गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

सर्वस्व तुजला वाहुनी.....

               शनिवारवाड्यातील गणेशमहालाच्या भग्न अवशेषांशेजारी उभ्या असलेल्या फणसाच्या झाडाखाली आम्ही दोघे बसलो होतो. वैशाखाचे दिवस होते. डोक्यावरती भानुबिंब आलं असलं तरी त्या दाट सावलीत त्याची दाहकता जाणवत होती. हजारी कारंजा आपल्या सहस्त्र मुखांनी तुषार उडवत होता. फडाच्या चौकात आतपाचा खेळ चालला होता. काजळाने उजळलेले तिचे मोहक नेत्रव्दय डाव्या बाजुस उभ्या असणार्‍या चिरेबंदी बुरुजावर खिळले होते. बर्‍याच वेळ कुणीच काही बोलत नव्हतं. उजव्या बाजुच्या जिन्याच्या पायर्‍या चढुन, गणेशव्दाराच्या सज्जावर जाऊन आम्ही उभे राहिलो. दोन डोळ्यांमध्ये लालमहाल भरत होता. जरीपटक्याचं भगवं निशाण मोठ्या डौलाने त्यावरती फडकत होतं. त्या ध्वजाला मी मनोमन वंदन केलं. वाहणार्‍या वार्‍यात उष्मा वाढतच होता.

'' काय पाहतोय?'',  वार्‍याच्या झोताने ढळलेली आपली बट कानाशी एकसारखी करत तिने विचारलं.

''लालमहाल’’, मी शांतपणे उत्तरलो.

''त्यात काय आहे एवढं? '', तिच्या लिंबकांती चेहर्‍यावरचा अल्लड प्रश्न.

"प्रासादो जगदिश्वरस्य जगतामानन्दोऽनुराज्ञया, श्रीमच्छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत ।।"

 संस्कृताची उत्तम जाण असणार्‍या हिला मराठी भाषांतराची गरज नव्हती, माझ्या या उत्तराने ती प्रसन्न हसली.  

''दिपा, एक विचारु का?'' 

"विचारा ना"

माझ्या रुकारासोबत तिने नजर उंचावली. सज्जाच्या भिंती लगत उभी राहुन ती बोलु लागली.

''दिपा, महाराजांविषयी तोंडभरुन लिहलं गेलं. अगदी कवींद्र परमानंद, कवी भुषण असो वा असो सभासदकार यांनी सईबाईंविषयी तितकसं लिहलेलं अढळत नाही.  कधी कधी मी शिवकालीन पत्रसंग्रह वाचते त्यावेळी त्या अष्टकोणी शिक्यात वर्धिष्णु श्रीमानयोगी  जसे मला दिसतात तसचं मर्यादेच्या मोर्तबातही मला सईबाईंचा नितळ चेहरा दिसतो. म्हणतात, गंगोदकाप्रमाणे थोरल्या महाराजांच्या ओठी अंती सईबाईंचं करुण नाव होतं. मग सईबाईंविषयी जास्त लिहलेलं का रे नाही मिळतं?’’

तिच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. कारण परमानंदाच्या दोन श्लोकांवर अन् सभासदांच्या एका ओळीत मला तिच्या प्रश्नाचं उत्तर देणं शक्य नव्हतं. माझ्या उत्तराची वाट न पहाता ती मंत्रमुग्ध होऊन बोलत होती. 

''परवा आम्ही मैत्रिणी गेलो होतो सईबाईंच्या समाधी वरती फुलं वहायला. नागकेशराची भगव्या रंगाची फुलं वाहताना मनात विचारांचं काहुर माजलं. पडणार्‍या पावसाच्या कुंद सरींखाली विचारांना नाना रंगांची पालवी फुटत होती. एक क्षण वाटलं, वैदेही शिवाय रामाचं चरिञ लिहता येणं अशक्य, तसा प्रयत्नही कुणी वेड्याने करु नये. कदाचित पुरुषाच्या पुरुषार्थाला स्त्री तत्वाचा स्पर्श झाला तरच ते सुर्यतेजाप्रमाणे झळाळुन निघत असावं. एकांगाने पुरुषार्थाच्या चारही सिमा गाठणं हा केवळ काजव्याचा प्रकाश.

                समोरच्या सज्जावरती नजर रोखुन ती बोलत होती. कां कुणास ठावुक, मला ना सईबाईंविषयी खुप आकर्षण वाटतं. ज्या ज्या वेळी छत्रपतींच्या नावाचा उद्-घोष होतो., त्या त्या वेळी माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते सईबाईंची करुणामय मुर्ती त्या अबोल मुग्ध मुर्तीकडे मी पहात राहते, त्या सईच्या समाधीला डोक टेकवताना मरणासन्न सई मला दिसली. दो हातावरती मरण आलं असताना तिचा प्राणसखा जवळ नाही. त्यांना कोणत्या वेदना झाल्या असतील ? महाराजांसाठी जीव कसा घुटमळला असेल? महाराजांसाठी त्या पतिव्रतेने कोणत्या विनवण्या देवापाशी केल्या असतीलं ? कुणाला काऽऽही माहीत नाही. तिच्या काळ्याभोर डोळ्यांत हलकेच पाणी तराळले. अंगी अष्टांगभाव दाटलेल्या. सभापंडिता मैत्रेयीच्या अगम्य वैखरी वाणीने ती बोलत होती. 

''तु कधी विचार केलाय का तिच्या विषयी? मला ऐकायचयं तिला तुझ्या शब्दांत, कधी ऐकवशील ?, ''

तिच्या या प्रश्नाने मी थोडा हैराण झालो. आजपर्यंत मी कधी सईबाईंविषयी जास्त वाचलं नव्हतं. बराच काळ ती अखंडपणे वाहणार्‍या पवित्र जान्हवी सारखी बोलतं होती. ती खुप बोलते. पण ती वाचाळ नाही. तिची एक खासियत आहे. इतिहासाच्या मुकेपणाच्या बर्‍याच जागा आहेत तिला तोंडपाठ …पण तीही आहे एक किमयागार… जाणुन घेते बर्‍याच गोष्टी , मुकेपणाच्या निर्विवाद पोकळित अडकलेल्या…तिचा खळखळाट सुरुच होता.अन मी…शांत…..एकदम शांत….
ब्रेक लागल्यासारखी ती थांबली

"इकडच्यांनी… मौनव्रत धारण केल आहे का…?" भावओल्या पेशवाईच्या शीलसंपन्न भाषेत तिने विचारलं.
" काही नाही हो…कुंद पावसात खळखळणारा झरा ऐकत होतो…!" मी तिला हव्या असणार्‍या भाषेत उत्तर दिलं.

माझ्या या उत्तरासरशी डोळ्यांना भिडलेलेकाजळ लावलेले तिचे सुंदर डोळे लाजेने खाली उतरले. 

"काहीतरीच तुमचं! आम्हाला का ते ठावुक नाही ? सासुबाईंच्या कानी घालु हा आम्ही हे ! तिच्या या लाघवी बोलण्याने मी आवाक झालो, चमकुन वर पाहीलं. ती कावरीबावरी झाली होती. नजर चुकवित गडबडीने ती जिन्याकडे वळली. मी तिला हाक मारली, "अहो ! "
पणही हाक ऐकायला ती थांबलीच नाही. ती गडबडीने पायर्‍या उतरुन जिन्याच्या तळाशी आली तर संकट तिच्यासमोर दत्त म्हणुन उभं होत. त्या तीन वात्रट कार्ट्या !  तिची छाती धडधडत होती. सारा चेहरा घामेजला होता. कदाचित त्यांच्या लक्षात आलं असावं. त्यांनी तिला विचारलं

" काय गं , काही झालं का ? "

त्यांचा शब्दसंकेत ध्यानी आल्याने ती प्रसन्न हसली. मी जिन्यातुन खाली आलो तेव्हा ती हजारी कारंजाचे उडणारे तुषार झेलित थांबली होती. का ते नाही माहीत मला. पण त्या सहस्त्र कारंजाच्या तुषारांशी खेळणारी रमा मला तिच्यात दिसली.

वळव्याच्या पावसाची एक सुंदर सर आली. वाहणार्‍या वार्‍यात मातीचा सुगंध मिसळला होता. अब्द अब्द धुमितेकडे निघाले होतं. हस्त नक्षत्र माझ्या हातात होतं. दिल्ली दरवाजाच्या बाहेर निघताना, चित्रा, उत्तरा अन् स्वाती या नक्षत्रांसमावेत तो पाऊस मुक्तकंठाने हासत होता.

   रात्री सहज तिची आठवण आली. तिच्या नाजुक, तलम, पालवी सारख्या, तांबरीदुपारीच्या फुलांसारख्या लालचुटुक ओठांनी केलेलं मुग्ध भाषण आठवलं. तिच्या शब्दांत गुंतत गेलो. शब्द शब्द आठवतं गेलो. तु कधी विचार केलाय का तिच्या विषयी ? मला ऐकायचयं तिला तुझ्या शब्दांत, कधी ऐकवशील ? तिचा हा सावरीच्या फुलासारखा प्रश्न !! उत्तर देणं ही तर माझी गरज होती. मी लिहायला घेतलं. लेखनी झरझर वाहु लागली.

               सुर्य अस्ताला जाऊन एक घटिका लोटली होती. महालाच्या महिरपी कमानी, खिडक्या, तावदाने आतल्या प्रकाशाने उजळले होते. वैद्यांची वर्दळ आज जास्तच जाणवत होती. खालच्या चौकातील कोपर्‍यांना मशाली उजळवतं होत्या. सईबाई राणी साहेबांच्या महाली मांसाहेबांसह राणीवसा उभा होता. सईबाईंची प्रकृती जास्तच खालावली होती. मांसाहेब त्यांच्या उशाशी बसुन त्यांचे केस कुरवाळित होत्या. समया तेवत होत्या. धुपदाण्यांतुन धुर चढायचा थांबला असला तरी, महालात रातराणीचा सुगंध रेंगाळत होता. दबलेल्या आवाजात राणीवसा ऐकमेकिंत बोलण्यात गर्क झाला होता. त्यांच्या आक्कासा ज्वराशी झगडत अंथुरणाशी तळमळत होत्या. डाव्या बाजुला असलेल्या चिकाच्या पडद्याआड पुतळाबाई रडणार्‍या शंभुराजांना शांत करण्याचा प्रयत्न करित होत्या. महाराजांच्या प्रत्येक राणींच्या देवघरातील देव पाण्यात होते. कुलस्वामिनी तुळजाभवानीला रात्रंदिवस अभिषेक सुरु होता.

               काल रात्रीपासुन ज्वराने अधिकच उचल खाल्ली होती. राणीसाहेब पाण्यावाचुन तडपणार्‍या मासोळी सारख्या तळमळत होत्या. मात्रा उगाळुन वैद्यराजांचे हात थकले होते. सईबाईंनी मासाहेबांचा हात हाती घेतला, मासाहेबांना तो उष्ण स्पर्श जाणवला. अंग विस्तवाप्रमाणे फणफणत होते. त्यांच्या कपाळाभोवती घर्मबिंदु साचले होते. अशक्तपणामुळे शरीर क्षीण झालं होतं. नेत्रांभोवतीची काळी वर्तुळे सोडली तर सार्‍या चेहर्‍यावर गव्हाळी रंगाचा उजाळा दिसत होता. कमानदार भुवयांच्या मध्ये अर्धचंद्राकृती कुंकु उठुन दिसतं होतं. आजारपणामुळे क्षीण झालेल्या सुकलेल्या ओठांवर फक्त दोनच शब्द नांदत होते. स्वामी...

                एव्हाना तिन्हीसांजा ढळुन दिड प्रहर झाला होता. सईबाईंच्या महालात ऐकमेकांना समांतर अशा हारित उभे असलेले शिसवीचे खांब अन् त्यांनी तोललेले लाकडी छत देवघराकडे निमुळते होत गेले होते. मेघडंबरीच्या रुपाने त्याचीच एक बाजु खाली उतरली होती. त्या मेघडंबरी खाली अष्टभुजा आई तुळजाभवानीची काळ्या पाषाणातील मुर्ती होती. मां साहेब त्या मुर्तीकडे केविलवाण्या नजरेने पहात होत्या. रात्र वाढत होती. मांसाहेब वगळता इतर राणीवसा आपापल्या महाली निघुन गेला. आकाशात चंद्राची धीट कोर उगवली. महिरपीतुन येणार्‍या चंद्राचा प्रकाश सईबाईंच्या कानातल्या हिर्‍यांच्या कुड्यांवर पडुन तो त्यांच्या गालावरती निखळला होता. त्यांच्या मनात आज वसंत फुलला होता. आठवणींचा हा असला फुलोरा कधी कुणी पाहिला नसावा. सईबाईंचं भान हरपत चाललं होतं. आपल्या डोळ्यांनी आपल्या गत जिवनाचा प्रवास त्या पहात होत्या. सईच्या कितीतरी आकृत्या त्यांच्या डोळ्यासमोर आज येऊ लागल्या. फलटणच्या निंबाळकरांची परकरी सई. पुण्यातील कसबाच्या लालमहालात भोसल्यांची सुन म्हणुन वावरलेली सई, सासु-सुनेचं नातं विसरुन आऊसाहेबांच्या गळ्याशी अवखळपणे मिठी मारताना त्यांच्याही  नकळतपणे त्यांची सुन झालेली सई. सखुबाईच्या लग्नात सासुबाई झालेली सई, स्वराज्याच्या पहिल्या वहिल्या बाळाची आऊ झालेली कृतज्ञ सई !! सईच्या कितीतरी सावल्या किती तरी रुप त्या पहात होत्या. त्या हरेक सावलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. हाती काहीच लागतं नव्हतं. प्रत्येक सावली त्या हरवत चालल्या होत्या. अंगीचं सगळं सईपणं त्यांनी एकवटलं, जिवाच्या निकराने त्यांनी एक ना एक छटा चोखाळुन पाहिली. पसरलेला सारा प्रकाश कवेत घ्यायला गेलं की अंती दिवाच हाती लागतो तशीच एक छटा त्यांच्या हाती लागली. हो पण ती त्यांची नव्हतीच. सारं सईपणं एकवटुन जी एक प्रतिमा निर्माण झाली होती ती होती त्यांच्या स्वारींची, स्वामींची !!

               सजलजलदघन वर्णाची, मर्यादा पुरुषोत्तमाची प्रतिमा !! चंद्नकिरणांनी अभिषिक्त झालेला जिरेटोप, त्यावरती मोत्यांचा तुरा, अंगात पांढराशुभ्र चुणीदार अंगारखा, पायात सुरवार, भालप्रदेशी शिवगंध, रेखाटले होते. त्यावरती कस्तुरीचा टिळा शोभत होता. समुद्राची अथांगता असणारे करारी डोळे अन् गरुडालाही लाजवेल असं उन्नत नासिक. कानातील भिकबाळ्या त्या गंभीर चेहर्‍यावर सुर्यबिंबाचे तेज फांकित होत्या. गळ्यात आई तुळजाभवानीची कवड्यांची माळ होती. कमरेभोवती लपेटलेल्या जरतारी गुलाबी शेल्यात बिचवा कट्यार अन् पल्लेदार तलवार खोचली होती. ओठांतुन जगदंब जगदंब हे मेघगंभीर शब्द उमटत होते.त्या प्रतिमेचे शिवदर्शन होताच त्यांचे उरलेसुरले भानही हरपले. काळाचा पडदा मनात आलेल्या वादळाने अचानक नाहिसा झाला. अक्षी नेत्रांच्या संदुकीमध्ये लपवलेल्या कितीतरी मोहक आठवणी त्यांच्या डोळ्यात तराळु लागल्या. एका पणतीने दुसरी पणती उजळवावी, दिवेलागणी होता होता दिपमाळ सजावी असचं झालं. आठवणींची एक भली मोठी पुष्पमाला घेऊनच रायगडीं हळवी पाखरं सईबाईंच्या पुढ्यात येत होती, बागडत होती. बघता बघता त्यांची जिवनवेलं फुलुन आली. किती रंगांची, गंधांची, आकारांची फुलं त्यावरती उमलली होती. सईबाई एक-एक फुल हाती घेत होत्या. प्रत्येक फुलांत एक आठवण होती. त्या फुलांच्या गंधकोषात पाहु लागल्या. एका फुलात दडलेलं होतं शिवबासोबतं लाल महालात टाकलेलं पहीलं पाऊल, सख्यांच्या आग्रहास्तव पहिल्यांदा घेतलेलं इकडच्यांच नाव. पिवळ्या रंगाच्या फुलामध्ये एक प्रशस्त आठवण होती. रायगडाच्या अंतःपुरात महाराजांना औक्षण करताना त्या तेजस्वी डोळ्यांशी झालेली नजरा-नजर, तबकातील निरंजनाच्या प्रकाशात दिसलेलं भव्य शिवगंध, अन् त्यावेळी आऊसाहेब महाली आल्याचही लक्षात आलं नव्हत कुणाच्या, एका सफेद फुलामध्ये राजांच्या छातीवर माथा टेकवताना गळ्यातील कवड्यांच्या माळांचा झालेला रोमांचकारी स्पर्श भरला होता. किती किती ताजी फुलं होती ही. चौदा रत्नातील एक असणार्‍या पारीजातकाच्या फुलांच्या सारखीच. मागे केदारेश्वरावरती रुद्र केला त्यावेळी महाराजांनी स्वहस्ते केदारेश्वरावरती धरलेलं सुर्यपत्र, त्यांच्या मागे सुवर्णकलश डोक्यावरती घेऊन चाललेली सात पाऊले; गज,अश्व,रथ, चतुष्पाद, गोष्ठ, वल्मिक, हाट अन् संगम या सात मृत्तीकांनी राजांसोबत तयार केलेलं भव्य शिवलिंग. मालती, मल्लिका, जाई, जुई, कारोंटी, चाफा, मोगरा, नागकेशर, पुन्नग, मोह, चमेली, बकुळ, कमळ, कुंदर, गुलाब, रातराणी या वनसंजिवक पुष्पसंभाराने सजवलेली मंदीराची वाट. यज्ञ सांगता समयी वेदींवर समस्त ब्रम्हवृंदांच्या, आऊसाहेबांच्या, अग्निनारायणाच्या साक्षीने राज्ञीसन्मान म्हणुन महाराजांनी त्यांच्या केशसंभाराच्या सुबक खोप्यामध्ये सुवर्णफुल माळलं होतं. ते राजलक्षण होतं. अनाहुतपणे त्यांचा हात वेणींमध्ये गेला. त्या सुवर्णफुलाचा स्पर्श होताच त्यांच्या क्षीण चेहर्‍यावर प्रतिपदेच्या चंद्राच हास्य उमललं. 

 

               अवघी रात आठवणींत सरली होती. मांसाहेब अजुनही त्या तुळजाभवानीसमोर जपाची माळ ओढत होत्या. गार वारा सुटला होता. ब्राम्हमुहुर्त सुरु झाला होता. ब्रम्हगिरीकडुन येणारा वारा सईबाईंच्या अंगाला बोचु लागला मग आऊसाहेबांनी त्यांच्या अंगावरची शाल एकसारखी केली. ध्रुवमत्स्य तारका ध्रुवासोबत विझत चालल्या होत्या. वायव्येच्या कोपर्‍यातली समई अजुन तेवत होती. वाहणार्‍या वार्‍यावरती सुर जागे झाले होते. पण ती मंदिरात गाणार्‍या भाटाची नित्य भुपाळी नव्हती. जात्यावरच्या ओव्या सुरु झाल्या होत्या.

पहाटेच्या वार्‍यावर । निशीगंध बहरला । दिगंताला गं भेदुन । रथ जानकीचा गेला ।।

दुर पंढरी पंढरी । चंद्रभागे तिरी वास । येई पाडुरंगा वेगी । कान्हा जाहली उदास ।

पंढरीच्या पांडुरंगा । तुझा गाईन काकडा ।  महाव्दारी जनी उभी । दोन्ही पाणावल्या कडा ।।

ऐके पतितपावना । तुला वाहते तुळस । सई शिवबाला देई । देवा सोनियाचे दिस ।।

                मांसाहेबांच्या डोळ्यांत क्षणभर पाणी तराळले. जात्यावरच्या त्या ओव्या विरत चालल्या होत्या. सईबाईंना थंडी बोचु लागली. अंग थरथरु लागले. आपल्या कृश शरीराभोवतीची चौहासी त्यांनी अधिकच घट्ट लपेटुन घेतली. मृत्युची चाहुल त्यांनाही लागली होती. 

                सुर्यनारायण उदासपणे क्षितीजावर आरुढ झाला. सईबाईंची शुध्द हरपली. खोकल्याची उबळ आली की जिवाचा कसा तोळामासा होत होता. धन्वंतरींनीही आता हात टेकले होते. आऊसाहेब सईबाईंच्या उशाशी बसुनच होत्या. त्यांच्या वृध्द डोळ्यांत आसवांचे झरे फुटले होते. सईबाईंच्या क्षीण झालेल्या वाणीतुन स्वामी स्वामी हाच वेदघोष चालु होता. त्यांनी फक्त महाराजांचाच ध्यास घेतला होता. आजवर सहचारीणी म्हणुन जगताना महाराजांच्या पाठीशी त्या कणखरपणे उभ्या होत्या. लग्नवेदिंवर सप्तपदी चालतांना सात जन्मांची सात पाऊले सईच्या त्या सात वर्षाच्या सान पावलांनी त्या चालल्या होत्या. वेदीवरची ती सप्तपदी आठवतांना त्यांना प्रातःस्मरणीय असणारे महाराजांचे चरणकमल आठवले. त्यांचे डोळे पाणावले. या मर्त्यलोकातील त्यांच्या भाग्याचे दोन चरण खुप दुर प्रतापगडावरती स्वराज्याच्या अबिरी वाटेवरची मोहीम फत्ते करायला गेले होते. 

                दोन करुण नेत्र आता पैलतटावरती खिळले होते. सुख दुःखाच्या पल्याडची दिशा आता राणीसाहेबांना दिसत होती. वातावरण अधिकच गंभीर होत होतं त्याचा ताण सार्‍याच गडावर सावटासारखा पसरला होता. सखुबाई, सोयराबाई, सकवारबाई, पुतळाबाई आणि इतर राणीवसा बिथरलेल्या हरणींच्या कळपासारखा भासत होता. बाळराजांना घेऊन मासाहेब उश्याशी होत्या. सईबाईंना आता काही दिसत नव्हते. विदेही अवस्था त्यांना लाभली होती. वेदना संपल्या होत्या. डाव्या कोपर्‍यात प्रत्यक्ष आई तुळजाभवानी तिच्या लेकीला माहेरी न्यायला आली होती. भावविश्वाने डोळ्यासमोर उभ्या राहिली अष्टभुजा तुळजाभवानी, अंतरीचा श्वास असणारे महाराज अन् सकलसौभाग्य संपन्न वज्रचुडामंडित महाराणी सईबाई यांच्या मध्ये एक मुक संवाद सुरु झाला.   

 

क्षणभरीच या इथे थांबले

देवा तुमच्यासाठी

लवकर येऊन राया सोडा

हृदयाच्या गाठी ।।1।।

 

आज संपले इथले देणे

हाती न माझ्या काही उरले

नक्षत्रांचे देणे तुमचे

आज नेत्री कां माझ्या भरले ?

 

सान सई ती कौतुक केवळ

आऊ जिजाऊ ममता आगर

थोर किर्तिकर आपण स्वामी

यश किर्तीचे केवळ आगर

 

धन्य सई मी धन्य सईपण

धन्य भाग्य हे सखये माझे

आज अवेळी मजला देखुन

आकाशीं तो म्रुगांक लाजे

 

नाथा लवकर आपण यावे

गात्र भिजले आज कोवळे

जातां जातां दो नेत्रीं मी

रुप भरावे आज सावळे

 

स्वराज्य व्हावे श्रींची ईच्छा

नसेल सोबत सई सदोदित

दिगंत वैभव पाहुन तुमचे

तृप्त होतील देवीं देवही

 

प्रित आपुली फुल लतेचे

सांभाळावे शंभु बाळा

माता आपण पिताच आपण

शतदा व्हावे शिवभुपाळा

 

बाले किल्यावरी फडकतो

भगवा डौलाने जोमाने

आज सई मी मनीं खिन्न कां

गिळलें सौख्य आज व्योमाने ?

 

प्रजासौख्य हे सौख्य आपुले

पुत्र स्वामिनी नसे नृपाला

रामासम हे राज्य आपुले

रामासम नृप असे जगाला

 

हास्य उमलते ओष्ठी माझ्या

हास्यातुही ते तुम्हीच स्वामी

श्वासांतुन मग तुम्हीच केवळ

मुग्ध मैथिलीचा जैसी रामी

 

नेत्रांमधुन प्राण तेवुनी

वाट पाहते तुमची देवा

यावे लवकर स्वामीं आपण

तव चरणांची घडु दे सेवा

 

चंद्रभारले जगणे माझे

चंद्रभारल्या शिवशक्तिने

आज धन्य मी असे सखे गे

कृतार्थ होईल शिवभक्तिने

 

आई भवानी आज उभी ही

मुठींत मिटल्या कौल घेवुनीं

शिवबाची मी भाग्य स्वामिनि

जाते अहेव मळवट भरुनी

 

शिवदासी मी जन्मांतरीची

एक अशिर्वच देई भवानी

शिवभाग्याच्या कुंम्कुमात या

सई जाऊ दे आज वाहुनीं...

 

               सईबाईंनी पाणी मात्राही झाली होती. आई तुळजाभवानीला अभिषेक सुरु होता. त्याचे शब्द शब्द त्या महालात साठत होते. तुळजाभवानी समोरचे मागितले. हेमगर्भाची निरंजन अचानक फडफडलं, निरंजनातील तुपाची मात्रा आता संपत आली होती. गडबडीने तुपाची धार उजवण्यासाठी पुतळाबाईंनी घृतपात्र उचललं......खुप उशीर झाला होता… त्याच वेळी अंतःपुरात आकांत उसळला. 

                भाद्रपदाच्या सरत्या पावसाला महाराजांच्या भावविश्वाचा बालेकिल्ला ढासळला होता. मनाजोगा जमलेला मनसुबा वाहुन गेला. भरलेल्या मळवटाने सकलसौभाग्यसंपन्न वज्रचुडामंडित सईबाई अवघ्या सव्वादोन वर्षाच्या शंभुराजांना महाराजांच्या हाती सोडुन महाप्रयाणाला निघुन गेल्या. 

                लेखनी शांत झाली. महाराजांना ही बातमी कळली असेल त्यावेळी त्यांची परस्थिती काय झाली असेल. सईबाई अन् महाराजं काय प्रेम असेल ना ? गंगोदकाप्रमाणे दोघांच्या ओठांवरती अंतःकाळी देखील एकमेकांची नावं. मी अंगअंग शहारलो. मला काही कळनासं झालं. कोणत्या शब्दांत हे प्रेम बांधावे ? खुप कठीण असतं हे. शब्द थोकडे पडतात. वाटतं अशी नाती सांगायलाच नको. शब्दांनी ती ऐकुही नयेत. त्यासाठी ह्रदयाचे डोळे करावे. ह्रदयाच्या कानांनीच ती ऐकावी. ह्रदयाच्या रेशमी भुर्जपत्रावर ती लिहावी. कारण ह्रदयावरच ती चपलखं बसली तरचं ती वाचता येतात. कदाचित ही भाषा अशीच असते की ती कळावी फक्त हृदयाकडुन ह्रदयाला…एक सांगु ? तिने सांगितलेल्या सईबाई मला खुप भावल्या.त्यांच अवघं औक्ष हे प्राजक्तावरती फुललेल्या फुलासारखं आहे. सईबाई पुर्णपणे कळणं खुप अवघडं असेल. पण आकाशाचा अंत न लागुनही चिमणे पक्षी प्रयत्न करतात ना ?

                तिने समजवलेल्या दाखवलेल्या सईबाई अन् तिचं ते लाघवी बोलणं अजुनही कानात घुमत होती. अचानक मोबाईल वाजला. मेसेज आला होता. मी गाल्यातल्या गालात हसलो. 

''इकडच्यांनी… मौनव्रत धारण केल आहे का…?’’ 

''काही नाही हो…कुंद पावसात खळखळनारा झरा ऐकत होतो…!’’, मी तिला हव्या असणार्‍या भाषेत उत्तर दिलं. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा