गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

तेरोही गुण गावे

            श्रावणाचे दिवस होते. खुप दिवसांनी आज रामदर्‍याकडे आलो होतो. गाभार्‍यातील कोदंडधारी प्रभु श्रीरामाचे दर्शन घेऊन तळ्याकाठी असणार्‍या पायर्‍यांवरती मी बसलो. वार्‍याने त्या निळ्याशार तळ्यावरती वलायाकृती तरंग निर्माण केले. त्यातीलच काही वेंधळे कल्लोळ पायर्‍यांशी शांत होत होते. तळ्याच्या पैलतटावरती असणार्‍या वट वृक्षाच्या कुशीमध्ये पक्षांची झुंबड उठली होती. दुर रानात कुठुनतरी मोरकेका ऐकु येत होत्या. पानापानांत दाटलेली सांजवेळ हळुहळु पाण्यात उतरु पहात होती अन् वार्‍याने त्या तळ्याच्या पृष्टभागावर निर्माण केलेले तरंग पायांशी स्थिरावत अलवार सुखाचा स्पर्श करुन मुक्यानेच निवळत जात होते. ज्या कल्पदृमाखाली मी बसलो होतो त्याची कलती छाया तळ्यामध्ये पसरली होती. त्या छायेने भ्रमित झालेला कुणी चुकार जलध्वांश हलकेच पाण्यात डुबकी घेत होता. श्वेत बकांची एखादी मोहक माला हलकेच पाण्यावरती उडत होती. 

           उजव्या बाजुला एका आम्रवृक्षाशी जाईची एक प्रसन्न वेली बिलगली होती. कां कुणास ठाऊक ती हिरवट पोपटी लतिका मला श्यामवर्ण दामोदराला बिलगलेली राधिका वाटली. मी प्रसन्नपणे हसलो. मनात विचार आला खरचं, एकपणाने एकाचाच विचार करता येत नाही. राधेचं नाव घ्यावं तर डोळ्यासमोर शामवर्ण मुरलीधराची राजस सुकुमार मुर्ती उभी रहावी अन् अंतकरणात त्या मुरलीमनोहराचं स्मरण करायला जावं तर त्याच्याच वामभागी  मंदाराची फुले माळलेली, मोहाच्या फुलांसमान कोमल गाल असणारी राधिका दिसावी. अव्दैताचा हा व्दैती विलासही मोहक वाटावा असाच आहे. काय गंमत आहे पहा ना !  राधा अन् माधव सर्वशः एक आहेत असे म्हणणे खरे नव्हे. पण दोन आहेत म्हणुं तर दोन म्हणण्याइतकी दोन नाहित. यांना एक म्हणावं की दोन या प्रश्नातच मन गुंतुन राहतं, अन् तो गुंताही असा सुसह्य वाटतो की यातुन मोकळिक मिळावी असं देखील हळव्या मनाला वाटत नाही. मन फक्त मौनात झरु पाहतं. विचारांची वादळं पाणी निवळावं तशी निवळत जातात. पण गेल्या दोन तीन दिवसात मात्र योगेशचन्द्र राय यांनी डोक्यात त्या नास्तिक विचारांचं थैमान घातलं होतं त्यालाच समांतर परवा परवा सुमन पारिक याचाराधा का विकासया नावाचा प्रबंध वाचला अन् उकाडा नसतानाही दुध नासावं तशीच मनाची अवस्था झाली. त्यांनी लिहलं होतं की, ‘ राधेचा उगम अगदी आर्वाचीन असून ज्योतिष शास्त्रांतील कविंनी घेतलेल्या कल्पनेतुनच झाला. त्यांनी प्रमाणही अथर्ववेदातील दिलं होतं.राधा विशाखा पुष्ये तु सिध्यतिष्यौ श्रविष्ठया ।विशाखा नक्षत्राचं प्राचीन नाव राधा. इ.स.वी सन पुर्व २५०० वर्षांआधी राधा हेच नाव प्रचारात होतं. अन् राधा-कृष्ण तत्व देखील कुठल्याही धर्माचं मुळ तत्व तस नव्हतच. त्यांच्या मुळ मौलिक रुपात ती फक्त ज्योतिष तत्वं होती म्हणजे आहेतही. वेदांमध्ये विष्णु हाच सुर्य कल्पिला आहे. या सुर्यालाच कृष्ण अशी व्याख्या करुन नक्षत्रमंडळ त्याभोवती रासमंडळ रचित असल्याची कल्पना कविंनी या ज्योतिष शास्त्रातुनच घेतली. कार्तिकी पौर्णिमेला सुर्य विशाखा नक्षत्रात असतो. म्हणजेच पुर्वीच्या राधा नक्षत्रात असतो त्यायोगेच राधा कृष्ण यांचा रास सजतो. काही ज्योतिषतत्वांनी कवितांचा आश्रय घेतला अन् ते रुपकधर्मी झाले. पुढे पुराणकालामध्ये या रुपकधर्माचा विसर पडला अन् रुपकतत्वे अनायासे सत्य वाटु लागली. अन् अशा प्रकारे बहुपल्लवित-पुष्पित अशा राधा-कृष्ण लिलेचा उद्वभव झाला.शशिभुषणदास गुप्ता, श्री योगेशचंद्र राय अन् त्यानंतर सुमन पारिक या त्रयींनी माझ्या आजवरच्या श्रध्देला मोठा धक्का दिला होता. अन् तसही नास्तिक विचार ज्या वेगाने आस्तिकाला भ्रष्ट करु शकतात त्याचगतीने नास्तिकाला आस्तिक बनवणं आस्तिकाला जमत नाही. हाच आस्तिकत्वाचा पराभव मानावा काय ? विचारांचं असंच काहुर उठलं अन् कोपर्‍यातलं कोळीष्टक झाडुन टाकावं तसाच मी मनातला नास्तिकवाद झटकुन टाकला. आस्तिकता तिच्या नैसर्गिक कामुकतेवर कलम केली तरी तिचा गुण स्वभावात उरत नाही असे थोडीच आहे ?   

           विचार अशा गर्तेत अडकतात तेव्हा मला मुखर व्हावं वाटतं. कुणाशी तरी क्षणभर बोलावसं वाटतं . कुणाला तरी कानभरुन ऐकावं वाटतं . कालही मी असाच एकटाच राधा म्हणजे काय ते शोधात होतो. फडताळ्याच्या गाठोड्या शेजारीच अमर कोशाची प्रत होती. कित्येक दिवसांची धुळ मी त्यावरुन झटकली अन् पान पान शांत चित्ताने शोधु लागलो. शेवटीराध्नोति साध्नोति कार्यमनया अःअशी सुधाव्याख्या सापडली. मनोवांच्छित कार्यसिध्दी साधणारी सिध्दीस्वरुपाराधा’.  मी निर्विकारपणे मनाशीच हसलो.  

पाठीमागुन कुणाच्यातरी येण्याची चाहुल लागली. मी स्वतःशीच वळलो. स्वाती होती. मी सहज तिला विचारलं, ‘’ माई तुला राधा नावाची कुणी मैत्रिण आहे का गं ?’’ तिने जरासा विचार करुन स्पष्टपणे नकार दिला. अन् चोरटा कटाक्ष टाकुन विचारलं, ‘’ का रे तुला काय करायचयं तिचं..अं...?’’ 

‘’ अगं तसं नाही गं म्हटलं पहावं की राधा नाव असणार्‍यांना स्वतःच्या नावाबद्दल काय माहित असतं ते. ‘’

‘’ मग ठिक आहे....माझीही या नावाची कोण मैत्रिण नाहीए’’

‘’ माईराधा खरंचं कृष्णाची कोण गं ? तिचं कृष्णाशी नातं तरी काय ? माता ? प्रेयसी ? सखी ? भगिणी ? की भार्या ? मीच काय सारे विचारवंतही या कोड्यात आहेत. केवळ कृष्णावरील भक्तीमुळे कृष्णाच्याही आधी तिचं नावं येत काय ? ‘’ 

‘’ दादु, राधा या दोन शब्दांतच त्या श्यामवर्णाचं  संपुर्ण सात्विक अस्तित्व तराळू लागतं ना ?. खरं तर राधा हा जोडशब्द आहे. या जोडशब्दातीलराम्हणजे लाभो अथवा मिळो तरधाम्हणजे मोक्ष. राधा म्हणजे मोक्षासाठी तळमळणारा जीव! युगंधरामध्ये राधा या शब्दाची लक्षणा अगदी हीच केलेली आहे.’’ गाथा सप्तशती मध्ये तर इतका छान प्रसंग आहे की गोपिका श्रीकृष्णास म्हणतात, हे कृष्णा राधिकेच्या मुखकमलावरती असलेले गोरज फुंकर घालुन तु उडवित आहेस खरंच तु ती धुली उडवत नसुन आम्हा गोपिकांचा गौरव हनन करित आहेस. किती छान वर्णण आहे ना ? अन् स्वतः श्रीकृष्णाने धुलीकणांवर फुंकर मारुन राधिकेचे मुखकमल नितळ करावे हा राधेचा केवढा मोठा अधिकार ?

 जाई-जुईच्या हिरव्यागार मंडपाखाली नक्षत्राचं आकाशभाषण किती सुंदर असु शकतं ते मी काल अनुभवलं. कलत्या सुर्याच्या प्रकाशात उजवीकडे पाने गळुन गेल्यावर नुसत्या पांढर्‍या फुलांच्या छत्र्या उघडणारे चाफे काल विशेष लक्ष देऊन आमचं बोलणं ऐकत होते. आणि कधी नव्हे तो मी तिला इतक्या शांतपणे ऐकत होतो.

        कालच्या प्रसंगातील राधिकेच्या नावाची ही व्युत्पत्ती मला आठवली, ती अगदी भावस्पर्शी वाटली. या अर्थानेच माझी चिंतनतळी घुसळुन निघाली. राधिकेच्या पदरवांच्या मागे माझा मनोरथ धावु लागला. मनात विचार आला; श्रीमद्-भागवतामध्ये राधिकेला कुठेही स्थान नाही. मत्स्यपुराण, पद्मपुराण, ब्रम्हवैवर्त पुराणांमध्ये कुठेकुठे राधिकेचा निसटता संदर्भ मिळतो. पण श्रीमद्-भागवतासारख्या पुष्टीमार्गाच्या प्रमाण ग्रंथामध्ये तिच्या अस्तित्वासंबंधी पुसटश्या खुणाही नाहित. विचारांचं एकच काहुर उठलं मग  सॅक मधील श्रीमद्-भागवताची प्रत काढुन अगदी कृष्णजन्मापासुन मथुरागमनापर्यंतचा भाग मी पुनश्च वाचुन काढला. सर्गामागुन सर्ग चालत होते राधिकेचा ठाव त्यांना माहीत नव्हता. येणार्‍या प्रत्येक नव्या ओळीने राधिकेची ओढ लावावी अन् संपणार्‍या ओळीने कुत्सितपणे हास्य करत निघुन जावं.. राधिकेचं अस्तित्व रात्रीच्या भेसुर शांततेपेक्षाही पुसट होतं जावं. मी थांबलो. खरचं  वेदवृक्षाच्या परीपक्व फळातील या अमृतरसामध्येही राधा मला सापडेना. खरचं सापडेना. काही विद्वानांना ती गवसला ती

 अनयाऽऽराधितो नूनं भगवान हरिरीश्वर ।

यन्नो विहाय गोविन्द, प्रीतो यामेनयद् रह ।।

           या श्लोकात ! खरं सांगु ? अनयाऽऽराधितो या अनुष्टुपातील शब्दसंचाने राधा श्रीकृष्णास बिलगली हे मानण्यास मन तयार होईना.  कारण अनयाऽऽराधितो या शब्दांत शुकाचार्यांनी राधिकेचा परोक्ष उल्लेख केलाच असेल हे छातीठोकपणे सांगता येत नाही.  राधेचं हे शब्दातीत अस्तित्व कदाचित श्रीकृष्णानेही नाकारलं असतं. आता मात्र गडबड झाली. राधिकेच्या अस्तित्वासंबंधी प्रश्नचं प्रश्न मनात वादळं उठवु लागले. राधा हे तत्व शुन्यतत्वात विलीन होत असल्याचा भास मला झाला. श्रीकृष्णाच्या जिवनपटावर रुक्मिणीपेक्षाही अधिराज्य गाजवणारी मुग्ध नायिका राधा, हळुहळु पुसट होत चालली होती. मी भागवत घट्ट बंद केला. भोळी श्रध्दा जगताना कधीही उपयोगी पडत नाही दिपा !! हे गुरुजींचे शब्द आठवले मी अंग अंग शहारलो. मनाची असंख्य कवाडं एका समेवर अचानक बंद व्हावी असं मला वाटलं. ओठ निपचित पडले. श्वासांची गती मंदावल्याचा भास झाला. अंगावरती रोमांच उभे राहीले. निबीड आमावस्या मनात दाटली ना चंद्र दृष्टीस पडत होता ना चंद्रिका. राधा हे तत्व मी गमावुन बसतो की काय असचं मला झालं.  जडावलेल्या पायांनी पुन्हा त्या श्रीरामाचं दर्शन घेऊन मी परतीच्या प्रवासाला निघालो. खरंच शांत पाण्यावर आज पुन्हा कल्लोळ उमटले होते.

           त्या रात्री बराच वेळ मी जागा होतो. गॅलरीत संथपणे येरझारा मारत होतो. कदाचित पिधान योग असावा. चंद्र वलयाशेजारीच एक चांदणी उगवली होती. त्या तारकेला पाहताच राधेचा तोच विचार पुनश्च जागृत झाला. कोण होती राधा !! तिचं अस्तित्व सत्य की कवी कल्पना मात्र ? तिचं स्वरुप नित्य अनादि अनंत एकरस की, साधन जगत वा कल्पना जगतात तिचा उत्तरोत्तर विकास झाला ? तिचा कृष्णाशी काय संबंध ? राधा कृष्णाची परिणिता पत्नी वा परकिया स्त्री आज जिच्यावरती भलीमोठी पुस्तके निघतात. कुठे गवसली ही कुणाला ? की नव्हती कुणी राधा, गोकुळात ? राधा नावाचे अनंत प्रश्न माझा पाठलाग करत होते. कदाचित ती मला सतावत होती, तिच्या अस्तित्वाबद्दल शंका घेतल्याबद्दल. म्हणतात, राधेला त्या गोविन्दावाचुन काही सुचतच नव्हत. मोरमुकुटधारी, पितांबर धारण केलेला, देहुड्या मुद्रेने यमुना तटावरती बासरीची अनवट सुरावट छेडनारा वेणुधर म्हणजे तिचं सर्वस्व ! तिच्या तना मनावर फक्त एकच तानकान्हा !! त्याच्या श्वासात, त्याच्या ध्यासात स्वतला झोकुन देणं एवढी एकच कला तिला माहित. कित्येक राधा माझ्या भोवती उभ्या राहील्या, अन् लिहायला घेतल्या कि अदृश्य झाल्या.राधाया दोन शब्दांखेरीज मला पुढे लिहता येईना ! मी थांबायचं ठरवलं. आता राधा उमगल्या खेरीज तिच्याविषयी  लिहायचच नाही हा विचार मनाने पक्का केला. वार्‍याने अस्ताव्यस्त झालेली पानं गोळा केली. आत आलो. झोपण्याचा प्रयत्न करु लागलो. छतावर फिरणार्‍या पंख्याच्या पात्यांकडे मी एकटक पहात होतो. प्रिये चारुशीले प्रिये चारुशीले ही अष्टपदी नकळत ओठावरती आली अन् अडकली. त्या सावळ्याचे ध्यान होताच मी गडबडलो. राधिकेचा किती मोठा अपराध मी आज केला होता. कदाचित त्या सावळ्याचाच अपराध मी करत होतो. मी मनोमन त्याला म्हटलंमाधवा !! नकळत मी हा अपराध करतो आहे.नव्हे तु हा अपराध माझ्याकडुन करवुन घेत आहेस. आज तुझी राधिका मी तुझ्या पासुन दुर करतं आहे. या मागील कर्ता अन् करविताही तुच रे! मला का निमित्त करतोय ? मी उजव्या कुशीवरती वळलो, कॉर्नर टेबलवरच्या श्रीकृष्णाच्या मुर्तीवरती मंद प्रकाश पडला होता. त्याचा सदैव प्रसन्न असणारा चेहरा आज मला चिंताक्रांत वाटला. अधरावरती धरलेल्या पोवरीतुन रामकरीचे विरागी स्वर निघत असावेत असं मला उगीच वाटलं, अचानकपणे त्याच्या वामभागातुन अदृश्य झालेल्या राधिकेचा तो शोध घेत असावा. सप्तमावतारात विरहाने व्याकुळ झालेल्या श्रीरामांनी  कोठे सिता जनकनंदीनी ? हा आर्त प्रश्न लता, वृक्ष, नद्या, वन्य मृग या वनसंजिवकांनाही विचारला होता. विरह शब्द वाटतो तितका साधा नाही. म्हणुनचं रामासारखा पुर्णावतारही तो सहजपणे पचवु शकला नव्हता.  या ना त्या प्रसंगाने श्रीकृष्णाच्या आयुष्यात हा विरह त्याने कधी अनुभवला की नाही याचं उत्तर कदाचितचं एखाद्या धर्मग्रंथात मिळेल. राधिकेसाठी कितीतरी चिंतातुर भासला तो मला ! 

 मी पुन्हा उठलो. टेबलवर ठेवलेली कवितांची वही उघडली. कृष्णे वेधिली विरहीनी बोले, जागृती पुसे साजनी नवल बोलीले अंगणी, घनु वाजे घुणघुणा या सारख्या विरहीनी मी कित्येकदा ऐकल्या होत्या. ज्ञानोबारायांनी लिहलेल्या सर्वच विरहीनी मधुराभक्तीतुन लिहलेल्या. पण आज राधिका नव्हे तर स्वत कान्हा विरहात बुडाला होता राधिकेच्या. मनाच्या गाभार्‍यात राधिकेवाचुन श्रीकृष्ण एकटा पडला होता. आपलं उत्तरीयं सावरतं तो तिला शोधण्यासाठी निघाला होता. लेखनीच्या झरझर झरणार्‍या शाईतुन, श्यामाची ही विराणी हलकेच कागदांवरती जन्म घेत होती.         


जग खिळले भुलले वाटे

मनी शांत साजिर्‍या लाटा

मी यमुना काठी शोधी

तव हिरव्या पाऊल वाटा ।।१।।

 

ते दिवस भारले प्रेमे

ती धुंद भावना ओली

नेत्रांशी खिळलो दोघे

नयनांत हरविली वाणी ।।२।।

 

तो श्वास एक फुललेला

तो स्पर्श लाजरा देही

ओठांशी ओठ निवाले

चैतन्य जागले रोही ।।३।।

 

ती ओढ अधिर मिलनाची

रुधिरांत बहरुनी आली

रामाच्या देहद्रुमावर

जणु सिता वल्लभ वेली ।।४।।

 

ती कुठे राधिका आता

ना साद येतसे कानी

वार्‍याच्या हिंदोळ्यांवर 

कान्हाची आर्त विराणी ।।५।।


 एव्हाणा शुक्राची चांदणी उगवली होती. राधा नावाची समाधी लागावी असचं झालं. वास्तविक कृष्ण हा वाटमारी करणारा आहे पण माझ्या बाबतीत तर राधेनेच वाट अडवली होती. हातातील लेखनी अडली होती राधा या दोन शब्दांत. आता शोध सुरु करायचा होता राधिकेचा !!! सर्ग, प्रतिसर्ग, वंश, वंशानुचरिते अगदी बाजुला ठेऊन तिला शोधायचं होतं. ज्याने या खेळाची सुरुवात केली होती तो खेळिया खुपचं शहाणा होता. खेळाचा डाव माझ्याही नकळत त्याने माझ्यावरती उलटवला होता. !!  अन् हा खेळ खेळता खेळता एक सुचक सल्लाही दिला होता. ‘‘ ऐक खेळिया तुज सांगितलें ऐसें जाणुनि खेळ खेळेरे.....’’

 हवेत गारवा वाढला. मी अंगभर शाल ओढुन घेतली. खिडकीतुन आत डोकावु पाहणार्‍या जाईच्या मंडपावरील कळया उमलायला लागल्या होत्या. मी मात्र निद्रेच्या आधिन झालो होतो. .....

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

माझा मराठीचा बोलु...

दुपारी मस्त झोपलो होतो. अचानक फोनची रींग वाजली. माझ्या निद्रेला विद्यार्थी पंचलक्षणातील श्वाननिद्रा म्हणण्याच काही कारण नाही. मी अगदी ढाराढुर झोपलेला असतो. फोन सलग वाजुन वाजुन दमुन गेला असेल अन्  ऑफिसमधुन फोन असेल म्हणुन उठलो. .. जांभई देत देतच हॅलो...केलं

'' हे बॉय… अरे किती ट्राय करतेय मी तुला.... फोन तरी रिसीव्ह करत जा ना....’’ पलीकडुन मुलीचा आवाज

आवाजाने मी जरा गोंधळलोच. कोण बोलतयं हे कळेना. मी कानाचा फोन काढला. डोळे दोन तिनदा मिचकवुन, मिचकवुन उघडले डोळ्यांवरची झोप बाजुला सारली. नंबर पाहिला. नंबर सेव्ह नव्हताच अन् ओळखीचाही नव्हता. मी पुन्हा फोन कानाला लावला. पलिकडुन चटपटीत आवाजात रेडीओ मिर्ची...

‘’अरे ...गधड्या टॉक टु मी... मी तुझ्याशी बोलतेय...एटलिस्ट डोन्ट फरगेट मी यार.....जॉबला लागला म्हणजे मोठा ज्युलीअस झालास की काय?’’ मी जरा चपापलोच...

‘’ कोण बोलतयं...?’’, मी

‘’ओव्ह माय गॉड... कान्ट बिलीव्ह...की तु मला विसरशील...’’ पलीकडुन बोलणार्‍या या पोरीच्या आवाजाने नक्कीच शेजारच्या दहा बारा घरांच्या काचा फुटल्या असतील...

‘’ कोण बोलतयं सांगाल का आपण ? ‘’ मी जरा विनंतीच्या सुरात...

‘’ नाव् मेक अ गेस.. हु आय ऍम् आवाज तरी ओळख सांग सांग...‘’

लोक आवाजावरुन पलीकडचा माणुस ओळखतात. पण आवाजावरुन माणुस ओळखण्याची ही नादभेद शाबरी विद्या मला अजुन तरी पुर्णतः वश झालेली नाही. डोळ्यावरची झोप पुरती उतरली नव्हती अन् ही कन्या डोक्याचा भुगा करुन टाकत होती.

‘’ अरे गेस तर कर एकदा...ऑदरवाईज मी सांगते... ‘’

‘’ ईश्वरसाक्ष मी नाही ओळखलं हो तुम्हाला....’’

‘’ मी एम् एच् बेचाळीस...रोल नं. 12, नुपुर दातार, ओ टु बिल्डींग, टी सी कॉलेज बारामती...‘’

‘’ नुपुर... तु.....? तुला माझा नंबर कुणी दिला.. ? अन् झारखंडाच्या जंगलातुन केव्हा सुटलीस तु ? ‘’, आश्चर्याने मी.

‘’ स्टुपिड...मी रांची मध्ये होते. जंगलमध्ये नव्हते कुठे.. लिव्ह इट ...हाव आर यु ? ‘’ फाईन. व्हाटस् अबाऊट यु ? ‘’

‘’ ऍम अल्सो...अलटुगेदर्ली ग्रेट ’’ खसखस पिकलेला आवाज... 

अशीच इकडची तिकडची बोलणी झाली. अन् फोन ठेवला.

नुपुर दातार, रोल नं .12, ओ टु बिल्डींग, टि सी कॉलेज बारामती, पाणीदार डोळ्यांची, चाफेकळीसारखं सुंदर नाक, भव्य भालप्रदेश असणारी, पाठीवर ऐटदार वेणी सोडुन यौवनाचे सलज्ज स्वागत करणारी ही एक मुग्धा; ईश्वराने हिला कोकीळकंठ बहाल केलेला. कविवर्य मोरोपंत करंडक वक्तृत्व स्पर्धेत आमची ओळख झालेली. तसे आम्ही दोघेही एकाच क्लास मध्ये, एकाच बॅचमध्ये होतो. कॉलेजातील कसलाही कार्यक्रम असो ‘ गगण सदन तेजोमय’ या नुपुरच्या गाण्याशिवाय कोणता कार्यक्रम सुरु झाला नाही अन् तिच्या आवाजातील पसायदानाखेरीज संपला नाही. पेशवा सर्किट्स नावाचा आमचा छान ग्रुप तयार झाला होता. नुपुरचे बाबा श्रीवर्धनचे देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण, उच्चविद्याविभुषित. आमची बारावी संपली तेव्हा ते व्ही.आय.एस.एल भद्रावतीला ट्रान्सफर झाले. पुस्तकात ठेवलेले सुंदर मोरपीस अचानक गहाळ व्हावे तशीच नुपुर आमच्यातुन गायब झाली. मध्यंतरी ती झारखंडात रहात असल्याचे कार्णोपकर्णी समजले होते. आज जवळजवळ सात वर्षांनी नुपुर दातार या कधीकाळच्या जिवश्चकंठश्च मैत्रीणीशी मी बोललो होतो. मी तिचा नंबर सेव्ह केला. अन् मराठी दिनानिमित्त असणार्‍या कार्यक्रमासाठी तयार होऊन बाहेर पडलो.

संध्याकाळी जेव्हा घरी आलो. तेव्हा प्रचंड भुक लागली होती. मातोश्रींनी केलेल्या उकडीच्या मोदकांवर ताव मारला. माझ्या खोलीत आलो. मोबाईल काढला मेसेज उघडुन पाहीला.. नुपुर दातार.... नुपरचं हॅलो हाय सुरु झालं होतं. मी रिप्लाय दिला... ‘’ बोला काय म्हणताहेत..मिस नुपुर माधवपंत दातार...’’

हल्लीच जग खुपचं फास्ट झालं आहे. फोनवर बोलण्यापेक्षा मेसेजवर छान गप्पा मारता येतात. मेसेज पाठवला की लगेच तिचा मेसेज.. 

‘’हेल्लो...कुठे होतास रे गधड्या..? कितीवेळ झाला तुला मेसेज करुन इतका लेट रिप्लाय ..?’’

‘’ अगं लक्ष नव्हत मोबाईलकडे जरा कामात होतो...बोलना काय म्हणतेस...?’’

‘’ जस्ट असचं यार, बोअर झालं होतं म्हणुन केला मेसेज तुला... ‘’ बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा म्हणजे देशमुखांची कोमल, जोश्यांचा विन्या, जेध्यांचा सौरव, दात्यांची मधुरा, नेवाळकरांची चित्रा, गुजरांचा प्रतिक यांच्या चौकश्या ..अन् पेशवा सर्किट्स.. हे सगळं झालं अन् तिने जरा गुगली टाकला.

‘’ सो... एव्हरीवन इज ऑन गोल्डन पाथ...’’

‘’ हो.. नक्कीच तस म्हणता येईल.. ‘’

‘’ दिपा, एनिथींग स्पेशल इज इन युवर लाईफ...? ‘’, राईट आर्म राऊंड दि विकेट अन् काहीसा अपेक्षित गुगली. ‘’ नथिंग यार...तु बोल... ’’, या नंतर नक्कीच बाऊंसर असणार हे मनाशी निश्चित करुनच मी उत्तर दिलं.

‘’ म्हणजे...आय वाना अस्क यु समथिंग....’’

’ मराठीत बोललीस तरी चालेल. मला मराठी कळतं...:-)’’

‘’ ओके...लेटस् ट्राय इट इन मराठी... शुध्द मराठीत बोलते... ;-)  ’’

‘’  :-) ‘’

‘’ आधी प्रॉमिस कर रागवणार नाही ते...सॉरी वचन दे... ‘’

‘’ बरं बाई दिलं वचन. .. नाही रागवणार... बोल.. :-) ‘’ 

‘’ ओके... मला असं विचारायचं होतं की.... तुला मैत्रीण आहे का;-p? ‘’

मला हा बाऊंसर खेळायचा नव्हता..किमान बाऊंसरला रिस्क नको म्हणुन मी खाली बसुन डोक्यावरुन जाऊ दिला.. ..बाकी काहीही असो मुलींच्या या प्रश्नाचा उत्तर देणं सोप नसतं.

‘’ हो आहेत की..! त्यात काय एवढं पुष्कळ आहेत ...’’

‘’ तसं नाही रे येडु.. मी मैत्रीण विचारतेय.. ‘’

‘’ हो आहेत की खुप आहेत. आपल्या जुन्या मैत्रीणी जश्या चित्रा, मधु, कोमल, शरयु अन् आता नवीन कॉलेजातील पण आहेत जेनी, जिगरी,स्नेहा, पीके, भाई, क्लासमेट अन् पिया ...अजुन आहेत एक दोन. ..बाकी कमी पडली तर तु पण आहेच की.. ’’मला सुटल्यासारखं वाटलं. ( कारण वन बाऊंस फॉर वन ओव्हर..)

‘’ अहो दिडशहाणे, थांब मी जरा स्पष्टच विचारते... तुला गर्ल फ्रेंड आहे ..?’’,

‘’ नाही बुवा....’’, या प्रश्नाच सर्वांच हेच ठरलेलं उत्तर.

‘’ खोटारडा कुठला.. लायर.. मी बघितलयं तुला बाजीराव रोडवर एका मुलीसोबत फिरताना.. शनिपारच्या चौकाजवळ.. ‘’ जणु खरोखर बघितलं असल्यासारखा तिचा कॉन्फिडेंस..एवढा कॉन्फिडन्स तर खुद्द कोकाट्यांच्या आमर्‍याला पण नसतो.. -)

‘’ हो का? माझ्यासोबत फिरली की लगेच ती माझी गर्ल फ्रेंड झाली..?

‘’ तसं नाही रे... म्हणजे तुला कुणी आवडते का? आणि तशी कुणी असेल तर.. आय लाईक टु हेल्प यु.. ’’

‘’ नको गं बाई...मी माझं बघुन घेईल... :-) आणि काय गं मॅब राणी अन् तुझी गाठ पडलेली दिसते. कि गेली तिची गाडी तुझ्या नाकावरुन.. .. ?

Through lover’s brains and then they dream of love... ….

O’er ladies lips, who straight on kisses dream ...अं... क्या बात है क्या बात है... नुपुर? ‘’, माझा वातंगपणा...

‘’ Peace, peace Mercutio peace! Thou talk’st of nothing...बघ अजुनही पाठ आहे कविता... :-) ’’

‘’ हो का? सांगायला पाहिजे बुवा त्या पर्‍यांच्या मॅब राणीला की तुझा रथ एकदा तरी जाऊदे गं आमच्या नुपुरच्या नाकावरुन... ‘’ मी.

‘’ ए सांग ना रे... खरचं आहे का कुणी अशी की तिला पाहुन यु फिल समथिंग....?’’

‘’ तु असं का विचारतेस पण? आणि आत्ताच मला फिल होतयं समथिंग की तुला भेटुन एकदोन धपाटे खायला घालावे.. हाहाहाहा... ‘’

‘’ ये फुल खिलकर सजा न बन जाए, ये चांद तारे पलक न बन जाए.  कुछ बात तो है मगर शायर-ए-नुपुर...लब तक आकर इश्क न बन जाये..’’  गझलकार नुपुर माधवपंत दातार

‘’ वाह वा.. वाह वा.. हरेक कदम बदल गई तेरी गझल की रैनाईया.. पहले गुल फिर गुलबदन फिर गुलबदामा हो गई...लिखते लिखते वोह खुशनसीबा कलम से कलमा हो गई..‘’

’ओव्ह माय गॉड अमेझिंग आप भी शायरी लिखते हो...?’’ अगदी टोकाची धेडगुजरी भाषा

‘’ नाही गं मला मराठी कवितांशिवाय काय येणार दुसरं..? अन् हे असचं कधी तरी तोडकं मोडकं लिहायचं ‘’, मी. ‘’ मग काय म्हणताहेत तुझ्या बाळबोध मराठीतील कविता.... ? ‘’ आत्तापर्यंतच्या संवादातील शंभर टक्के मराठी असलेलं हे तुझं पहिलं वाक्य… हुऽऽऽश...

‘’ काही नाही गं... मी लिहतो असंच कधी वेळ मिळाला तर... आणि काही सुचलं तर...

‘’ग्रेट, मला कधी ऐकवणार तुझी मराठी कविता किंवा मराठी गझल..?’’

‘’ तु भेटशील तेव्हा... ;-) ’’

‘’नो नाय नेव्हर... नाव् इटसेल्फ.....आणि आज मराठी डे पण आहे सो... तु मला कविता ऐकवणार आहेस.’’

‘’ नुपुर, खुप भुक लागली आहे. मी जेवतो. तुही जेवमी आज कविता लिहुन काढील अन् हवं तर उद्या तुला वाचुन दाखविल.. पण एक अट आहे. तुही मला तुझी एक उर्दु गझल ऐकवायचीस.. कोणतीही... ;-) ‘’

‘’ ओके डीअर...जा जेव...मी पण जाते जेवायला.  ’’          

मी उठलो पावणे नऊ झाले होते. आण्णा मंदिरातुन नुकतेच आले असावेत. स्वाती अन् मयुरदा ओवरीतच बुध्दीबळाचा पट मांडुन बसले होते. नेहमी प्रमाणे त्यांचा डाव चांगला रंगला होता. पण गेली कित्येक वर्षे या खेळाचा निकाल लागला नव्हता. आई नेहमीप्रमाणे ताईशी बोलत वृंदावनापासुन ओवरीच्या पायर्‍यांपर्यंत येरझारा घालत होती. आण्णा ईकडे असले की स्वाती अन् मयुरदाच्या भांडणाचा आवाज कमी असायचा. आईने फोन ठेवला अन् स्वातीला पाने करण्यासाठी घेऊन गेली. मातोश्रींच्या हाताला उत्तम चव. तिला अन्नपुर्णा प्रसन्न..सकाळी साधनद्वादशीचा मुहुर्त साधण्यासाठी ती रोजच्यापेक्षा जरा जास्तच लवकर उठली होती. दुपारीही तिला जरा जास्त काम पडलं. त्यामुळे रात्रीचा स्वयंपाक स्वातीला बनवावा लागला.  तशी ती स्वयंपाक उत्तम बनवतेच. जेवणं उरकल्यावर आईने स्वातीचं तोंड भरुन कौतुक केलं. स्वातीच्या हातालाही प्रेमाताईच्या हाताचीच चव होती. अन् तसंही ती जरा आज जास्तच खुश होती. आईने तिच्यासाठी खास तोडे बनवुन आणले होते. मुलींच सगळंच बरं असतं. माझा फोन वाजला. स्वातीच्या हातातच माझा फोन होता. तिने नाव पाहीलं हे नाव तिच्या ओळखीचं नसल्याने तीने फोन तडक माझ्याकडे आणुन दिला. मी फोन कट केला. का कुणास ठाऊक तिचं माझ्याकडे जरा जास्तच लक्ष असतं. मी जिना चढायला सुरुवात केलेली..मागोमाग स्वाती...

‘’ काय आहे?’’, मी

‘’ काही नाही मला झोप लागली म्हणुन ...’’ जांभई देण्याचं नाटक करत स्वाती...

‘’ हो का? रोज नाही लागत इतक्या लवकर....’’ मी खोचकपणे

‘’ ते .. रोज रोज थोडीच करते मी पुर्ण स्वयंपाक.. ..? आज जरा जास्त काम पडलं ना..’’

‘’ बरं जा झोप मी जातो रायांगणात..’’ मी मुद्दाम स्वातीचा कल पाहण्यासाठी ..

‘’ नको जाऊ तिकडे आण्णा अन् नाना असतील... नाही म्हटलं तुला कुणाला फोन वगैरे करायचा असेल तर इकडुनच कर... तसही मी झोपणार आहे...काही काही ऐकणार नाही... दादु ही नुपुर कोण रे...? ‘’

‘’ का गं...तुला काय पडलंय तीच? ‘’ नाही म्हणजे तु फोन कट केलास... अन् हे नावही पहील्यांदाच बघण्यात आलं ना... ‘’

‘’ अगं माझी क्लासमेट होती. सात वर्षांनंतर अचानकपणे आज तिचा फोन आलेला सकाळी.. .’’ मी स्पष्टपणे खरंखरं सांगुन टाकलं. त्याशिवाय मला सुटकाच नव्हती. नुपुर ही माझी केवळ मैत्रीण असल्याची खात्री झाल्यानंतर स्वाती उठली.

‘’ थांब मी जाते खाली, आईकडे... ‘’ स्वाती.

‘’ का गं झोप झाली काय ?’’

‘’ नाही पण आईला जरा मदत करते... ‘’

मिश्कील हास्य करत स्वाती खाली निघुन गेली. हा तिचा स्वभाव होता. तिच्या या मानवी स्वभावाचं मला मनोमन हसु आलं. मी मेसेज विंडो खोलली. मेसेज टाईप केला.

‘’ बोल.. काय म्हणतेस ? अन् फोन का केलेला ? ‘’

‘’ अरे यार... अगेन युवर लेट रिप्लाय.. ’’

‘’ हो जरा कामात होतो. बोल.. ‘’

‘’ काही नाही तुला जस्ट रिमाइंडर देण्यासाठी कॉल केलेला की तुला माझ्यासाठी कविता लिहायचीए. कारण मी इकडे गझल लिहायला बसले आहे‘’ ओ.एम्.जी. अगं लक्षातच नाही राहीलं..आत्ता लिहायलाच बसणार होतो.’’

‘’ थॅन्क्स...लिही लिही पटकण.. अन् मला माझ्या मेलवरती सेंड कर. .. ओके ? ‘’

‘’ओके....’’

‘’ चल गुड नाईट.. बाय.. सी .. यु अगेन.. ‘’

‘’ शुभरात्री नुपुर.. ’’

सार्‍या मेसेजवरुन एकदा नजर टाकली. सगळा धेडगुजरी भाषेचा खेळ. त्यातही आज मराठी दिन होता. हातातील फोन खाली ठेवला. एरीमलचं पेन हातात घेतलं. आजच्या मराठी दिनाच्या कार्यक्रमात मराठीची थोरवी ऐकली होती. वाटलं नुपुरसाठी कविता करावी ती ‘माझ्या मराठाची बोलु कौतुके परि अमृतातेही पैजा जिंके असे वर्णण असणार्‍या माझ्या मराठी भाषेवरती. ज्या भाषेने न केवळ लहानांसाठी ‘काऊळेयाचे घर सेणाचे । साळैचे मेणाचे । ही लिलाचरीत्रातील काऊ चिऊची गोष्ट दिली त्याचबरोबर भारतीय तत्वज्ञानाच्या मंदीरावरती कळसाप्रमाणे शोभावे असे ज्ञानेश्वरी, अमृतानुभवासारखे ग्रंथ दिले त्या भाषेवरती कविता लिहावी. माझ्या सिवबाराजाने जी भाषा बोलावी. नाथांच्या त्या रसाळभाषेसाठी पंढरीच्या पांडुरंगाने सोळा वर्षे श्रीखंड्याच्या रुपाने नाथांच्या घरी पाणी भरावं. नाथांनी म्हणावं माझी मराठी भाषा चौखडी । परब्रम्हे फळली गाढी , ज्या भाषेने परब्रम्हही फळाला यावं. त्या भाषेवरती कविता लिहावी. यादवांतील राजे असो वा राष्ट्रकुटांच्या गोविंद, श्रीमान अमोघवर्ष किंवा दिग्वीजयी पुलकेशी आणि त्याचे अप्रतिहत प्रतापी सैन्य ज्या भाषेत बोलत होते त्या भाषेचे आजचे रुप असलेल्या या मराठीसाठी कविता लिहावी. योगायोगाने आज दिवसही तसाच होता..मराठी भाषेवरती आजतागायत कित्येक कविता झाल्या असतील होतीलही. सूंदर कामिनीप्रमाने असलेल्या अन् अटवीच्या गतीशी एकरुप झालेल्या, मदनाने भारल्या या भाषेत कविता करण्याची इच्छा कोणत्याही कवीमनास झाल्याखेरीज राहणार नाही. ज्या भाषेने मला ‘आई’ हा पहिला दैवी शब्द बहाल केला. त्या भाषेची गोडवी गाण्यासाठी मी लिहु लागलो.. अन् कळलचं नाही कविता झाली ते..          

विठो दिनांचा दयाळु

देई ज्ञानदेवा ज्ञान

माय मराठीने दिले

आजि पायसाचे दान ।। 1।।

माझी इवलिशी मुक्ता

करी चांग्याला आदेश

माय मराठीत नांदो

माझा सोनियाचा देश ।।2।।

तुकोबाच्या अभंगात

भक्ती मुक्तीचा आनंद

माझी मराठी माऊली

जणु चंदनाचा कंद ।।3।।

नामा किर्तनात दंग

दळी जात्यावर जनीं

माझी मराठी मराठी

पांडुरंग कणोकणी ।। 4 ।।

थोर सोपान निवृत्ती

जणु ब्रह्म शिव खास

माझी मराठी मराठी

शुध्द प्राजक्त सुवास ।।5।।

एक नाथाच्या घरात

पाणी भरी चक्रपाणी

माझी मराठी भारली

धन्य एकनाथ वाणी ।।6।।

प्रगटला वालमिक

गितरामायणासंगे

माय मराठी मराठी

राम भजनात दंगे ।।7।।

देव वाणीतले ओज

उतरले मराठीत

दिप थोकडा थोकडा

हिचे गावयास गित ।।8।।



मी उठलो. पाण्याचा ग्लास घेऊन टेरेसवरती आलो. संथ संथ वाहणारा वारा.. खरं सांगु का ? हा योगायोग म्हण हवं तर. पण... .आपण दोघे एकाच वेळी हे आकाश पहात असलो ना.. की काही तरी सोहळा आकाशात सजलेला असतोच.. अगदी तुझी शपथ..तुझ्याशी बोलतानामी कित्येकदा ग्रहांच्या देखण्या युती अनुभवलेल्या आहेत...तेजस्वी गुरुजवळ मंद तेजाचा व नारंगी रंगाचा मंगळ... या युतीची शोभा वाढवण्यासाठीच की काय म्हणुन जरा वरती चमकत असलेला शुक्र... मी कित्येकवेळा बघितला आहे.  .सिंह राशीतील, मघा नक्षत्रापाशी गुरु, मंगळ, शुक्र हे तिनही ग्रह घोटाळताना...अन् दिगंत वैभव वाढवणार्‍या या सुंदर युती घडताना मी तुझ्यासोबतच पाहिल्या आहेत. नक्कीच आपल्या दोघांचा त्यांच्याशी काहीतरी संबंध असावा.. हो ना ? बघ आजही हे असचं... नेमका पिधानाचा योग..चंद्रमंडल चांदण्यांनी सजलेलं...अगदी पिठुर चांदणं पडलय बघ...  मी पटकन आत आलो. मोबाईल घेतला. मेसेज टाईप केला.. 

‘’  .  ’’

हातात मोबाईल घेऊन मी आशेच्या किरणांप्रमाणे दिसणार्‍या तारकांकडे पहात उभा राहिलो.

‘’.. ’’ साधारणतः पाच सात मिनीटांनी तुझा रिप्लाय... 

‘’ टेरेसवर ये अन् आभाळाकडे बघ...’’ मी

‘’थांब आलेच… ’’

तु तुझ्या टेरेसवरती…. आपल्या घरांमधील अंतर किमान चार ते पाच किलोमीटर पण आकाशातील प्रत्येक दिर्घिका, नक्षत्र, तारांगण, फक्त आपल्या दोघांचं. आपण इथले पण नकळत नक्षत्रांशी जोडलेले. चंद्र, चांदण्या, ग्रह, नक्षत्र सारं काही आपलं.... कदाचित या नभोतीर्थाशीच आपलं अद्वैत झालं असावं. हो फरक फक्त एवढाच की आपल्याला मर्यादा होत्याआकाश तु तुझ्या अन् मी माझ्या टेरेसवरुन पाहण्याच्या.. मी सहज तुला विचारलं .

‘’ काय गं… आणखी किती दिवस दोन वेगवेगळे टेरेस आपल्याला हा एकच नभोमंडप दाखवणार..?’’

‘’ तुझं अन् माझं अस वेगळं वाटणारं टेरेस आपल्या दोघांचं होईपर्यंत... ’’

तुझ्या उत्तराने का कुणास ठाऊक मला चांदण्यांमध्ये भिजल्यासारखं वाटायचं.. मी काही बोलाव असं काही राहीलेलचं नसायचं .. त्या निशब्द भावनांचा प्रवास कधीच पुर्णत्वाला पोचलेला असायचा.. मनापासुन.. मनापर्यंत.. 


गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

तेणें मज लावियेला वेधु

वार्‍यावरती फुलातील सुगंध निघुन जावा अन् देठावरती ओस फुल रहावं, संथपणे वाहणार्‍या प्रवाहात कुठेतरी एखादं कोवळं निर्माल्याचं फुल अडकुन रहावं तसच मन शरिराच्या देठावरती अडकुन राहीलेलं रितं अगदी रितं ती मुलं…ती मुलं व्रतस्थ होती वेश मुनींचे होते हातांत गंधर्वांची विणा घेऊन कोकीळकंठांनी ती तीनही सप्तकात गात होती. त्यांच्या मधुर स्वरांनी ग्रीष्माच्या नाजुक टोकरीत वसंताची फुलं टाकली होती. सप्तस्वरांचा नवरसांशी सुरेख संगम होत होता. त्यांच्या गायनाने अयोध्येचं अंतःकरण द्रवीभुत झालं होतं. शरयु मात्र संथ वाहत होती. तिच्या काठी एकाच वेलीवरती उमललेली फुलं प्रवाहातुन वेगळी होऊन प्रथमच एकमेकांना पहात होती. महर्षी वाल्मिकींचे ते शिष्य होते. अवघ्या आशा श्रीरामार्पण म्हणुन ते बटु रामकथेचं गायन करीत होते. त्यांच्या स्वरांमध्ये साम, मुद्रांमध्ये यजु, अन् अभिनयामध्ये ऋग्वेदाचे विलास होते.  ग्रीष्माच्या गार वार्‍याची झुळुक अंगावरुन गेली. नकळत रोम उभे राहिले. मी त्या स्वांत समाधीतुन अचानक जागा झालो. हो त्या समाधीला स्वांत समाधी हेच योग्य नामाभिदान ठरेल. मी अंगाभोवती शाल घट्ट केली. हेमंत दादाला कन्यारत्नप्राप्ती झाली होती. तिला पहायला आम्ही गेलो होतो. संध्याकाळी वाल्हे गावात सहज एक पाटी दिसली आद्यकवी महर्षी वाल्मिक समाधीकडे ..या अनाहुत पाटीने मला या मंदिरात येऊन उभा केलं. हे वाल्मिकींच समाधी मंदीर होतं. मुख्य गाभार्‍यात समाधीस्थान होतं. समाधी शिळा ही फुट दिड फुट वालुकाश्म पाषाणातुन घडवलेली होती. हे प्राचीन स्थान असल्याने समाधी शिळा झिजुन गेल्यासारखी दिसतं होती. त्या आद्यकवीच्या समाधीवरती मी चाफ्याच्या दोन कळ्या भक्तीभावाने वाहिल्या. मन गहिवरुन आल्यासारखं झालं. रामायण हा माझ्या खुप आवडीचा विषय होता. गाभार्‍यासमोरच व्यासपीठावरती भगव्या सुती कापडामध्ये वाल्मिकी रामायणाची एक प्रत ठेवली होती. अबीर बुक्यामध्ये न्हालेलं रामायण.. मी त्यावरती माझं मस्तक टेकवलं. भाळी अबीर बुक्का लागला. माझ्या अंतरंगात उगीच की काय एक उर्मी दाटुन आली. वाटलं की काहीतरी निमित्त करुन ईश्वर त्याचे खेळ खेळत असतो. आपण फक्त त्याचे गुलाम. पण मोरपीसांनी भुर्जपत्रांवरती ‘ मां निषाद मैथुना..’ .या पहिल्या काव्याने सुरुवात करुन अवतार पुर्व श्रीराम चरित्र लिहणारा महात्मा वाल्मिक म्हणजे देवाला ही आपल्या लेखणीवर नाचवणारे दैवी कृपा लाभलेले पात्र. या आद्यकवीचे दर्शन घेऊन कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. कदाचित मनातल्या मनात म्हणालो देखील हे काव्यतिर्था तुझा निसटता कृपाकटाक्ष आम्हांवरती असु दे.. ‘यस्याः कटाक्षमात्रेण जायन्ते विबुधा नरः’ त्या समाधी स्थानाचं  दर्शन घेऊन मी घरी आलो.

दोन दिवस मग खुप काम पडलं. वाचायला तर वेळच मिळाला नव्हता. संध्याकाळी घरी आलो. शेजारी सुवासिनींचा काहीतरी कार्यक्रम होता. आई तिकडेच गेली होती. अंगभर आळस दाटुन आला होता. बॅग बाजुला ठेवली अन् तडक बिछाण्यावर पडलो. दिवसभरच्या कामाने शिण आला होता. कधी झोप लागली ते कळलच नाही. साधारणतः आठ साडे आठ झाले असतील आईचा प्रेमळ हात अंगावरती फिरला. पानं केली होती म्हणुन ती उठवायला आली होती. जेवणं झाली. प्रेमा दिदी माहेरी आली होती. तिच्या येण्याने सारं घर कसं आनंदाने न्हाऊन निघालं होतं. ओसरी वरती टांगलेल्या पिंजर्‍यातील राघुला ती मिरच्या भरवत होती, स्वातीने अंगणात चटई टाकली. लहाणपणी असचं उघड्या आकाशाखाली आम्ही सारीपाट खेळत असु. अंगण चांदण्यांनी सजलं होतं. लाईट काही कारणामुळे गेली होती. तारांगणात असंख्य तारे सजले होते. गडद अंधारात चांदण्याही तितक्याच गडद दिसतात. फिकट दिसणार्‍या चांदण्या देखील गडद होत जातात. पुर्वेला पातळ चंद्रकोर निघाली होती. पलीकडे केळीच्या खुंटांवर पाने लवुन दाटीवाटीने काळोखात बसली होती. तुळशीसमोरचा दिवा वार्‍यात कसातरी तग धरुन होता. शारदाताई अन् आई सोप्यावरती गप्पा मारत बसल्या होत्या. स्वाती, अन् मी चटईवरती गप्पा मारत बसलो होतो.                                                                                

''किती मस्त चांदणं पडलयं ना दादु ?''                                                                                            

''हो गं छान वाटतयं खुप...'', मी                                                                                                      

''क्षितीजावरच्या लुकलुकणार्‍या चांदण्या पाहिल्या की मन कस चकोरासारखं होतं, नाही ? मी रोज पुजेसाठी फुले गोळा करते ना त्यावेळीही असचं चांदणं पडलेलं असतं. वेलीवरची फुले वेचताना अचानक आकाशात नजर गेली ना.. कि वाटतं ही फुलं वेचताना यांच्या बरोबरचं तारांगणातील चार दोन चांदण्याही वेचुन घ्याव्या अन् अलगद वेणीमध्ये माळाव्या. मी फक्त कुंदकळ्यांसारखी अबोल होऊन पहात राहते. आकाशातील कुठल्यातरी फिकट चांदणीशी नजरानजर झाली ना की मी माझी उरतच नाही. वेलींवरच्या फुलांशिवाय बाकी कुणी बोलत नाही. दवांनी भिजलेल्या लुसलुशीत गवतावरती हळुच पाऊल चालु लागतात. पायांमधली अवखळ पैंजने छन छन छन छन जागी होतात. खुपदा असच होताना मात्र खुप वेळ सरलेला असतो. चांदण्या फिकट..आणखी फिकट होत जातात. मी ओली फुले अन् हिरवी पाने भरभर वेचुन घेते. माजघरातुन आईचा.. माई..माई..गं असा आवाज अगदी सुपारी बागेपर्यंत येतो अन्  घाईघाईत टोकरीतली फुलं वारा हळुच आपल्यासोबत घेऊन जातो.'' भिजल्या कातळासारखी स्वाती बोलत होती.

'' किती छान बोलतेस गं ?'', मी तिच्याकडे पहात म्हणालो.

''मी ? अंहं.. माझ्यापेक्षा माझी वहिनी छान बोलते'' , गालातल्या गालात हसुन स्वाती म्हणाली.        

''अं? '', मला अगोदर तिच्या बोलण्याचा रोखच कळला नव्हता..                                                   

''नाही म्हणजे मी रोज एक काम करत जाईल, कि वहिनीलाच नेत जाईल फुलं तोडायला सुपारी बागेत. तुझी काय हरकत ? अं हरकत नकोच.. दादापण माझा अन् वहिनीही माझीच त्यामुळे काहीच प्रश्न नाही. न जाणो, कधी हाती न लागलेल्या चांदण्या तिच्या सोबतीने हाती आल्या तर.. . ? ''

स्वाती आपल्या नेहमीच्या पध्दतीत बोलत होती. अचानकचं ती स्वतःशी थांबली काहितरी चुकल्याचुकल्यासारखी जीभ चावत म्हणाली

''अरे चुकले चुकले तिला घेऊन गेले तर त्या शुभ्र चांदण्या हाती लागायच्याच नाहित.''

मला काही कळलचं नाही मी सहज विचारलं,

'' का बरं?''

''अरे दादु चांदण्या वेचायला बरोबर चंद्र घेऊन गेले तर हातात चांदण्या लागतील कश्या ?''

हो, कोपरखळी मारायला हिच्यापेक्षा वरचढ कुणी असुच शकत नाही. मी गप्प बसलो. हा शालजोडीचा सत्कार स्विकारुन मी उठलो. बहुदा लाईट आली असावी. जिन्याकडे जाणार तोच स्वातीचा आवाज आला,                                                                                                                                 

''दादा उद्या सुट्टी आहे ना रे..?’’                                                                                                     

''का बरं.. ?'',   जाता जाता मी विचारलं..                                                                                        

''अरे म्हटलं सकाळी येशील का माझ्यासोबत सुपारी बागेत ? नाही म्हटलं तुला पहाट काय असते ते दाखवते. नाहीतरी कुंभकर्णासारखा झोपलेलाच असतोच सुट्टीच्या दिवशी.  लवकर उठ झाडावरच्या कळ्या नुकत्याच उमलायला लागतील ना अगदी त्यावेळी मी उठवेन तुला. अन् रोजच्यापेक्षा जरा वेगळा अनुभव घेशील. येशील का मग ? ''

माझ्या ओठांतुन नकळत होकार बाहेर पडला. वरती आलो. लाईट अचानक गेल्याने वरुन थडथड नाचत खाली येणार्‍या स्वातीने खिडक्या लावल्या नव्हत्या. माझ्या टेबलवरचे कागद खिडकीतुन येणार्‍या वार्‍याने अस्ताव्यस्त झाले होते. मी हळुहळु ते उचलुन जुळवु लागलो. खिडकी जवळच्या टेबलवर एक अस्वस्थ पुस्तक स्वतःशीच फडफडतं होतं. पानझडीच्या दिवसांत झाडाच्या फांदीवरती कुठेतरी स्वांतसुखी पानासारखं ते पान दिसतं होतं. मी जरा जवळ गेलो.  ती कवी श्रीधर लिखित श्रीरामविजयाची प्रत होती. फडफडणार्‍या पानाला बोटांचा आधार देऊन मी फडफड बंद केली. मी जेव्हा ते पान पाहिलं त्यावेळी मी स्तब्ध झालो. अचानक हे रामायण आलं कुठुन ? अन् त्यातुनही जे पान स्वतःशीच एकाकी फडफडत होतं. त्या पानावर वाल्मिकीचं चित्र होतं. ही विलक्षण योगायोग होता. योगायोग म्हणता येईल का? कदाचित नाही ..कदाचित हो  पण मी त्या चित्राकडे पहात राहिलो. विचारांची भागीरथी झुळझुळ वाहत होती. मनात कुठेतरी वाटलं हे फडफडणारं पानं काहीतरी सुचवतयं. मी शांतपणे ग्रंथ हातात घेतला. भगवान वाल्मिकींच्या टिकेवरुनच हा ग्रंथ सिध्द झाला होता. श्रीधराने लिहलेला श्रीरामविजय ग्रंथ श्रावणात घरोघरी चालायचं. लहान होतो त्यावेळी या पोथीतील अध्याय संपल्याची खुण म्हणुन आम्ही स्वस्तिश्री रामविजय ग्रंथ सुंदर , संमत वाल्मिक नाटकाधार ही ओवी लक्षात ठेवत असु.  ओवीबध्द ग्रंथ ऐकताना काही कळत नसायचं पण आण्णा खुप सोप करुन सांगायचे. संधी अन् विग्रह करुन आमच्याकडुनच शब्दांचे अर्थ काढुन घ्यायचे. ते दिवस खरंच रुपेरी चांदण्यांचे होते. ‘स्वस्तिश्री रामविजय ग्रंथ सुंदर ‘ ओवी आली की बाबाजी अबीर बुक्क्याची डबी हातात देत ग्रंथावर अबीर बुक्का वहायला सांगायचे. पुंडलिकवरदाऽऽऽ हा घोष झाला की….आरती सप्रेम जयजय विठ्ठल परब्रह्म ही दशावताराची आरती व्हायची. प्रसाद वाटला जायचा. जेवणाच्या पंगती झडायच्या, केळीच्या पानावरती मुद भात खायला मिळायचा. आता ते दिवस गेले. राहिल्या त्या फक्त पानांच्या बांधणीशी अडकुन पडलेल्या तुळशीच्या मंजिरी अन् त्याचा हवाहवासा वाटणारा सुगंध. मी कित्येक वेळ त्या आठवणीत हरवुन गेलो होतो. प्रत्येक सर्ग प्रारंभी दिलेली छायाचित्रं मी पहात होतो. सर्गासर्गामधुन जो वरी हे जग, जोवरी भाषण, तोवरी नुतन नित्य रामायण या गदिमांच्या ओळींची आठवण येत होती. चाळीस अध्यायांमधुन नित्य नुतन रामायण मला गवसतं होतं. काही दिवसांपुर्वी आईला कुणीतरी 'झोपाळ्यावरचे रामायण' नावाचं  ओवीबध्द रामायण आणुन दिलं होतं. आईला वाचायला येत नाही. ती शिकलेली नसली तरी ती खुप शिकली होती. झोपाळ्यावरती माईलेकी बसल्या की स्वाती तिला ते रामायण वाचुन दाखवायची.  असो, साडेदहा वगैरे झाले असतील माई वरती आली. जांभईदेत तोंडापुढे चुटकी वाजवुन म्हणाली,

''दादु मग सकाळी उठवु ना तुला…?''

''हो ..पण किती वाजता..?'', मी विचारलं                                                                                 

''पहाटे साडेचार..‘’                                                                                                                      

''बापरे इतक्या लवकर ?''

''इतक्या लवकर कुठे रे .. रोजचाच वेळ असतो माझा तो. पण उद्या तु उठणार म्हणजे मला अर्धा तास तरी आधी उठायला हवं…चलं गुड नाईट मी झोपते लवकर अन् तुही झोप सकाळी मी उठवते तुला..''

झरझर आली तशी ती झरझर निघुनही गेली. पायर्‍या उतरताना तिच्या पैंजनांचा अस्पष्ट होत जाणारा आवाज तेवढा कानावर येत होता. मी आवरा आवर केली. अन् डोळ्यांवर झोपेची चादर ओढुन घेतली.    

स्वातीच्या पहाटबोचर्‍या आवाजाने मला जागं केलं. सांगितल्याप्रमाणे तिने मला उठवलं. पटपट उरकुन घे सगळं अन् आंघोळ करुन खाली ये. स्वातीचं न्हाऊन झालं होतं. आईची मागच्या अंगणात झाडलोट सुरु होती. आंघोळवगैरे झाल्यानंतर मी खाली आलो. जिना उतरताना मी नकळत म्हणालो उठा राघवा उठा राजसा ..मला माहित नाही ते शब्द ओठांवर का आले ते.. हातात फुलांसाठी टोकरी घेऊन स्वाती उभी होती. सुपारी बागेच्या दिशेने आम्ही चालु लागलो. आकाशात चांदण्या गडद दिसत होत्या. शुक्राचा तारा उगवला होता. गार वारा अंगाला भिडला त्यात उत्साह भरुन राहिला होता. दुर विठ्ठल मंदिरात काकड्यासाठी वाजणारा मृदंग धिमी  धीमी वाजत होता. बागेत फुले उमलु लागली होती. स्वाती हातात कळशी घेऊन मोगरीला पाणी घालत होती. बागेला पाटाचं पाणी होतं. तरी काही झाडांना ती स्वतः पाणी घालायची. मोगरीचं आळं एकीकडुन अशक्त झाला होतं. घातलेलं पाणी हळुहळु त्या बाजुला आलं अन् भळाभळा बाहेर वाहु लागलं. हातातली कळशी तिने बाजुला ठेवली. बाजुची मातीने ती आळं सारखं करत होती. मला स्वातीचं कौतुक वाटलं. मी मुद्दाम म्हटलो…              

''अगं स्वाते कपडे खराब होतील ना आता तुझे मातीने..''

ती फिक्कट हसली अन् म्हणाली, ''झाले तर झाले. ही मोगरी खुप फुलं देते. हिची बटमोगरीफुलं देवाला वाहिली ना की सारा गाभारा कसा सुगंधित होतो. अन् कपडे खराब होतील म्हणुन मातीशी नातं तोडायचं का ? ''

हे वृक्षवल्ली आम्हां सोयरे तत्वज्ञान कदाचित तिला जास्त समजलेलं. मी काहीच बोललो नाही. आभाळातील जाईची फुलं मी पहात होतो. सप्तर्षीचा तारा. शुक्र, व्याध, धृवमत्स्य, मत्स्यपंज सारं अबोल आकाश..मनातल्या मनात भुपाळी गुणगुणणारं.. हातात फुलांची टोकरी घेऊन स्वाती फुलं गोळा करत होती. कोणतं फुलं आज अन् कोणत उद्या हे तिला चांगलचं ठाऊक होतं. जाई, जुई, मोगरा, प्राजक्त, चाफा, जास्वंद, मंदार, मालती फुलांची टोकरी भरुन गेली होती. ती फुलं तोडताना लता वेलींविषयी माहिती देत होती. हा विहानानुभव मला नवीन होता. हिरव्या हिरव्या पानांवर अत्तर सांडल्यासारखं दंव पडलं होतं. हळुहळु उजाडायला सुरुवात झाली. पक्षांचे स्वर गडद होऊ लागले. उठा राघवा उठा राजसा ..मी गुणगुणत होतो. घरी आलो. समोरचं टेबलवरती पेन अन् कागद पडला होता. ते शब्दब्रह्म प्रगटलं अन् भुपाळीच्या रुपाने शब्दाशब्दांच दहिवर मनभर पसरत गेलं. 

उठा राघवा, उठा राजसा अरुणोदय झाला ।। ध्वृ ।।

पुर्व दिशेला गुलाल उधळीत

बाल रवी तो निराळ उजळीत

उदय होतसे वेदध्वनींचा शंख सुखे वाजला ।। १।।

                                                             राघवा अरुणोदय झाला….

यज्ञ मंडपी जमुनी मुनीजन

श्री विष्णुंचे करिती पुजन

पुजनीय त्या परमात्म्याचा अंश पहा पातला ।।२।।

                                                             राघवा अरुणोदय झाला….

सडे शिंपिले दारी अभिनव

प्राजक्ताचे रंग नुतन नव

नव पुष्पांसम बहरुन येऊन मोद अमित मातला ।।३।।

                                                             राघवा अरुणोदय झाला….

मलयगिरीहुन संथ झर्‍याहुन

गंध धावतो वृक्षशिखांवर

वृक्षशिखांशी कोकीळविणे पंचम स्वर लागला ।।४।।

                                                             राघवा अरुणोदय झाला….

दुग्धपान गो-शावक करिती

गोधन दोहत युवती गाती

गात चालले भाट भुपाळी छंद गोड योजला ।।५।।

                                                             राघवा अरुणोदय झाला….

गगणपटावर दिसते लाली

काय रंग तो तुझीया गाली

या गालीचे तेज पाहता सुर्य नभी हासला ।।६।।

                                                             राघवा अरुणोदय झाला….

तुझिया निढळी सुर्य प्रकाशे

तु चंद्रासम लोभस हासे

हास्य पाहाया या ओठींचे वात जरा थांबला ।।७।।

                                                             राघवा अरुणोदय झाला….

ही तेजाची सुरु आरती

रथा दौडवी अरुण सारथी

उठा, राघवा स्वर्णमखातुन मित्र पुन्हा जन्मला ।।८।।

                                                             राघवा अरुणोदय झाला….


मी लेखणी हातावेगळी केली. जाणवलं की, कोकीळ मंजुळ गाते पण तिचा बोलविता धनी मात्र वेगळाच असतो.  माहेरपणाला आलेल्या सख्यांसारख्या ओळी जमत होत्या. फेर  धरत होत्या. नाचत होत्या. गात होत्या. ही सर्व त्याचीच लिला होती. मी फक्त निमित्त होतो. राऊळांत घंटा झडत होती. प्राचीने लाल रंग उधळला होता. अन् हासर्‍या उषेमध्ये मी राममंदिराचा झळकणारा कळस पहात होतो. नकळत मनाचा भाव प्रगट झाला अन् त्या सोनेरी कळसाकडे पहात मी पुन्हा म्हणालो. यस्या: कृपाक्षमात्रेण जायन्ते विबुधा नरः