सांग ना ‘’, मी

‘’ थांब भांडी विसळतेय आले पाच मिनीटात... तु लिहायला नको बसु पण..’’,

अस्पष्ट आवाज. ‘’ बरं ‘’

मी खिडकीशी उभा राहिलो. काही वेळ असाच गेला शांत शांत. मला ही खिडकी खुप आवडते. या खिडकीच नावही प्रेमाताईने ठेवलं होतं. ‘ सई ‘ म्हणजे सखी, ‘ सई ’ म्हणजे सय, ‘ सई ’ म्हणजे स्मरण अन् सई म्हणजे माझ्या आईचं माहेरचं नावं. प्रत्येक खिडकीला एक चौकट असते. स्वतःचा एक आकार असतो. मनात प्रश्नांच्या चौकटी निर्माण झाल्या की, मी या सईजवळ जातो. फक्त चौकटीलाच माहीत असणार्‍या शोचनीय चौकटीच्या बाहेर जाऊन मला ती काहीतरी दाखवते. मनाला आलेला मळभ कुठला कुठे निघुन जातो. चौकटीबाहेर पाहिलं की, डाव्या हाताला सुवासिनींना जन्मोजन्मी सौभाग्याचं लेणं देणारे पाच अनवट वटवृक्ष अक्षय उभे आहेत. शेजारी चपेट मारुतीचं टुमुकदार मंदीर, त्याच्यासमोर लाल मातीचा केसरी आखाडा, पुर्वेकडे अर्धामैल विस्तीर्ण पसरलेलं पांढरी मैदान..नजर जरा वर नेऊन स्थिर केली की महादेवाचं हेमाडपंथी मंदिर नजरेत भरतं. गुलटेकडी, भैरवनाथाच्या मागील पानवठा..त्याभोवती असलेल्या वीरगळी..

‘’ दादु, काय रे कुठे गुंतला आहेस? ‘’, खांद्यावरती हात ठेवत स्वाती.

‘’ कुठे नाही... बोल ना काय दाखवणार होतीस? मी

‘’ अरे ते मी सकाळी ओवरी झाडत होते. आण्णांच्या गादीवरती ब्रम्हवैवर्त पुराणाची ही प्रत पडली होती. मी झाडता झाडता थांबले. म्हटलं पहावं तरी काय आहे ब्रम्हवैवर्त्यामध्ये. ..दुपारी सहज वाचत बसले. अरे ते राधिके विषयी आपलं बोलणं झालं होत ना.. की ते केवळ जयदेवाच्या काव्यनिर्मितेतुन निर्माण झालेलं पात्र आहे. अरे तसं नाहीए. बघ मी तुला काही सर्ग दाखवते की त्यात राधिका संभव वगैरे आहे. राधिका कवच वगैरे आहे. त्यात राधिका केवळ गोकुळातील रायाणाची पत्नी आहे असं मुळीच लिहलेलं नाहीए. रायाणाची पत्नी तर छायाराधा होती. या पुराणाची उत्पत्तीही नैमिषारण्यातील सुत आणि शौनकादिकांच्या संभाषणातुनच झालेली आहे. विश्वोत्पत्ती संबंधी चैतन्याचे त्या एकायतनुचे दोन भाग पडले. एक प्रकृती अन् दुसरा पुरूष. त्यातील प्रकृती ही राधा स्वरुपीनी आहे. प्रकृती या शब्दाचा अर्थ प्र म्हणजे ‘प्रकृष्ट’ आणि कृति या शब्दातुन सृष्टिच्या अर्थाचा बोध होतो. सृष्टीसंभवाकरिता जी सर्वात प्रकृष्ट आहे म्हणजे प्रवीण आहे ती प्रकृती. या प्रकरणातचं राधेची अनेक नावे दिलेली आहेत. जस की परावरा, सारभुता, परमाद्या, परमानन्दरुपा, धन्या, मान्या आणि पुज्या. गोलोक वृंदावनातील भगवान श्रीकृष्णाची ती नित्य सहचारीणी आहे. तिचं इतकं सुंदर वर्णण केलं आहे ना. बघ ना.

श्वेतचम्पकवर्णाभां कोटीचन्द्र समप्रभाम । शरत्पार्वणचन्द्रास्यां शरत्पंकजलोचनम् ।

सुश्रोणी सुनितम्बां च पक्व बिंबाधरांवराम् ।।

 

राधिकेची कांतीश्वेत चंपाकासारखी शुभ्र आहे. शतचंद्र तारकांचे मनोहारी तेज अंगीभुत आहे. तिचा सुहास्य चारुचंद्र शरदातील चंद्रालाही लज्जीत करतो. जिच्या देहलतेचे सौंदर्य प्रदेश उन्नत आहेत. बिंबासारखे लालभडक अधर. स्वाती नक्षत्रांत निर्माण झालेल्या मोत्यांच्या सरींपेक्षाही सुंदर दंतपंक्ती या साजशृंगारामुळे तिची जीवनी अधिकच मनोहारि दिसते. ओठांतुन फुटलेले मंद स्मित अन् त्यायोगे उदयास आलेली प्रसन्नता शतचंद्र तारकांच्या ऐश्वर्यांपेक्षाही सुंदर दिसते. तिने रत्नमय केयुर, कंकण अन् पायांमध्ये पैंजण धारण केले आहेत. तिच्या केवळ चरण संस्पर्शाने मेदिनी पवित्र होते. सिमन्त प्रदेशावर कस्तुरीची बिंदी. त्रैलोक्य विजयासाठी निर्मिलेल्या पालवींसमान भुवयांच्या कोदंडांवरती चंदनांचे बिंदु शोभुन दिसत आहेत. दोन्ही भृकुटींमध्ये रेखलेली आरक्त कुम्कुमाची रक्तिमा निढळांवरती कोटी चंद्र सुर्यांचे तेज पसरवणारी आहे. वृंदावनातील तिचे नाव रासेश्वरी अथवा सुरसा आहे. ती निर्गुण, निर्लिप्त, निराकार, आत्मस्वरुपिणी आहे. अग्नीशुध्द निलवर्ण अमळ वस्त्र तिने परिधान केले आहे. ती अर्थगर्भपणे अखंड बोलत होती. अचानक खालच्या चौकातुन आवाज आला..

‘’ माई...अगं माई जरा काढा करुन देते का गं तुळशीचा...’’ त्रस्त आवाजात आई खालुन हाक मारत होती.

‘’ दादु मी आलेच थोड्यावेळात आईला काढा करुन देते .. तु वाच तोपर्यंत..’’. ती

पटकन खाली गेली. मी टेबलावरची वैवर्ताची प्रत उचलली. प्रकृतिखण्डाचा छपन्नवा सर्ग सहज उघडला गेला. स्वातीने त्या राधिका कवच्या भोवती महीरपी बनवली होती. मी वाचु लागलो.

विनियोग

ओम् अस्य श्रीजगन्मङ्गलकवचस्य प्रजापतिर्ऋषिर्गायत्री छन्दः।

स्वयं रासेश्वरी देवता श्रीकृष्ण भक्ति सम्प्राप्तौ विनियोगः ।।

 

या अथ पासुन कवचस्य प्रसादेन जीवन्मुक्तो भवेन्नरः या इतिपर्यंत साद्यंत वाचलं. पुस्तक खाली ठेवणारच तोच..

‘’ दादु झालं का वाचुन ’’. स्वाती

‘’ अगं खुप आहे. आज सुरुवात करतो ‘’

‘’ तुला हे आवडेल की नाही हे माहीत नाही. पण कदाचित यामुळे राधिकेचं मनाच्या तळ्यातलं नितळं मंदिर कार्तिकातल्या निर्मळ सुर्यप्रकाशासारखं स्वच्छ होईल ‘’ अलबेल बाहुली सारखी स्वाती म्हणाली. ..

‘’हो निश्चितच ‘’, मी

‘’ दादा लास्ट कविता कधी केली होतीस....’’ माझ्याकडे नजर टाकत स्वाती..

‘’ नाही सांगता येणार.. पण झाले असतील दोन तीन महीने ‘’

‘’ का कविता सोडलीस ? ‘’

‘’ नाही ‘’

‘’ सध्या वेळचं काढु नाही वाटतं ’’

‘’ थांब मी तुला एक टास्क देते म्हणजे मला तशी कविता ऐकव..बघ म्हणजे चार ओळींच एक कडवं, पहिल्या तीन ओळीत चार अक्षरे अन् शेवटच्या ओळीत सहा. अगदी सुधाकरीपेक्षा वेगळी पीके करते तशी, ‘’ हळु आवाजात ती म्हणाली.

‘’ दिदु अरे मी कुणी कवी नाही.. असंच मनात आलं तर लिहित असतो. टास्क वर कस लिहणार मला नाही येत.. ‘’ ‘’ माझ्यासाठी लिही ना..मला ऐकायची तु या प्रकारात कशी कविता करतो ते ’’

स्वातीने पटकण वही अन् पेन माझ्या पुढयात आणुन ठेवला. अन् सामानयादी करायला बसल्यागत माझ्या समोर .. ‘’चल लिही..’’

‘’ अं.......? कविता काय अशीच येते काय जरा वेळ दे ‘’ मी

‘’ हो आहे वेळ आत्ता साडे नऊ झालेत दहाला मी झोपते अजुन वीस मिनीट..’’ घडयाळाकडे पहात स्वाती म्हणाली मी आत्मचिंतन वगैरे काहीही न करता अगदी मुक्या भावनेने वीस मिनीटांत ही कविता लिहुन काढली....

 

तो सांजराग मुरलीचा मी केवळ ऐकत राही

कां मनात वाटे मजला मज राधा दिसली नाही ।।ध्वृ।।

मी बावरतो मग तेव्हा

राधेला शोधित निघतो

स्मरणांच्या वाटेवरती

मी कृष्ण फुलांनी भिजतो

खडकांच्या माळांमधुनी

तो झरा चिमुकला वाही

कां मनात वाटे मजला मज राधा दिसली नाही ।।1।।

मी तिर्थ तिर्थ धुंडाळी

तिर्थी तर धोंडा पाणी

थरथरत्या पाण्यावरती

मंत्रांची अगणित नाणी

काशीच्या घाटावरती

अस्वस्थ कबिरा गाई

कां मनात वाटे मजला मज राधा दिसली नाही ।।2।।

मन गोकुळ होऊन वेडे

यमुनेच्या काठी वसते

सजलेल्या नदीतटावर

राधेला चोरुन बघते

सखया ती राधा नाही

सांगते हळुवनराई

कां मनात वाटे मजला मज कुणी दिसली नाही ।।3।।

मी अंग अंग मोहरतो

द्वैताचा मिटुन पसारा

अद्वैत घनांच्या खाली

मोरांचा गर्द पिसारा

राधेचा पाऊस येतो

घनगर्द मनांच्या ठायीं

कां मनात वाटे मजला मज कुणी दिसली नाही ।।4।।

संदिग्ध मनाची होडी

सावरते पिऊन किनारा

राधेच्या शोधासाठी

मिरेचा शांत निवारा

ती पाय वाट तुकयाची

जणु गाते अभंगवाणी

कां मनात वाटे मजला मज कुणी दिसली नाही ।।5।।

मौनाच्या सनईमधले

हे सुर तुला बिलगावे

द्वैताच्या मार्गावरती

स्वस्वरुपी गुज कळावे

तो दास सुरांचा गातो

भक्तीची डोळस वाणी

कां मनात वाटे मजला मज कुणी दिसली नाही ।।6।।

राधेच्या डोळयांमधले

नक्षत्र मला आठवते

मी राधा राधा म्हणता

ती मिरा मिरा होते

ती एक दिपवीन ज्योती

जणु अखंड तेवत राही

कां मनात वाटे मजला मज राधा दिसली नाही ।।7।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा