रंगमंदिरामध्ये शंभुमहाराजांच्या वाणीचा मंद्रनाद घुमत होता. शरिराच्या सर्व शक्ती नेत्र अन् कर्णाच्या ठायीं एकवटुन मी राजसंन्यास उपभोगत होतो. साबाजी अन् संभाजी महाराजांच्या इतिहासाला अनभिज्ञ संवादाच्या संगमावरती मनातील अहंकाराला मी तिलांजली देत होतो. हातात जिरेटोप घेतलेले संभाजी महाराज निर्वाणीचं भाषण करित होते.
साबाजी, शंभुदादाचा बाळराजास आशिर्वाद सांगा. महाराष्ट्राच्या महाराजाला या कमनशिब मराठ्याचा रामराम सांगा. उद्याच्या उगवत्या सुर्याला या मावळत्या सुर्याची किरणे नेऊन पोचवा अन् रायगडाच्या जुन्या राज्याची नव्या राजाला शेवटची एवढीच वाणी ऐकवा की, राजा म्हणजे जगाचा उपभोगशुन्य स्वामी !राज्यउपभोग हाच राजसंन्यास ! ना विष्णुः पृथिविपती !!
संभाजी राजांनी आपला जिरेटोप साबाजी बाबांच्या पायांवरती ठेवला. इतिहासाला आपल्या पडद्याआड करण्यासाठी शेवटच्या प्रवेशाचा अखेरचा पडदा पडला. टाळ्यांचा प्रचंड कडकडाटाने रंगमंदिर फुलुन उठलं. नाटक संपलं होतं. मागच्या आठवड्यात याच रंगमंदिरात आम्ही मृच्छकटिक पाहिलं होतं. तिला आवडत नाटक पहायला. बाहेर आलो, रात्रीचे साडेनऊ झाले होते. नाटकानंतर बाहेरच जेवण झालं. प्रभात रस्त्यावरुन आम्ही दोघेच चाललो होतो. हा हमरस्ता आम्हा दोघांनाही खुप आवडतो. या रस्त्याच्या दोन्ही बाजुला युगानुयुगे तपस्या करत असलेले वृक्ष एका हारित उभे आहेत. प्रत्येकाचं एक सुंदर अस्तित्व आहे. शाखाविस्तार, पानांचे विविध आकार, रंग, गंध, निरनिराळे पुष्पसंभार अंगावरती घेऊन अनादी कालापासुन आकाश तोलुन धरलेले हे वृक्ष महान तपस्वीं सारखे भासतात. या रस्त्यावरती अगदी इंग्रजांच्या काळातील वास्तु आपापले निरंजन अस्तित्व जतन करुन उभ्या आहेत.हिरव्या गार कुशीत लपलेली, जाई जुईंच्या वेलींनी सजलेली सुंदर घरे आहेत. त्यांची काषाय रंगाच्या कौलांनी कोरलेली छतं खुप मोहक दिसतात. रस्त्यांच्या दोन्ही बाजुंना असलेल्या स्ट्रिटलाईटच्या प्रकाशात आम्ही चाललो होतो. निस्तब्ध शांततेत अंतर काटत असलेले चार पाय. तिची विशिष्ठ गुणगुण, रागाची एक लकेर घेऊन दुसर्या रागाची छेड काढत असल्यासारखी ती करत होती. अंतरा, अस्ताई, संचारी अन् अभोगा वेगवेगळ्या रागांनी सजवुन त्याला ध्रुपदाची लकेर ओढणं तिला किती सहज जमत !!! मी शब्द शब्द शांत होतो. कदाचित माझ्या शांततेला तडा देण्याच्या हेतुनेच तिने विचारलं.
‘’काय रे ? कसं वाटलं नाटक ?’’
‘’मस्त !! मी एका शब्दांत उत्तर देऊन टाकलं.’’
‘’ तुला ते आवडणार याची खात्री होतीच मला. तशी गडकरींची सारीच नाटकं छान !!’’, आपल्या ओठांच्या दोन्ही पाकळ्यांची बैठक मोडु न देता ती प्रसन्नपणे हसली.
‘’ आबासाहेबांना, सर्व मराठे विरांना या संभाजीचा शेवटचा प्रणाम सांग. आणि सरतेशेवटी, महाराष्ट्रलक्ष्मीच्या मंगल मंदिराला, मराठेशाहीच्या माहेरघराला, दक्षिणच्या दुर्गदेवाला, राजांच्या रायबाला त्या श्रीमान रायगडाला माझा दंडवत सांग. त्याला हात जोडुन सांग की, संभाजी मोकळा असता तर तुझा भ्रष्ट केलेला गंगासागर त्याने आपल्या आसवांनी भरुन (धुवून) काढला असता. संभाजी महाराजांची भुमिका अन् संवाद खुप सुंदर रेखाटले आहेत ना ?’’, नाटकातला एक गंभीर संवाद पुटपुटत मी विचारलं.
‘’ मला ना संभाजी राजांपेक्षाही एक पात्र खुप भावलं, अन् मी तुला ते सांगितलं तर तु कदाचित हसशील मला !!, आपल्या डाव्या डोळ्याची कमानदार भुवई हलकेच उडवतं तिनं मला सांगितल.
‘’ सांग. नाही हसणार !!’’, मी शांतपणे म्हणालो.
‘’ प्रॉमीस ?’’
‘’ युप. नाही हसणार बोल तु !!’’
‘’ या नाटकात संभाजी अन् येसुबाई यांच्यापेक्षाही सरस असणारी एक जोडी आहे. शिवांगी अन् रायबाची. कदाचित तुला माझ मत पटायच नाही. पण ती जोडी मला खुपच रोमॅन्टिक वाटली. रोमॅन्टिक म्हणण्यापेक्षा सुंदर म्हणेल मी. कर्तव्याकर्तव्याची यच्च्यावत जाण असलेलं एक सुंदर नातं आहे त्यांच. कदाचित जगाच्या पाठीवरती रोमिओ-ज्युलिऐट, डायडो-इनिऍस, पेट्रार्क-लॉरा, हिरो-लिऐंडर, स्थिबी-पायरॅमस, हेलन-पॅरीस यांसारख्या अनेक जोडपांची नावं आपल्याला माहित आहेत. व्हेरोना नगरीच्या त्या रोमिओ ज्युलिएटच्या शपथा खाऊन आजही अनेक प्रेमी युगुलं त्यांच्या भावविश्वात रंगुन जातात. तोलायला गेलं तर राया अन् शिवांगी कदाचित अंमळ उजवी भरतील या सर्वांपेक्षा. अस असुनही राया अन् शिवांगी राहीली शापित गंधर्वांसारखी.एक सांगु ? कदाचीत प्रेम अन् कर्तव्य ह्या दोन्हींची जाण असणारं नातं निर्माल्यासारखं असतं. अभागी पण पवित्र !!!’’
‘’ कुठुन शिकलीस गं असा विचार करायला?’’, मी कौतुकाने म्हणालो.
सात्विक नजरेने तिने माझ्याकडे पाहिलं. वार्याने काळ्याभोर केशकलापतील कुठलीशी एक चुकार बट तिच्या डोळ्यांसमोर हिंदोळा घालु लागली. तिचा मारा चुकवण्यासाठीच कि काय तिचे चंचल डोळे पापण्याच्या पडद्या आड झाले. आपल्या हाताने तिने ती बट पुन्हा कानामागे एकसारखी केली. डोळे उघडुन ती फुलु पाहणार्या लालबुंद कळीच्या ओठांनी हसली. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देणं कसं टाळायचं हे स्त्रियांशिवाय दुसरं कुणाला अधिक माहीत असु शकत ?
तिला तिच्या प्रथम वास्तु मध्ये पोच करुन मी निघालो. कदाचीत प्रेम अन् कर्तव्य ह्या दोन्हींची जाण असणारं नातं निर्माल्यासारखं असतं. अभागी पण पवित्र !!! हे तिचं वाक्य आठवलं मी गंभीर झालो. तिच्या कडे एक दृष्टी आहे. ती दृष्टी सामान्य मनुजाची नाही. अगदी प्रमाणरेषेच्याही बाजुला जाऊन ती विचार करु शकते. आराखडे बांधु शकते. अंदाज काढु शकते. जिवनांच्या सर्व संकेतांची कदाचित तिला यादी ठावुक आहे.
मी विचार करु लागलो. खरचं रायबा अन् शिवांगी यांची कथा केवळ प्रेमकथा नाही, ती कथा आहे कर्तव्यपरायणेची. कर्माकर्म निर्णय करुन योग्य मार्गाचा निवाडा करायला लावणारी. लिहायला बसलो. राया अन् शिवांगी डोळ्यासमोरुन हालत नव्हते. राजसंन्यास संपला होता. आता कथा सुरु झाली होती. प्रेमाची, त्यागाची, अन् कर्तव्याची !
‘’घाटमाथ्यावरती आमराईमध्ये राया शिवांगीची वाट पहात होता. सुर्य पश्चिमेच्या कड्यांत नितळ मावळायला लागला होता. त्या मावळत्या सुर्याच्या प्रकाशात झाडांनी सोनसळा पांघरली होती. काळोखत जाणार्या आभाळातुन पक्षांचे थवे झाडांच्या माथी विसावत होते. लग्न झाल्या नंतर अंगावरच्या ओल्या हळदीने राया मोहीमेवरती आला होता. त्या हळदीलाही पाच वर्ष झाली होती. शिवांगीला भेटण्यासाठी तो अधीर झाला होता. इच्छा बळावलेली असताना इलाज अगदी पांगळ्या पायांनी रांगतो. अशी अवकळ जिवाला वेड लावुन जाते. राया चातकासारखी त्या चंद्रमुखीची वाट पहात होता, पश्चिमेकडील यज्ञ कुंडातील विझणार्या भानुबिंबाकडे पहात होता. त्याच्या पाठमोर्या आकृतीला अचानक शिवांगी बिलगली. अंगात रोमांच उभे राहिले. रायाने त्या शुभाननेचे दोन्ही हात आपल्या हाती घेतले. तिच्या कपाळावरची चंद्राची कोर किती मोहक दिसत होती. तिच्या काळ्याभोर डोळ्यांत हलकेच पाणी तराळलं. कितीतरी वेळ ते एकमेकांकडे बघत होते. व्याकुळ झालेली शिवांगी रायाला भेदरलेल्या पाखरासारखी बिलगली. तिने डोळे शांत मिटले होते. पाच संवत्सरापेक्षा अधिक काळानंतर ते एकमेकांना भेटत होते. कदाचित यापेक्षा अधिक विरह ती दोन्ही पाखरे सहन करु शकणार नव्हती. पण दैवाचा फासा काही औरच असतो. अचानक एक रखवालधार धावत आला. त्याने आणलेली बातमी भयानक होती. आमराईला मान्यांच्या फौजेने वेढा दिला होता. संभाजी राजा आधीच कैद झाला होता. आता येसुबाईंना पकडुन दख्खन जिंकुन घेण्याची आपली मन्नत बादशहा पुरा करणार होता. मान्यांची सहा हजाराची फौज, सेनासागरांकडे उणेपुरे पाच मावळे. आता महाराणी साहेबांची या पेचातुन सुटका तरी कशी करायची ? बरोबर आणखी दहा बारा मावळे असते तर राया राजेश्वरीच्या रणरंगाने मान्यांच्या हजारांशी हिंमतीने झुंजला असता. काय करावे? कशा रितीने महाराणी साहेबांना वाचवावे? राया स्तब्ध होऊन विचार करु लागला. एखाद्या दुसर्या वेशाने महाराणीं साहेबांस बाहेर न्यावे की, महाराणींच्या वेशाने दुसर्याच एखाद्या स्त्रीला मान्यांच्या हाती देऊन ….हो तसही मान्यांनी या पुर्वी कधीही येसुबाई राणी साहेबांना पाहीले नव्हते. जिच्या पायात सोन्याच्या साखळ्या दिसतील तिलाच माने ऐकिवाने महाराणी साहेब समजतील. पण अशी कोण स्त्री , जिच्या जिवावर मी असा उदार होऊ ? रायाच्या मनाच्या पटावर एक वेगळाच खेळ रंगु लागला. आपल्या श्यामवर्ण अर्धांगीनी कडे पहात त्याने तिला मिठी मारली. मालुसर्यांचा कुलाचार मोठा कठीण ! प्रत्येक पिढीची एक समीधा स्वराज्याच्या यज्ञामध्ये पडली होती. आज वेळ आली होती रायाच्या परिक्षेची ! श्री सखिः राज्ञी जयति महाराणी येसुबाई या मुद्रेचं रक्षण करण्यासाठी शिवांगी नावाचं आपलं काळीज राया काढुन देणार होता. शिवांगीपासुन देहवेगळा होत त्यांनी तिचे कोवळे हात आपल्या हातात घेतले. ओथंबलेल्या आभाळाच्या घनगर्द गंभीर बोलीतुन तो तिच्याशी बोलु लागला.
‘’ शिवांगी, आता देहाचे कान करुन ऐक ! कदाचित ही भेट शेवटची ! शिवगंगे, टाकीच्या घावांनीच देवपणा येतो हेच खरं. मरणचं मोठेपणा बहाल करतं असावं ! आबांनी मालुसर्यांच्या नावाला प्रतिष्ठा मिळवुन दिली. मालुसर्यांच नाव आणखी मोठं करण्याकरता रायाची ही शिवांगी त्याच रस्त्याने जाईल का? रायाचं नाव राखण्यासाठी जिवाचा मोह तुला सुटेल का? आमराईला मान्यांनी वेढा दिला आहे. राणी साहेबांना रायगडावर नेण्याची कामगिरी माझ्याकडे आली आहे. महाराणी साहेब जर या नापाक मान्यांच्या हाती सापडल्या तर थोरल्या महाराजांची पुण्याई, तानाजी नावाच्या नरसिंहाच्या आठवणी, अन् मालुसर्यांची स्वराज्यनिष्ठा एका क्षणात एखाद्या रेती सारखी उडुन जाईल. या उपर एकच उपाय मला ठाऊक आहे. या मान्यांनी अजुन राणीसाहेबांना कधी पाहिलेलंच नाही. महाराणी साहेबांच्या पायातील सुवर्ण साखळ्या पायात घालुन महाराणी येसुबाई म्हणुन तुलाच त्यांच्या जागी उभा रहावं लागेल. भोसल्यांच्या राजलक्षणांची ओळख पटल्याने माने तुलाच महाराणी साहेब समजुन मोर्यांसमोर घेऊन जातील आणि आम्ही येसुबाई राणी साहेबांना घेऊन रायगडीं जाऊ.!!! पुढे काय होईल याची कल्पना करणंही मला न जमणारं आहे. मोर्यांनी तुला ओळखल्यावर संतापाच्या भरात सुडाने पेटुन ....कदाचित....
राया गहिवरला. कंठ दाटुन आला. त्याला शब्द फुटेना.
‘’ काय होऊ शकतं याची कल्पना मी करु शकते. फक्त वेळ आलीच तर या कुडीतुन प्राण बाहेर कसे काढायचे एवढं मला सांगा’’ , शिवांगी धिरगंभीर स्वरात म्हणाली.
तिच्या या सहज स्विकाराने राया थरारुन उठला. आपल्या हातातील विषकुपी अंगठी काढुन रायाने तिच्या बोटांत घातली. शिवांगीला अन् रायालाही हे कळुन चुकल होतं ही भेट कदाचित शेवटचीच. उभयतांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. कर्तव्यापुढे सगळं काही शुन्य मानुन ही दोन पाखरे वणव्यात होरपळुन मरायलाही तयार झाली होती.
डोळ्यांतुन टपटपणार्या पाण्यासोबत कागदावर शाई झरझरु लागली.
उदास कां तु प्रिये मानसी,
कां नयनीं पाणी ?
साजणे शिवगंगे राणी ।।ध्वृ।।
वाहु लागला पावक विपरित काय वेळ ही बुरी
उडुगणांनी अंग टाकले केतुधुम तो वरी
रौद्र वीज ती नभी कडाडे भयकंपित प्राणी ।।1।।
तिन्हीसांज ही नृशंस कैसी अग्निपरीक्षा तुझी
साह्य शिवासी होण्या कार्यी केवळ दुर्गा धजी
प्राणप्रिये तु विश्वमोहीनी ऐके मम वाणी ।।2।।
ढळुं लागले चिरें भोवती येईल तो माने
त्यास हवीं ती शुद्ध मैथिली हेमगर्भ सोने
राजराज्ञी ती रक्षुण आपण होऊ अभिमानी ।।3।।
राजलक्ष्मी ती येता मागु सुवर्ण ती नुपुरें
राजलक्षणें पायीं बांधी तु वंदुन दोन्ही करें
चरण कमल ते घे प्रक्षाळुन साश्रु नयनांनी ।।4।।
शब्दपाशी ती बांधुन घेऊ सम्राज्ञी कलिका
आज शिवांगी राज्ञी अन् ती दासी तिची दिपिका
महाराणी ते रिपु न जाणती नोळखती कोणी ।।5।।
जिच्या पायी ती सुवर्ण नुपुरे तिच महाराणी
तर्क बांधतील गनिम साधा हिच ज्ञात रिती
तुलाच राणी समजुन नेतील रिपुवर ते ज्ञानी ।।6।।
अंगुलीत ही ठेवी मुद्रिका भान तयाचे धरी
पडे सांकडे शिलालागी हीच गिळंकृत करी
मुक्त शिवांगी होईल सत्वर, राखुन जग-जननी ।।7।।
बघ राणींचे आले पदरव शांत होई तु जरा
मनात ठेवी जोपर नुपुरें ना येतीं दो करां
शपथ तियेला देवुन सजनी सुभग करुं करणी ।।8।।
तुझे भाग्य हे थोर शुभांगी होशिल तु देवी
मृत्यु नव्हे हा अमरत्वाचा स्पर्श तुला जेवी
पहाटवारा गाईल तुव ही जात्यावर गाणीं ।।9।।
भाग्य भोगिले असले कोणी सांग मला आता
धन्य शुभांगी धन्य शुभांगी शिवगंगा गाता
ऐकु येईल किर्ती तुझीही रायाच्या कानी ।।10।।
एक सत्य पण मनांत सलतें माझ्या प्राणसखी
तुझ्या विणा ही अवनी सुंदर भेसुर दोन दिठीं
विर्यशलाका सखी शुभांगी ध्याईल मी ध्यानी ।।11।।
मी खिन्न अंतःकरणाने थांबलो. लेखनीचा टाक तोडला. यांची स्वामीनिष्ठा, स्वराज्यनिष्ठा कोणत्या मापात तोलायची. या प्रेमाला काय म्हणायचं ? त्यागाची ही मधुरिमा ना ओठांनी सांगता येते ना लेखनीने लिहता ! गितेत सांगितलेलं हतो वा प्राप्स्यसी स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् हे कवण कदाचित त्यांना माहीत नसावं. पण त्यांचा सिध्द कर्मयोग पाहताना, त्यांच्या साधेपणानेही मन भारावुन जातं.
लहाणपणी आम्ही सारे अंगणात झोपत असु. टिपोर चांदणं पडलेलं असायचं. आई म्हणायची देवाघरी गेली की चांगली माणसं आकाशात तारे होऊन चमकतात. मग आम्ही भावंडं आकाश वाटुन घेत असु. त्यावेळी एक ध्रुव सोडला तर देवाघरी गेलेला कुणी दुसरा चांगला माणुस आम्हाला माहीत नव्हता. उत्तरेच्या आकाशातला ध्रुव, अढळपणा अन् स्थिरता या गुणांत ज्याच्यासारखा आकाशात दुसरा कोणी नाही ! वाटणीत आलेल्या आकाशातील तारे मोजताना केव्हा झोप लागायची कळायचचं नाही. मला उगीच बालपणाची आठवण आली. मी गच्चीमधुन आकाशाकडे पाहु लागलो. वार्याची मंजुळ झुळुक वहात होती. देवाचं अंगण तारकांनी गच्च भरलं होतं. आजही त्या अनामिक चांगल्या माणसांची नावं मला माहीत नाहित.जी चमकतात आकाशात तारे होऊन. काळ्या कुट्ट आकाशात चमकणारे तारे मोजताना यानी कानीच पापानी जन्मांतरेच कृतानिच म्हणतं असल्यासारखं मी स्वतःभोवती नकळत प्रदक्षिणा घातली. आकाशवेडा होऊन कितीतरी वेळ मी त्या असंख्य चांदण्यांत राया अन् शिवांगी ला शोधत होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा