गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

हरी हरी हरी गुण गाने लगी

‘’ ए अरे परवा… म्हणजे उशीरचं झाला असता मला पण रस्त्यातच मैथिली भेटली अन् वाचले…’’, तु

‘’ काका काही बोलले का मग? मी सहज

‘’अरे नाही बोलले… वेळेआधी पोचले ना मी घरी‘’ तु आपल्या वेणीतील गजर्‍याच्या फुलांशी खेळत…

दोन क्षण शांत जायचे.. पोकळ पोकळ..पोक्त…फक्त किनार्‍यावरती धडकणार्‍या लाटांचा गाज…

‘’ मला तुला एक विचारयचं आहे’’, पुन्हा तु… यावेळी जरा जास्तच उत्साहात

‘’विचार की त्यात काय…’’

‘’ बघ हं… म्हणजे… नाहीतर नको…पुन्हा कधीतरी ’’, भिडलेले डोळे चोरुन घेत…तु… केवढी विसंगत ना स्वतःशी…गांधारीच्या फुलांसारखी…कान्हुलिशी…भरगच्च…

‘’ बरं नको सांगु ‘’, मी पण मठ्ठ मुलासारखा

‘’ विचारायचं हेच कि, का छळतोस रे मला सतत?’’ फिर्यादीच्या तोर्‍यात तु…आवेगी…उत्साही… अधिक मुखर

‘’ अं? ‘’ प्रश्नार्थक नजरेने मी

‘’हसु नको …पण तु सोबत नसतानाही का जाणवतोस रे सतत…सोबत असल्यासारखा..? अं .. ? व्ही टी वरची प्रचंड गर्दी .. माझ्यासाठी प्रचंड एकांत..पाठीवरची लॅपटॉपची जड सॅक…घामात थबथबणारी मी…..वार्‍याची येणारी कोवळी झुळुक तुचं असतोस ना रे ? मंडईमध्येही भाजीच्या पिशव्या….तुझा विचार आला की एकटीनेच का रे हलक्या होतात ? तिन्हीसांजेलाही तसंचं..आजुबाजुला सगळी कडे फोडण्यांचे वास..काही अगदी अन्नपुर्णेच्या हातचे.. खमंग..काही मात्र तेलकट.. करपुन गेलेले. …अशावेळी देवघरातुन अंगवर येणारा निर्मळ, नितळ धुप तो तुच असतोस का रे रिहर्सल असो वा स्टेज… नाचताना तिहाईतल्या प्रत्येक उतरणीवर शेवटी तुच का रे दिसतो ? मग पैंजन थकुन जातात..पाय मात्र थकत नाहीत..मन नाचत राहतं…मोहुन ..मोहरुन.. ताई म्हणतात आज काल खुपचं छान नाचतेस, मुद्रांमध्ये जिवंतपणा, चैतन्य आलयं…ते चैतन्य वगैरे म्हणतात ते तुच असतोच काय रे वेलीवरची फुलं गोळा करताना, अंगणात, रायांगणात रांगोळी काढताना, डोळ्यात काजळ घालताना, का रे असतोस हजर.. तुझ्याही नकळतं ? माझ्या समोर…? सर्वव्यापी… ? समदर्शी… ? का रे का जाणवतोस… ? का दिसतोस.. ? सतत… सोबत असल्यासारखा… ?’’, शेवटी अगदी गुदमरलेल्या आवाजातच तु… आत्ममग्न, बेभान समोरच्या सागरासारखी…अं हं समुद्रासारखी नाही… कारण त्यालाही एक किनारा आहे, तुला मात्र किनारा नसतो…तु असं बोलायला लागलीस ना की मला काहीच सुचत नाही… निरव शांततेत एकमेकांशी भिडलेले डोळे पापण्या देखील लवु देत नाहीत..पण त्या शांततेला तडा देत…

‘’ चणेवाला…चना लेलो भैय्या… दस रुपय का चना…’’, नेहमीचा चणेवाला, त्याची आक्राळ विक्राळ पांढरी मिशी, घारे करडे डोळे, स्पष्ट ब्रजभाषा... चणे घेतले की तो निघुन गेला.

‘’अरे हो... विसरलेच...परवा आपणं मिरेबद्दल बोलत होतो ना?’’

‘’ हो ना...’’

‘’ मला कालच ऐकावसं वाटत होत खुप, पण काय करणार...आमच्या ताईसाहेबांच्या घरी जाण्याची आज्ञा मातोश्रींकडुन झाली मग काय करता....’’

‘’ बरं मग काय ऐकणार मिरेबद्दल?’’ ‘’ सगळं...म्हणजे तुला जे जे माहित आहे ते ते...’’

‘’अगं तुला काय माहित आहे ते तर सांग आधी म्हणजे त्या अनुरोधाने मला पुढे जाता येईल.’’

‘’ म्हणजे जे भौतीक आहे तेच माहितेय. पण तिच्याविषयी अधिक जाणुन घेण्याची इच्छा आहे. मला एवढंच माहितेय कि..एकमत नसलं तरी विद्वान म्हणणारे सर्व लोक मिरेचा जन्म पंधराव्या शतकाच्या अगदी शेवटी शेवटी झाला असं म्हणतात. पितृमहः दादा राव दादु यांचे चतुर्थ पुत्र रत्नसिंह यांच्या घरी तिचा जन्म झाला. लहाणपणी खेळता खेळता त्या गिरीधरालाच आपला पती म्हणुन स्विकारलं.वयाच्या तेराव्या वर्षी मेवाडच्या राणा संगाचे पुत्र भोजराज यांच्याशी तिचा विवाह झाला. विवाहानंतर मेडातच्या या राजकन्येने मेवाड गाठले खरे पण तिचं खरं प्रेम त्या सावळ्याच्या मुर्तीवरच..ही मुर्ती तिने मेवाडला आपल्या सोबत नेली. त्या सर्वांगसुंदर मनोहराची ती सदैव पुजा बांधायची. मिरेचं वैवाहिक जीवन तसं वैभवाचं सुख समाधानाचं, आनंदाचं विलासाचं. पण दुर्दैव आड आलं की दुर्गती केव्हा घात करील सांगता येत नसतं ना...लग्नानंतर अवघी सात वर्षे पुरी झाली नसतील तोच तिच्या सुखाला तडा गेला. तिच्यावर वैधव्याने झडप घातली. उण्यापुर्‍या विस वर्षाच्या मिरेवरती आकाश कोसळलं. पाठ सोडतं ते दुर्दैव तरी कसलं ?. त्यानंतर चार वर्षांनी पिता रत्नसिंह अन् त्यापाठोपाठ बाबर सोबत झालेल्या लढाईत श्वसुर राणा संगा विरगतीला प्राप्त झाले. नियतीने किती तरी विकृत खेळ मांडला होता. त्या खेळाचं फलीत एवढंच की मीरेचं आयुष्य अगदी होरपळुन निघालं. माहेरी अन् सासरीही जवळचं असं कुणीच उरलं नाही. मिरेने डोळे मिटले अन् ह्रदयस्त श्रीकृष्णाची करुणा भाकली. पायात घुंगरु बांधुन ती त्यासमोर नाचु लागली. मेवाडच्या रस्त्यातुन राजपथातुन ती गोविंदाला आळवु लागली. मेवाडच्या नव्या राजाला मिरेच्या दिराला ही गोष्ट रुचली नाही. त्याने तिचा अनन्वित छळ मांडला. मिरेचे हालहाल केले. पुजेसाठी पाठवलेल्या फुलांच्या टोकरित विषारी सर्प सोडले. विष प्रयोग केले. मेडत्याचे मिरेचे काका अन् चुलत बंधु जयमल यांना मिरेचा हा छळ पहावला नाही. त्यांनी तिला मेडत्याला आणले. माहेरी त्या गोविंदाच्या भजनासाठी अनुकुल वातावरण होतं. मिरेचं प्रभुस्मरण अन् भजन अखंड चालु होतं. मिरेची दैहिक अवस्थेत विदेही अवस्थेला प्राप्त होऊ लागली. व्दैत मावळले. अव्दैताचा साक्षात्कार झाला. पुन्हा एकदा दैव फिरले. जोधपुरच्या मालदेवाने मेडत्याची गादी बळकावली. मिरेच्या वैराग्यात अधिकच भर पडली. आता मन मेडत्यातही रमेना. तिने वृंदावनाची वाट धरली. वृंदावनात रुपगोस्वामींशी तिने खुप काळ धर्मचर्चा केली. वृंदावनात त्या बाकेबिहारीची सेवा केल्यानंतर तिने अखेर व्दारीकेची वाट धरली. दरम्यानच्या काळामध्ये तिच्या चुलत बंधुने जयमलाने पुनश्च मेडत्यावरती विजय मिळवला. आपल्या ताईला तो घरी घेऊन जाण्यासाठी तो व्दारिकेला आला.पण तिचे सारे बंध तुटले होते. षड्उर्मी दग्ध झाल्या होता. तिने बंधुस सांगितले. आता नाही येणे जाणे आता जगेन अन् मरेन ते या व्दारकाधिशासमोरचं. आपल्या माहेरी वा सासरी ती परत कधीच गेली नाही. व्दारीकेच्या द्वारकाधीशाच्या मुर्तीतचं ती विलीन झाली असं सांगतात..बसं मला तर एवढंच माहिती आहे.’’ निश्वास सोडत तु.

 किती तरी वेळ तु अशीच भान हरविल्यासारखी अखंड बोलत होतीस. मी मंत्रमुग्ध होऊन तुझं हे भाषण ऐकत होतो.

‘’ अगं खरचं मला तुझ्याकडुनच मिरा जास्त माहित झाली. माझी जान्हवी फक्त अर्धोदकातील पात्राएवढी... तु मात्र उगमापासुन गंगासागरापर्यंत अखंडपणे प्रवाहित. यापेक्षा अधिक मला माहित नाही. अन् यापेक्षा अधिक काय सांगता येईल मला ?

‘’नाही पण मला मिरा ही तुझ्या कडुनच ऐकायची आहे. अगदी तुला कळली तशी..’’ तुझी विनाकारण आर्जव...

 मग  मी उगीच तोंडाला चाळा म्हणुन बडबड सुरु केली

 ‘’खरं सांगु? मिरा सहजासहजी कळत नाही. किंबहुना मिरा कळुन घेणं हा अज्ञेयापासुनचा ज्ञेयापर्यंतचा, तमातुन तेजाचा लौकिकाकडुन अलौकीकाकडे जाणारा प्रवास आहे. मिराची साध्य अन् साधनातील एकतरलता प्रसन्न करणारी आहे. ज्ञानोत्तर भक्तीची ती भक्तीमंदीराच्या कळसावरती फडफडणारी ध्वजा आहे. ती योगिनी आहे संजिवनी आहे. मिरा या नावाचे, जलराशी, तेजा, श्रेष्ठा, असे अनेक भाषांतील घटीत अघटित अर्थ काढता येतील. मिळतील. पण मिरा या शब्दाचा मला उमगलेला प्रांजळ अर्थ शुध्द समर्पण भाव हाच आहे.’’

‘’ समर्पण भाव?’’

‘’हो शुध्द समर्पण भाव, निर्मळ अंतःकरणाचा परिपाक म्हणजे समर्पण...मिरेच्या कविता भावविश्वाचं वैभव द्विगुणित करणार्‍या आहेत. बघ ना. .. मिरेच्या जिवनाची सुरुवातही अशीच आहे. भग्नाषा, मानवी पराभव, अतृप्ती पण समर्पणानेच ती परमगतीला प्राप्त झाली. मिरेचा प्रवास खडतर असला तरी तिच्यावरती आलेले प्रसंग लोकविलक्षण आहेत असं म्हणणं जरा अधिक होईल. मिरेची प्रेमसाधना ही अद्वितीय, प्रांजळ, निर्भेळ, निशांत, गंभीर, अन् वर्धनीय आहे. ती स्वच्छंद आहे. उन्मुक्त आहे. मिरेच्या काही कविता ह्या शृंगाररसाने भारलेल्या आहेत. मात्र तस असलं तरी तिने शृंगाराचं उन्नयनीकरण केलं आहे असं म्हणण्याचं कारणच संभावत नाही. मधुराभक्तीचे हेच स्वरुप कि ज्यात शृंगाराचा अंगीकभाव पुसला जातो. मिरेचा शृंगार देहीकतेच्या शृंखलांनी बांधलेला नाही. शृंगारातुन प्रसरण पावलेली अरोध प्रणयभावना संयत झाली की ती मधुरा भक्ती दिव्यत्वाला पोचते. तिने देहीक मुल्य जाणले आहे. त्याची नश्वरताही तिच्या कवितेंत ठायी ठायी व्यापुन राहीलेली आहे. अन् हो मिरा तुझ्या सारखीच विद्रोही आहे. ‘’

‘’ विद्रोही अन् मी?’’, जराशा करड्या नजरेनेच तु

‘’ हो बघना, म्हणजे घरी सती जाण्याचा कुलाचार असताना देखील मिरा सती जात नाही. ती स्पष्ट बजावते.गिरीधर गास्यां सती न होत्सां मन मोहियो घननामीअन् मिरेने सती तरी का जावं तिचं भौतिक कुंम्कुम विखरुन गेलं असलं तरी तीने त्या गिरीधराचा आपला पती म्हणुन स्विकार केलेला आहे. ती यावत् चंद्र दिवाकरौ सौभाग्यवती आहे. खरचं सामंतशाही समाजामध्ये मिरा ही पहिली विद्रोही भक्त होती.  मला मिरा किती कळली हे माहित नाही. पण तिला वाचुन कळलं ऐवढचं, की ती भक्तीची अनन्यता आहे. अकंप आहे. स्तब्ध आहे. मुग्ध आहे. निरंजनी आहे. तिच्या रचनांमधील आत्मिक सारतत्व, गुढ आशय, वैषयिक अधिस्वर ललित अभिरुचीपुर्ण शब्दचित्रण आणि भावपुर्ण प्रवाहित्व मोहुन टाकणारे आहे.’’

‘’ ए थांब थांब मिरा शब्दाचा मुळ अर्थ काय? ‘’ तु मध्येच

‘’ सांगितलं ना संस्कृतात मिरा या शब्दाचा अर्थच जलराशी सरोवर...पाण्याला भक्तीचा स्पर्श झाला की पाणी पाणी रहात नाही त्याची परिणिती तीर्थात होते. हो मिरा म्हणजे अशीच तीर्थ स्वरुप आहे. प्रवाहपतीत झालेल्यांनी मिरा हे तीर्थ घ्यावं. अन् आनंदाचे धनी व्हावं. 

            बोलणं असचं अखंडीत चालु रहायचं ना आपलं असल्या विषयांवर..? कनकगोल हळुहळु रत्नाकराच्या कुशीमध्ये शिरला. तिन्हीसांजा झाल्या. ओल्या रेतीत उमटलेल्या आपल्या पाऊलखुणांचा पहिला फोटो आपण याच दिवशी घेतला ना.. ?  

    रात्री जेवणं उरकली. मी झोपाळ्यावरती झोके घेत आपल्या गप्पा आठवतं होतो. वाटलं का बरं तु असं अचानक विचारावं...मिरा तशी मला माहीत होती. पण आज तु शिकवलेली मिरा शब्दांत उतरवावी म्हणुन केलेला हा अल्लड प्रयत्न...

विणेच्या तारांना का हे प्रश्न आताची पडले

काळिज राजकन्येचे हे कोणासाठी रडले ? ।।१।।

 

ही तहान भुक विसरोनी, लागली कुणाच्या भजनी  ?

तो कृष्ण एक चंद्रमा ही मिरा वाटे रजनी ।।२।।

 

झंकारली विणा जेव्हा, शहारला यमुना काठ

ही मिरा नसे अमिरा, ही कृष्ण भक्तीची लाट ।।३।।

 

ही जेव्हा स्मरते कृष्णा, घनव्याकुळ होऊन गाते,

पायींचे पैंजन थकते, मग कृष्णप्रिया ही होते ।।४।।

 

दो नेत्रांनी ही जेव्हा ओवाळी श्रीकृष्णाला,

ही तिचीच ती ना उरते ही जाणिव ना कोणाला ।।५।।

 

जन निंदा करते सारे, कुणी बुद्धीभ्रष्टही म्हणती,

ही मिटते डोळे तेव्हा, मनी कृष्ण कृष्ण ही गणती ।।६।।

 

ओठांस लावते आता, हा अक्षय जहरी प्याला,

मन कान्हा कान्हा म्हणते, ना अंत तिच्या प्रेमाला ।।७।।

 

मग कृष्ण जहरही होतो, त्या वेड्या मिरेसाठी,

ती कृष्ण-कृष्णमय होते, या शतःजन्मांच्या गाठी ।।९।।

 

कविता पुर्ण होते न होतेय तोच..‘’ काय दादासाहेब? कविता करताय ? आम्हांस नाही ऐकवणार ?’’, संकट स्वाती..

‘’ घ्या घ्या ताईसाहेब... तुम्हाला कविता न वाचुन दाखवणे म्हणजे मरीआईला नैवद्य न दाखवता प्रसाद भक्षण करण्यासारखेच कि हो...  ‘’ वडा करुन मी मोकळा...

‘’ हो हो... मी मरिआई अन् तु म्हसोबा.....म्हसोबा कुठला‘’, वाकुल्या दाखवत अन् रागारागात पाय आदळत संकट किचनकडे मार्गस्थ होते. अशावेळी नेमका माझा मोबाईल वाजतो. नक्कीच तुझा मेसेज असणार म्हणुन मी उठतो. मोबाईल उचलतो. अर्ध्या जिन्यात पोचतो तोच ..

‘’ जा जा डॉट आला असेल..... आपल्याला काही कळतं नाही बुवा.. आईला सांगायलाच पाहीजे ’’, कमरेवर हात ठेऊन लटक्या रागाने स्वाती..आपल्या मेसेजींगची शैली पण भारी हा.. मी मनात काहीसा विचार करत बेडवरती पोचतो. मेसेज उघडतो. .

‘’.’’ तु

‘’..’’

‘’ मोठ्याने श्वास घे ना रे....  :-) ’’,तु

‘’ का गं काय झालं? ‘’, मी

‘’ लवकर गॅलरीत जा अन् मोठा श्वास घे’’, तु पुन्हा... ‘’ ओकेहे बघ आलो... आता गॅलरीतचं आहे. घेतला मोकळा श्वास...मोठ्याने ऽ ऽ ऽ ऽ..काय झालं गं..? ’’, मी

‘’ आत्ता छान वाटलं... किती गुदमरल्या सारखं झाल होतं ...... ;-)’’ तुझा रोमॅन्टिक रिप्लाय...

तुला हे असलं सुचतं कुठुन काही कळतं नाही.. रिप्लाय काय करावा हेही कळतं नाही. माझ्याही नकळत हसतो. ही रात्र संपुच नये असं वाटतं.. गार वारा अंगाला झोंबत असतो. पिधानाचा योग ...चंद्राला खळी.अगदी तुझ्या गालावर पडलेल्या खळीसारखी... टिपोर चांदणं मग भरुन रहायचं आपल्या दोघांच्याही मनात...   

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

सर्वस्व तुजला वाहुनी.....

               शनिवारवाड्यातील गणेशमहालाच्या भग्न अवशेषांशेजारी उभ्या असलेल्या फणसाच्या झाडाखाली आम्ही दोघे बसलो होतो. वैशाखाचे दिवस होते. डोक्यावरती भानुबिंब आलं असलं तरी त्या दाट सावलीत त्याची दाहकता जाणवत होती. हजारी कारंजा आपल्या सहस्त्र मुखांनी तुषार उडवत होता. फडाच्या चौकात आतपाचा खेळ चालला होता. काजळाने उजळलेले तिचे मोहक नेत्रव्दय डाव्या बाजुस उभ्या असणार्‍या चिरेबंदी बुरुजावर खिळले होते. बर्‍याच वेळ कुणीच काही बोलत नव्हतं. उजव्या बाजुच्या जिन्याच्या पायर्‍या चढुन, गणेशव्दाराच्या सज्जावर जाऊन आम्ही उभे राहिलो. दोन डोळ्यांमध्ये लालमहाल भरत होता. जरीपटक्याचं भगवं निशाण मोठ्या डौलाने त्यावरती फडकत होतं. त्या ध्वजाला मी मनोमन वंदन केलं. वाहणार्‍या वार्‍यात उष्मा वाढतच होता.

'' काय पाहतोय?'',  वार्‍याच्या झोताने ढळलेली आपली बट कानाशी एकसारखी करत तिने विचारलं.

''लालमहाल’’, मी शांतपणे उत्तरलो.

''त्यात काय आहे एवढं? '', तिच्या लिंबकांती चेहर्‍यावरचा अल्लड प्रश्न.

"प्रासादो जगदिश्वरस्य जगतामानन्दोऽनुराज्ञया, श्रीमच्छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत ।।"

 संस्कृताची उत्तम जाण असणार्‍या हिला मराठी भाषांतराची गरज नव्हती, माझ्या या उत्तराने ती प्रसन्न हसली.  

''दिपा, एक विचारु का?'' 

"विचारा ना"

माझ्या रुकारासोबत तिने नजर उंचावली. सज्जाच्या भिंती लगत उभी राहुन ती बोलु लागली.

''दिपा, महाराजांविषयी तोंडभरुन लिहलं गेलं. अगदी कवींद्र परमानंद, कवी भुषण असो वा असो सभासदकार यांनी सईबाईंविषयी तितकसं लिहलेलं अढळत नाही.  कधी कधी मी शिवकालीन पत्रसंग्रह वाचते त्यावेळी त्या अष्टकोणी शिक्यात वर्धिष्णु श्रीमानयोगी  जसे मला दिसतात तसचं मर्यादेच्या मोर्तबातही मला सईबाईंचा नितळ चेहरा दिसतो. म्हणतात, गंगोदकाप्रमाणे थोरल्या महाराजांच्या ओठी अंती सईबाईंचं करुण नाव होतं. मग सईबाईंविषयी जास्त लिहलेलं का रे नाही मिळतं?’’

तिच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. कारण परमानंदाच्या दोन श्लोकांवर अन् सभासदांच्या एका ओळीत मला तिच्या प्रश्नाचं उत्तर देणं शक्य नव्हतं. माझ्या उत्तराची वाट न पहाता ती मंत्रमुग्ध होऊन बोलत होती. 

''परवा आम्ही मैत्रिणी गेलो होतो सईबाईंच्या समाधी वरती फुलं वहायला. नागकेशराची भगव्या रंगाची फुलं वाहताना मनात विचारांचं काहुर माजलं. पडणार्‍या पावसाच्या कुंद सरींखाली विचारांना नाना रंगांची पालवी फुटत होती. एक क्षण वाटलं, वैदेही शिवाय रामाचं चरिञ लिहता येणं अशक्य, तसा प्रयत्नही कुणी वेड्याने करु नये. कदाचित पुरुषाच्या पुरुषार्थाला स्त्री तत्वाचा स्पर्श झाला तरच ते सुर्यतेजाप्रमाणे झळाळुन निघत असावं. एकांगाने पुरुषार्थाच्या चारही सिमा गाठणं हा केवळ काजव्याचा प्रकाश.

                समोरच्या सज्जावरती नजर रोखुन ती बोलत होती. कां कुणास ठावुक, मला ना सईबाईंविषयी खुप आकर्षण वाटतं. ज्या ज्या वेळी छत्रपतींच्या नावाचा उद्-घोष होतो., त्या त्या वेळी माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते सईबाईंची करुणामय मुर्ती त्या अबोल मुग्ध मुर्तीकडे मी पहात राहते, त्या सईच्या समाधीला डोक टेकवताना मरणासन्न सई मला दिसली. दो हातावरती मरण आलं असताना तिचा प्राणसखा जवळ नाही. त्यांना कोणत्या वेदना झाल्या असतील ? महाराजांसाठी जीव कसा घुटमळला असेल? महाराजांसाठी त्या पतिव्रतेने कोणत्या विनवण्या देवापाशी केल्या असतीलं ? कुणाला काऽऽही माहीत नाही. तिच्या काळ्याभोर डोळ्यांत हलकेच पाणी तराळले. अंगी अष्टांगभाव दाटलेल्या. सभापंडिता मैत्रेयीच्या अगम्य वैखरी वाणीने ती बोलत होती. 

''तु कधी विचार केलाय का तिच्या विषयी? मला ऐकायचयं तिला तुझ्या शब्दांत, कधी ऐकवशील ?, ''

तिच्या या प्रश्नाने मी थोडा हैराण झालो. आजपर्यंत मी कधी सईबाईंविषयी जास्त वाचलं नव्हतं. बराच काळ ती अखंडपणे वाहणार्‍या पवित्र जान्हवी सारखी बोलतं होती. ती खुप बोलते. पण ती वाचाळ नाही. तिची एक खासियत आहे. इतिहासाच्या मुकेपणाच्या बर्‍याच जागा आहेत तिला तोंडपाठ …पण तीही आहे एक किमयागार… जाणुन घेते बर्‍याच गोष्टी , मुकेपणाच्या निर्विवाद पोकळित अडकलेल्या…तिचा खळखळाट सुरुच होता.अन मी…शांत…..एकदम शांत….
ब्रेक लागल्यासारखी ती थांबली

"इकडच्यांनी… मौनव्रत धारण केल आहे का…?" भावओल्या पेशवाईच्या शीलसंपन्न भाषेत तिने विचारलं.
" काही नाही हो…कुंद पावसात खळखळणारा झरा ऐकत होतो…!" मी तिला हव्या असणार्‍या भाषेत उत्तर दिलं.

माझ्या या उत्तरासरशी डोळ्यांना भिडलेलेकाजळ लावलेले तिचे सुंदर डोळे लाजेने खाली उतरले. 

"काहीतरीच तुमचं! आम्हाला का ते ठावुक नाही ? सासुबाईंच्या कानी घालु हा आम्ही हे ! तिच्या या लाघवी बोलण्याने मी आवाक झालो, चमकुन वर पाहीलं. ती कावरीबावरी झाली होती. नजर चुकवित गडबडीने ती जिन्याकडे वळली. मी तिला हाक मारली, "अहो ! "
पणही हाक ऐकायला ती थांबलीच नाही. ती गडबडीने पायर्‍या उतरुन जिन्याच्या तळाशी आली तर संकट तिच्यासमोर दत्त म्हणुन उभं होत. त्या तीन वात्रट कार्ट्या !  तिची छाती धडधडत होती. सारा चेहरा घामेजला होता. कदाचित त्यांच्या लक्षात आलं असावं. त्यांनी तिला विचारलं

" काय गं , काही झालं का ? "

त्यांचा शब्दसंकेत ध्यानी आल्याने ती प्रसन्न हसली. मी जिन्यातुन खाली आलो तेव्हा ती हजारी कारंजाचे उडणारे तुषार झेलित थांबली होती. का ते नाही माहीत मला. पण त्या सहस्त्र कारंजाच्या तुषारांशी खेळणारी रमा मला तिच्यात दिसली.

वळव्याच्या पावसाची एक सुंदर सर आली. वाहणार्‍या वार्‍यात मातीचा सुगंध मिसळला होता. अब्द अब्द धुमितेकडे निघाले होतं. हस्त नक्षत्र माझ्या हातात होतं. दिल्ली दरवाजाच्या बाहेर निघताना, चित्रा, उत्तरा अन् स्वाती या नक्षत्रांसमावेत तो पाऊस मुक्तकंठाने हासत होता.

   रात्री सहज तिची आठवण आली. तिच्या नाजुक, तलम, पालवी सारख्या, तांबरीदुपारीच्या फुलांसारख्या लालचुटुक ओठांनी केलेलं मुग्ध भाषण आठवलं. तिच्या शब्दांत गुंतत गेलो. शब्द शब्द आठवतं गेलो. तु कधी विचार केलाय का तिच्या विषयी ? मला ऐकायचयं तिला तुझ्या शब्दांत, कधी ऐकवशील ? तिचा हा सावरीच्या फुलासारखा प्रश्न !! उत्तर देणं ही तर माझी गरज होती. मी लिहायला घेतलं. लेखनी झरझर वाहु लागली.

               सुर्य अस्ताला जाऊन एक घटिका लोटली होती. महालाच्या महिरपी कमानी, खिडक्या, तावदाने आतल्या प्रकाशाने उजळले होते. वैद्यांची वर्दळ आज जास्तच जाणवत होती. खालच्या चौकातील कोपर्‍यांना मशाली उजळवतं होत्या. सईबाई राणी साहेबांच्या महाली मांसाहेबांसह राणीवसा उभा होता. सईबाईंची प्रकृती जास्तच खालावली होती. मांसाहेब त्यांच्या उशाशी बसुन त्यांचे केस कुरवाळित होत्या. समया तेवत होत्या. धुपदाण्यांतुन धुर चढायचा थांबला असला तरी, महालात रातराणीचा सुगंध रेंगाळत होता. दबलेल्या आवाजात राणीवसा ऐकमेकिंत बोलण्यात गर्क झाला होता. त्यांच्या आक्कासा ज्वराशी झगडत अंथुरणाशी तळमळत होत्या. डाव्या बाजुला असलेल्या चिकाच्या पडद्याआड पुतळाबाई रडणार्‍या शंभुराजांना शांत करण्याचा प्रयत्न करित होत्या. महाराजांच्या प्रत्येक राणींच्या देवघरातील देव पाण्यात होते. कुलस्वामिनी तुळजाभवानीला रात्रंदिवस अभिषेक सुरु होता.

               काल रात्रीपासुन ज्वराने अधिकच उचल खाल्ली होती. राणीसाहेब पाण्यावाचुन तडपणार्‍या मासोळी सारख्या तळमळत होत्या. मात्रा उगाळुन वैद्यराजांचे हात थकले होते. सईबाईंनी मासाहेबांचा हात हाती घेतला, मासाहेबांना तो उष्ण स्पर्श जाणवला. अंग विस्तवाप्रमाणे फणफणत होते. त्यांच्या कपाळाभोवती घर्मबिंदु साचले होते. अशक्तपणामुळे शरीर क्षीण झालं होतं. नेत्रांभोवतीची काळी वर्तुळे सोडली तर सार्‍या चेहर्‍यावर गव्हाळी रंगाचा उजाळा दिसत होता. कमानदार भुवयांच्या मध्ये अर्धचंद्राकृती कुंकु उठुन दिसतं होतं. आजारपणामुळे क्षीण झालेल्या सुकलेल्या ओठांवर फक्त दोनच शब्द नांदत होते. स्वामी...

                एव्हाना तिन्हीसांजा ढळुन दिड प्रहर झाला होता. सईबाईंच्या महालात ऐकमेकांना समांतर अशा हारित उभे असलेले शिसवीचे खांब अन् त्यांनी तोललेले लाकडी छत देवघराकडे निमुळते होत गेले होते. मेघडंबरीच्या रुपाने त्याचीच एक बाजु खाली उतरली होती. त्या मेघडंबरी खाली अष्टभुजा आई तुळजाभवानीची काळ्या पाषाणातील मुर्ती होती. मां साहेब त्या मुर्तीकडे केविलवाण्या नजरेने पहात होत्या. रात्र वाढत होती. मांसाहेब वगळता इतर राणीवसा आपापल्या महाली निघुन गेला. आकाशात चंद्राची धीट कोर उगवली. महिरपीतुन येणार्‍या चंद्राचा प्रकाश सईबाईंच्या कानातल्या हिर्‍यांच्या कुड्यांवर पडुन तो त्यांच्या गालावरती निखळला होता. त्यांच्या मनात आज वसंत फुलला होता. आठवणींचा हा असला फुलोरा कधी कुणी पाहिला नसावा. सईबाईंचं भान हरपत चाललं होतं. आपल्या डोळ्यांनी आपल्या गत जिवनाचा प्रवास त्या पहात होत्या. सईच्या कितीतरी आकृत्या त्यांच्या डोळ्यासमोर आज येऊ लागल्या. फलटणच्या निंबाळकरांची परकरी सई. पुण्यातील कसबाच्या लालमहालात भोसल्यांची सुन म्हणुन वावरलेली सई, सासु-सुनेचं नातं विसरुन आऊसाहेबांच्या गळ्याशी अवखळपणे मिठी मारताना त्यांच्याही  नकळतपणे त्यांची सुन झालेली सई. सखुबाईच्या लग्नात सासुबाई झालेली सई, स्वराज्याच्या पहिल्या वहिल्या बाळाची आऊ झालेली कृतज्ञ सई !! सईच्या कितीतरी सावल्या किती तरी रुप त्या पहात होत्या. त्या हरेक सावलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. हाती काहीच लागतं नव्हतं. प्रत्येक सावली त्या हरवत चालल्या होत्या. अंगीचं सगळं सईपणं त्यांनी एकवटलं, जिवाच्या निकराने त्यांनी एक ना एक छटा चोखाळुन पाहिली. पसरलेला सारा प्रकाश कवेत घ्यायला गेलं की अंती दिवाच हाती लागतो तशीच एक छटा त्यांच्या हाती लागली. हो पण ती त्यांची नव्हतीच. सारं सईपणं एकवटुन जी एक प्रतिमा निर्माण झाली होती ती होती त्यांच्या स्वारींची, स्वामींची !!

               सजलजलदघन वर्णाची, मर्यादा पुरुषोत्तमाची प्रतिमा !! चंद्नकिरणांनी अभिषिक्त झालेला जिरेटोप, त्यावरती मोत्यांचा तुरा, अंगात पांढराशुभ्र चुणीदार अंगारखा, पायात सुरवार, भालप्रदेशी शिवगंध, रेखाटले होते. त्यावरती कस्तुरीचा टिळा शोभत होता. समुद्राची अथांगता असणारे करारी डोळे अन् गरुडालाही लाजवेल असं उन्नत नासिक. कानातील भिकबाळ्या त्या गंभीर चेहर्‍यावर सुर्यबिंबाचे तेज फांकित होत्या. गळ्यात आई तुळजाभवानीची कवड्यांची माळ होती. कमरेभोवती लपेटलेल्या जरतारी गुलाबी शेल्यात बिचवा कट्यार अन् पल्लेदार तलवार खोचली होती. ओठांतुन जगदंब जगदंब हे मेघगंभीर शब्द उमटत होते.त्या प्रतिमेचे शिवदर्शन होताच त्यांचे उरलेसुरले भानही हरपले. काळाचा पडदा मनात आलेल्या वादळाने अचानक नाहिसा झाला. अक्षी नेत्रांच्या संदुकीमध्ये लपवलेल्या कितीतरी मोहक आठवणी त्यांच्या डोळ्यात तराळु लागल्या. एका पणतीने दुसरी पणती उजळवावी, दिवेलागणी होता होता दिपमाळ सजावी असचं झालं. आठवणींची एक भली मोठी पुष्पमाला घेऊनच रायगडीं हळवी पाखरं सईबाईंच्या पुढ्यात येत होती, बागडत होती. बघता बघता त्यांची जिवनवेलं फुलुन आली. किती रंगांची, गंधांची, आकारांची फुलं त्यावरती उमलली होती. सईबाई एक-एक फुल हाती घेत होत्या. प्रत्येक फुलांत एक आठवण होती. त्या फुलांच्या गंधकोषात पाहु लागल्या. एका फुलात दडलेलं होतं शिवबासोबतं लाल महालात टाकलेलं पहीलं पाऊल, सख्यांच्या आग्रहास्तव पहिल्यांदा घेतलेलं इकडच्यांच नाव. पिवळ्या रंगाच्या फुलामध्ये एक प्रशस्त आठवण होती. रायगडाच्या अंतःपुरात महाराजांना औक्षण करताना त्या तेजस्वी डोळ्यांशी झालेली नजरा-नजर, तबकातील निरंजनाच्या प्रकाशात दिसलेलं भव्य शिवगंध, अन् त्यावेळी आऊसाहेब महाली आल्याचही लक्षात आलं नव्हत कुणाच्या, एका सफेद फुलामध्ये राजांच्या छातीवर माथा टेकवताना गळ्यातील कवड्यांच्या माळांचा झालेला रोमांचकारी स्पर्श भरला होता. किती किती ताजी फुलं होती ही. चौदा रत्नातील एक असणार्‍या पारीजातकाच्या फुलांच्या सारखीच. मागे केदारेश्वरावरती रुद्र केला त्यावेळी महाराजांनी स्वहस्ते केदारेश्वरावरती धरलेलं सुर्यपत्र, त्यांच्या मागे सुवर्णकलश डोक्यावरती घेऊन चाललेली सात पाऊले; गज,अश्व,रथ, चतुष्पाद, गोष्ठ, वल्मिक, हाट अन् संगम या सात मृत्तीकांनी राजांसोबत तयार केलेलं भव्य शिवलिंग. मालती, मल्लिका, जाई, जुई, कारोंटी, चाफा, मोगरा, नागकेशर, पुन्नग, मोह, चमेली, बकुळ, कमळ, कुंदर, गुलाब, रातराणी या वनसंजिवक पुष्पसंभाराने सजवलेली मंदीराची वाट. यज्ञ सांगता समयी वेदींवर समस्त ब्रम्हवृंदांच्या, आऊसाहेबांच्या, अग्निनारायणाच्या साक्षीने राज्ञीसन्मान म्हणुन महाराजांनी त्यांच्या केशसंभाराच्या सुबक खोप्यामध्ये सुवर्णफुल माळलं होतं. ते राजलक्षण होतं. अनाहुतपणे त्यांचा हात वेणींमध्ये गेला. त्या सुवर्णफुलाचा स्पर्श होताच त्यांच्या क्षीण चेहर्‍यावर प्रतिपदेच्या चंद्राच हास्य उमललं. 

 

               अवघी रात आठवणींत सरली होती. मांसाहेब अजुनही त्या तुळजाभवानीसमोर जपाची माळ ओढत होत्या. गार वारा सुटला होता. ब्राम्हमुहुर्त सुरु झाला होता. ब्रम्हगिरीकडुन येणारा वारा सईबाईंच्या अंगाला बोचु लागला मग आऊसाहेबांनी त्यांच्या अंगावरची शाल एकसारखी केली. ध्रुवमत्स्य तारका ध्रुवासोबत विझत चालल्या होत्या. वायव्येच्या कोपर्‍यातली समई अजुन तेवत होती. वाहणार्‍या वार्‍यावरती सुर जागे झाले होते. पण ती मंदिरात गाणार्‍या भाटाची नित्य भुपाळी नव्हती. जात्यावरच्या ओव्या सुरु झाल्या होत्या.

पहाटेच्या वार्‍यावर । निशीगंध बहरला । दिगंताला गं भेदुन । रथ जानकीचा गेला ।।

दुर पंढरी पंढरी । चंद्रभागे तिरी वास । येई पाडुरंगा वेगी । कान्हा जाहली उदास ।

पंढरीच्या पांडुरंगा । तुझा गाईन काकडा ।  महाव्दारी जनी उभी । दोन्ही पाणावल्या कडा ।।

ऐके पतितपावना । तुला वाहते तुळस । सई शिवबाला देई । देवा सोनियाचे दिस ।।

                मांसाहेबांच्या डोळ्यांत क्षणभर पाणी तराळले. जात्यावरच्या त्या ओव्या विरत चालल्या होत्या. सईबाईंना थंडी बोचु लागली. अंग थरथरु लागले. आपल्या कृश शरीराभोवतीची चौहासी त्यांनी अधिकच घट्ट लपेटुन घेतली. मृत्युची चाहुल त्यांनाही लागली होती. 

                सुर्यनारायण उदासपणे क्षितीजावर आरुढ झाला. सईबाईंची शुध्द हरपली. खोकल्याची उबळ आली की जिवाचा कसा तोळामासा होत होता. धन्वंतरींनीही आता हात टेकले होते. आऊसाहेब सईबाईंच्या उशाशी बसुनच होत्या. त्यांच्या वृध्द डोळ्यांत आसवांचे झरे फुटले होते. सईबाईंच्या क्षीण झालेल्या वाणीतुन स्वामी स्वामी हाच वेदघोष चालु होता. त्यांनी फक्त महाराजांचाच ध्यास घेतला होता. आजवर सहचारीणी म्हणुन जगताना महाराजांच्या पाठीशी त्या कणखरपणे उभ्या होत्या. लग्नवेदिंवर सप्तपदी चालतांना सात जन्मांची सात पाऊले सईच्या त्या सात वर्षाच्या सान पावलांनी त्या चालल्या होत्या. वेदीवरची ती सप्तपदी आठवतांना त्यांना प्रातःस्मरणीय असणारे महाराजांचे चरणकमल आठवले. त्यांचे डोळे पाणावले. या मर्त्यलोकातील त्यांच्या भाग्याचे दोन चरण खुप दुर प्रतापगडावरती स्वराज्याच्या अबिरी वाटेवरची मोहीम फत्ते करायला गेले होते. 

                दोन करुण नेत्र आता पैलतटावरती खिळले होते. सुख दुःखाच्या पल्याडची दिशा आता राणीसाहेबांना दिसत होती. वातावरण अधिकच गंभीर होत होतं त्याचा ताण सार्‍याच गडावर सावटासारखा पसरला होता. सखुबाई, सोयराबाई, सकवारबाई, पुतळाबाई आणि इतर राणीवसा बिथरलेल्या हरणींच्या कळपासारखा भासत होता. बाळराजांना घेऊन मासाहेब उश्याशी होत्या. सईबाईंना आता काही दिसत नव्हते. विदेही अवस्था त्यांना लाभली होती. वेदना संपल्या होत्या. डाव्या कोपर्‍यात प्रत्यक्ष आई तुळजाभवानी तिच्या लेकीला माहेरी न्यायला आली होती. भावविश्वाने डोळ्यासमोर उभ्या राहिली अष्टभुजा तुळजाभवानी, अंतरीचा श्वास असणारे महाराज अन् सकलसौभाग्य संपन्न वज्रचुडामंडित महाराणी सईबाई यांच्या मध्ये एक मुक संवाद सुरु झाला.   

 

क्षणभरीच या इथे थांबले

देवा तुमच्यासाठी

लवकर येऊन राया सोडा

हृदयाच्या गाठी ।।1।।

 

आज संपले इथले देणे

हाती न माझ्या काही उरले

नक्षत्रांचे देणे तुमचे

आज नेत्री कां माझ्या भरले ?

 

सान सई ती कौतुक केवळ

आऊ जिजाऊ ममता आगर

थोर किर्तिकर आपण स्वामी

यश किर्तीचे केवळ आगर

 

धन्य सई मी धन्य सईपण

धन्य भाग्य हे सखये माझे

आज अवेळी मजला देखुन

आकाशीं तो म्रुगांक लाजे

 

नाथा लवकर आपण यावे

गात्र भिजले आज कोवळे

जातां जातां दो नेत्रीं मी

रुप भरावे आज सावळे

 

स्वराज्य व्हावे श्रींची ईच्छा

नसेल सोबत सई सदोदित

दिगंत वैभव पाहुन तुमचे

तृप्त होतील देवीं देवही

 

प्रित आपुली फुल लतेचे

सांभाळावे शंभु बाळा

माता आपण पिताच आपण

शतदा व्हावे शिवभुपाळा

 

बाले किल्यावरी फडकतो

भगवा डौलाने जोमाने

आज सई मी मनीं खिन्न कां

गिळलें सौख्य आज व्योमाने ?

 

प्रजासौख्य हे सौख्य आपुले

पुत्र स्वामिनी नसे नृपाला

रामासम हे राज्य आपुले

रामासम नृप असे जगाला

 

हास्य उमलते ओष्ठी माझ्या

हास्यातुही ते तुम्हीच स्वामी

श्वासांतुन मग तुम्हीच केवळ

मुग्ध मैथिलीचा जैसी रामी

 

नेत्रांमधुन प्राण तेवुनी

वाट पाहते तुमची देवा

यावे लवकर स्वामीं आपण

तव चरणांची घडु दे सेवा

 

चंद्रभारले जगणे माझे

चंद्रभारल्या शिवशक्तिने

आज धन्य मी असे सखे गे

कृतार्थ होईल शिवभक्तिने

 

आई भवानी आज उभी ही

मुठींत मिटल्या कौल घेवुनीं

शिवबाची मी भाग्य स्वामिनि

जाते अहेव मळवट भरुनी

 

शिवदासी मी जन्मांतरीची

एक अशिर्वच देई भवानी

शिवभाग्याच्या कुंम्कुमात या

सई जाऊ दे आज वाहुनीं...

 

               सईबाईंनी पाणी मात्राही झाली होती. आई तुळजाभवानीला अभिषेक सुरु होता. त्याचे शब्द शब्द त्या महालात साठत होते. तुळजाभवानी समोरचे मागितले. हेमगर्भाची निरंजन अचानक फडफडलं, निरंजनातील तुपाची मात्रा आता संपत आली होती. गडबडीने तुपाची धार उजवण्यासाठी पुतळाबाईंनी घृतपात्र उचललं......खुप उशीर झाला होता… त्याच वेळी अंतःपुरात आकांत उसळला. 

                भाद्रपदाच्या सरत्या पावसाला महाराजांच्या भावविश्वाचा बालेकिल्ला ढासळला होता. मनाजोगा जमलेला मनसुबा वाहुन गेला. भरलेल्या मळवटाने सकलसौभाग्यसंपन्न वज्रचुडामंडित सईबाई अवघ्या सव्वादोन वर्षाच्या शंभुराजांना महाराजांच्या हाती सोडुन महाप्रयाणाला निघुन गेल्या. 

                लेखनी शांत झाली. महाराजांना ही बातमी कळली असेल त्यावेळी त्यांची परस्थिती काय झाली असेल. सईबाई अन् महाराजं काय प्रेम असेल ना ? गंगोदकाप्रमाणे दोघांच्या ओठांवरती अंतःकाळी देखील एकमेकांची नावं. मी अंगअंग शहारलो. मला काही कळनासं झालं. कोणत्या शब्दांत हे प्रेम बांधावे ? खुप कठीण असतं हे. शब्द थोकडे पडतात. वाटतं अशी नाती सांगायलाच नको. शब्दांनी ती ऐकुही नयेत. त्यासाठी ह्रदयाचे डोळे करावे. ह्रदयाच्या कानांनीच ती ऐकावी. ह्रदयाच्या रेशमी भुर्जपत्रावर ती लिहावी. कारण ह्रदयावरच ती चपलखं बसली तरचं ती वाचता येतात. कदाचित ही भाषा अशीच असते की ती कळावी फक्त हृदयाकडुन ह्रदयाला…एक सांगु ? तिने सांगितलेल्या सईबाई मला खुप भावल्या.त्यांच अवघं औक्ष हे प्राजक्तावरती फुललेल्या फुलासारखं आहे. सईबाई पुर्णपणे कळणं खुप अवघडं असेल. पण आकाशाचा अंत न लागुनही चिमणे पक्षी प्रयत्न करतात ना ?

                तिने समजवलेल्या दाखवलेल्या सईबाई अन् तिचं ते लाघवी बोलणं अजुनही कानात घुमत होती. अचानक मोबाईल वाजला. मेसेज आला होता. मी गाल्यातल्या गालात हसलो. 

''इकडच्यांनी… मौनव्रत धारण केल आहे का…?’’ 

''काही नाही हो…कुंद पावसात खळखळनारा झरा ऐकत होतो…!’’, मी तिला हव्या असणार्‍या भाषेत उत्तर दिलं. 

 

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

।। श्रीकृष्णाभ्यां नमः ।।

प्रश्नचिन्ह ! हो प्रश्नचिन्हचं !! अगदी उगवल्या पासुन ते मावळत्या सुर्याची अखेरची किरणे अंगावर पडत रहावी तिथपर्यंत. चंद्राचं पिठुर चांदणं पडावं अगदी पहाटेची शुक्राची चांदणीही उगवावी. तु माञ जागी असावी मुसमुसणार्‍या डोळ्यांसारखी, अहोरात्र माझ्या मेधाशक्तीशी उनाड मुलीसारखी भोंडला मांडणारी. तुझे हे अनंत खेळ मी या दिवसात पाहीलेतं. श्रावणातल्या उन्हा-पावसाच्या खेळासारखा हा खेळ तुच रंगवित होतीस. मनामध्ये सातारंगांनी सजलेलं इंद्रधनु सजायचं. त्यावरती तुझ्या नावाचा हिंदोळा बांधायला गेलं की भरुन यायचं आभाळं मनात दाटलेलं. सातरंगाचं फुलपाखरु हातावरुन अलगदपणे निघुन जायचं ना लहानपणी तसचं हो.. हो.. अगदी तसचं .. हे इंद्रधनुही गायब व्हायचं. कुठल्यातरी गुलाबी फुलाच्या गंधकोशी लपुन बसायचीस. गंधकोशातील केशरही दरवळायचे तुझ्या बुंथीचा स्पर्श झाला की, डोकावलं भिरभिरत्या नजरेने मी कधी कधी तिकडे पण तु अढळं होतीस त्या उत्तरेच्या तार्‍यासारखी मिनमिनत्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहणारी. तार्‍यावरुनही तुझीच याद. अगदी बेमालुम दवा असल्यासारखी दुःखानी भरलेल्या जिवांच्या रुक्ष रुक्ष देहांवरुन प्राजक्तफुलं ओघळल्यासारखी. तुझं अस्तित्वचं मुळी एक प्रश्नचिन्ह बनुन उभं आहे माझ्या दिठीदीठीतं. तुझं अन् माझं नात तरी काय गं. प्रश्नचिन्ह म्हणुनच कायम उभी तु. तुला कितीही वाचलं तरी तु कळत नाहीस. तुला पहावं म्हटलं तरी दृष्टीच्या पैलतटावरतीच तु ! स्वप्नांसारखंच का गं तुझं अस्तित्व ? हवहवसं अन् क्षणभंगुर ? निरुद्देशपणे मी चाललोय तुला शोधताना. त्या ओल्या रेतीमध्ये उमटलेल्या पाऊलखुणा विसरणंही मला झालयं अशक्य ! लाटांवरती मावळणार्‍या सुर्याला पाहीलं की वाटायचं त्या काषाय रंगामधुन सात रुपेरी अश्वांचा रथ दौडत घेऊन येशील मजसमीप अन सांगशील तुझ्याबद्दलं. लाल झालेला तो गोळा रत्नाकराच्या आधीन व्हायचा अन् रेतीमधीलं काढलेलं तुझं नावं लाटेनं पुसुन गेलं की पाय माघारी निघायचे निरुद्देश प्रवासासारखे. प्रवाह पतित झालेल्या फुलासारखा वाहतं चाललोय गं तुझ्यामागे मी पण तुझा शोध संपत नाही. 

             ओह माय गॉड दिपदा लव्हलेटर लिहतोय? आय कान्ट बिलिव्ह इट !!! किंचाळण्याचाच आवाज. मी मागे वळुन पाहीलं. स्वाती आश्चर्याने डोळे वटारुन आजि म्यां ब्रम्ह पाहिले या आविर्भावात माझ्याकडे पाहत होती. मी लेखनीचा टाक मोडला. मुद्दामचं डायरी मिटली. तिच्या हातातला कॉफीचा मग घेतला अन् बाल्कनीमध्ये निघुन गेलो. मिश्किलपणाची मलाही लहर आली होती. माझ्या पाठोपाठ तिही आली. हातातल्या डायरीकडे पहातच म्हणाली. 

‘’दादु  डायरी दे ना रे ती...’’

‘’ .........’’ ,मी.                        

‘’ दे ना, मी नाही ना सांगणार कुणाला ‘’ अगदी गळ्यात हात गुंफुन लाडात येऊन ती बोलत होती..                                         

‘’ नको तु लहान आहेस ‘’

‘’ नाही ऽऽऽऽऽऽ मी मोठी आहे. आय एम ए बिग गर्ल’’

‘’ नो.... नेव्हर मी देणार नाही. जा खाली जा अन् जर आईला मदत कर..’’

दादु आता जर नाही दिलीस ना... तर सरळ मम्मीला जाऊन सांगील कि आमचे जेष्ठ भ्राताश्री कोण्या एका मृगनयनी युवतीवर अनुरुक्त झाले असुन त्या सुंदरीस आपले मनोवांछित व्यक्त करण्यासाठी अभ्यासाच्या निमित्त करुन प्रेमपत्र लिहीत आहेत. मग पुढचं पुढे तु बघ रे बाबा ! खट्याळपणे हसत, शह देणार्‍या राणीच्या नजरेने ती पहात होती. शह अन् काटशह या लढाईत मला रस नव्हता. मी विनाकारण राजा एक घर मागे सरकवला. हातातली डायरी तिच्या स्वाधिन केली. जीतं जीतं च्या आनंदाने तीने डायरी घेतली अन्  झोपाळ्यावरती झोके घेत वाचु लागली. 

‘’ ए बावळट लव्हलेटरची सुरुवात अशी करतात काय? मंद कुठला...’’

‘’ का गं काय झालं? काही चुकलं का? , मी

‘’ अरे बाबा लव्हलेटरची सुरुवात कुणी देवाचं नाव घेऊन करतात काय? म्हणे श्री कृष्णाय वयं नुमः स्टुपिड कुठला...’’ टेबलवरची पेन्सिल घेऊन तिने त्यावर काट मारली..

‘’ ओव्ह आय सी...सॉरी.... आणखी काही ? ‘’

‘’ थांब थांब आधी वाचु तर दे’’,  पेन्सिल दातांमध्ये धरुनच तिने उत्तर दिलं. अख्खा पॅरा वाचुन झाला अन् तिने विचारलं, दादु काय रे हीच नाव ? तुझ्या कॉलेजात आहे काय? कुठे रहाते ? अगदी पिच्छा पुरवायला सुरुवात..

राधा !!! निस्सीम प्रेमाची अनस्युतपणे चालणारी धारा !!! जिच्या नावाच्या नुसत्या उच्चाराने देहाची मुरली घुमावी अशी चिन्मयस्वरुप राधा.. राहते कुठे विचारशील तर थोर थोर विचारवंतांनाही तिचं अस्तित्व कोड्यात टाकणारं आहे. नाना विचार प्रवाह आहेत एक विचार होत नाही. गेली कित्येक दिवस मी तिला शोधतोय. तिच्या अस्तित्वाच्या समकालीन खुणा काहीच मिळत नाहित. आत्ताही तोच विचार करत होतो. खरं सांगु ? श्रध्दा अन् भावविश्वाची तेजाळती तारका असणार्‍या राधिकेचं अस्तित्व मात्र आहे विवादास्पद. श्रध्दा अन् वास्तव ही दोन्ही एकाच रेशमी धाग्याचें दोन टोकं त्यांचा सुवर्णमध्य साधायचा हे कर्मचं मुळी कठीण. ज्या ज्या वेळी श्रध्देने मी राधिकेला श्रीकृष्णाच्या वामभागी पाहतो त्या वेळी वास्तवाच्या विस्तवही चंद्राप्रमाणे शितल भासु लागतो. अन् ज्या ज्या वेळी मी न्यायबुध्दीने वास्तवाकडे पाहु लागतो त्या वेळी राधीकेचं अस्तित्वचं खोटं वाटु लागतं.

‘’ राधा अन् खोटी? काय बडबडतोय ?’’,  घुटमळतच तिने विचारलं.

‘’ हो खरं तेच सांगतोय. हे अगदी तसचं आहे की तलम वस्त्रावर सुंदर विणकाम करुन सुंदर नक्षी बनवावी. पण तेच कापड उलट्या बाजुने पहायला गेलं की फक्त विस्कटलेले धागे दिसतात. त्यातील सौंदर्याचा अगदी नाश होऊन जातो. म्हणजे जे वाचलं वाचणात आलं. ज्यात नव्हता भाबडेपणा.तर्काच्या कसोटीवर जे उतरत होतं तेच सांगतोय तुला. वास्तविक प्रमाणभुत ग्रंथानी राधेकेच्या अस्तित्वाबद्दल ठोस लिहलेलंचं नाही.’’

‘’मग ही राधा आली कोठुन?’’,  तिने उत्सुकतेने विचारलं.

‘’ गितगोविंद या संस्कृत काव्यानेच राधिकेचं उन्नयन केलं. या महाकाव्याचा रचयिता म्हणजे कवी जयदेव. प्राची नदीच्या काठावरतीच त्याने शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, आणि ज्योतीषाचं शिक्षण पुर्ण केलं. बंगालदेशाचा जो शककर्ता राजा लक्ष्मणसेन याच्या दरबारी तो होता. गितगोविंद हे महाकाव्य नाही किंवा ते खंडकाव्यही नाही. शृंगार रसाने परिपक्व झालेलं हे एक गीतनृत्यनाट्य काव्य आहे. या काव्यातील अर्क शोधायचा झाला तर हे काव्य राधा अन् कृष्ण यांच्यामधील स्नेह, वियोग, उत्कंठा अन मिलन यांचा गाभा आहे. राधिकेमध्ये या कविने अभिसारिका, विरहोतकण्ठिता, वासकसज्जा, विप्रलब्धा, खण्डिता, कलहान्तरिता, मानिनी अन् स्वाधीनभर्तृका या अष्टनायिका चित्रित केलेल्या आहेत. विरहाने व्याकुळ झालेली राधिका, कृष्णावर अधिराज्य गाजवणारी राधिका, त्याच्या प्रेमाने देहभान विसरलेली राधिका त्याने रंगवली आहे. श्रीकृष्णाच्या बाबतीत मात्र त्याने संस्कृत साहित्यातील धीरोदात्त, धिरोध्दत, धीरललित अन् धिरप्रशांत या चार नायकांपैकी भरतमुनींनी वर्णण केलेल्या प्रणयी नायकाचे म्हणजेच धिरललित नायकाचेच वर्णन केले आहे. दशावतारचरित, सरस्वतिकंठाभरण, यशस्तिकचंपू, वेणीसंहार, संगीतचुडामणी या लिलाशुक अन् आर्यसप्तशति सारख्या सुंदर वाङमयात राधा अन् गोपींचा उल्लेख दिसतो. पण यावरही कळस चढवला तो जयदेवाने. बाराव्या शतकापुर्वी राधिकेचा उल्लेख कृष्णासोबत होत होता का ? या बद्दल शंकाच आहे. कारण, संत ज्ञानेश्वर अन् संत नामदेवांच्या कालखंडामध्ये राधिका कृष्णाला बिलगलेली नव्हती. माऊलीं अथवा नामदेव महाराज यांच्या कोणत्याही गौळणी अथवा तत्सम काव्यामध्ये राधिकेचा उल्लेख नाही. विरहकाव्यं तर माऊलींनी इतकं सुंदर लिहली की, चापे वो चंदनु । देवकी नंदनु । वीण नावडे वो । चांद वो चांदणें ।। अथवा नंद नंदनु घडी घडी आणा । तयाविण न वांचती प्राण वो माय । बापरखुमादेवीवरु विठ्ठलु गोविन्दु । अमृतपान गे माय ।। जयदेवानंतर जे संतकवी झाले त्यांच्या काव्यात मात्र राधेचा उल्लेख जरुर आला आहे. मराठी संत कवी एकनाथांनीही राधेला अनेक गौळणींमध्ये स्थान दिलं आहे. यावरुनच जयदेवाने राधा या पात्राचं उन्नयनीकरण केलं असाच तर्क करता येतो. या नंतर साहित्यातुनच राधिकेचा धर्मामध्ये प्रवेश झाला. शशिभुषणदास गुप्ता यांचाही तर्क असाच होता. यानंतर राधा हे तत्व खुपचं जलद गतिने विकसित झालं. निम्बक संप्रदायाचे आचार्य निम्बकाचार्य यांनी भगवान श्रीकृष्णांसोबत वामभागी असणारी राधीका ही गोलोकातील भगवान श्रीकृष्णाची दिव्य नित्य सहचारीनी आहे हेच तत्व सांगितले. निबार्क दशश्लोकी मध्ये म्हणतात

अगे तु वामे वृषभानुजां मुदा विराजमानामनुरुपसौबगाम् ।

सखी सहस्ञे परिसेवितां सदा स्मरेम देवी सकलेष्टकामदाम् ।।

 

            गौडीय वैष्णव गोस्वामींच्या कालखंडातच राधा हे तत्व जनमानसात रुजलं. रुप गोस्वामी, जीव गोस्वामी यांनी श्रीकृष्णासह राधीकेचाही स्वीकार केला. या नंतर बलदेवानेही ब्रम्हसुत्रावरती गोविंदभाषा नावाचं भाष्य लिहलं. या भाष्यामध्ये राधीकेला त्याने ब्रम्हांडाची अचिंत्य अनंत शक्ती हे असं म्हटलं आहे. चैतन्य महाप्रभुंनी राधा या तत्वाला प्रकृतीच्या स्वरुपात नटवलं. अन् राधा ही अविरतपणाने श्रीकृष्णाला बिलगली.  

‘’ याचा अर्थ असाच घ्यायचा का? की राधिका नावाची कुणीही स्त्री भगवान श्रीकृष्णांच्या जिवनप्रवाहात नव्हती. निरागसतेने स्वातीने विचारलं.                                             

‘’खरचं स्वाती याचं उत्तर मला माहित नाही. राधिकेला तर्कातीत, गुणातीत म्हणावं की न म्हणावं याच भोवर्‍यात माझा तर्क अडकला आहे. या ओडीशा राज्यात एक आख्यायिका सांगितली जाते. जयदेव जेव्हा गितगोविंदाची रचना करत होते. तेव्हा राधेने तिचे पाऊल आपल्या मस्तकावर ठेवावे अशी विनंती भगवान श्रीकृष्ण राधिकेस करतात. ही कविकल्पना जयदेवाच्या मनात आली. पण भगवान श्रीकृष्णाचे देवता स्वरुप लक्षात घेऊन जयदेवाने हे पद लिहायचे टाळले. एक दिवस तो असाच स्नानाकरता गेला असता. भगवान श्रीकृष्णांनी जयदेवाचे रुप घेतले. पद्मावतीकडुन जयदेवाची लिखाण सामग्री घेतली अन् स्वतः 

स्मरगरलखण्डनं मम शिरसिमण्डनं धेहि पदपल्लवमुदारम् ।

ज्वलति मयि दारुणो मदनकदनानलो हरतु तदुपाहितविकारम् ।।

ही कल्पना उतरवुन काढली. घरी परत आल्यानंतर जयदेवाला सर्व प्रकार समजला. आनंदाने त्याने गितगोविंदाची रचना पुर्ण केली. या पदाबद्दल विचार केला तर राधिकेचा अधिकार आपल्याला कळुन चुकतो. म्हणुन प्रगटे ते न दिसे । लपे तव तव आभासे । प्रगट ना लपालासे । न खोमता जो ।। हा अमृतानुभव राधिकेबद्दलही येतो. राधिका होती नव्हती हा निर्णय घेण्यास मी पात्र नाही. ती माझी योग्यताही नाही.  किंबहुना तो प्रयत्नही आपण करु नये. पण माझ्याही मनःपटलावरती राधिका ही प्रेमाचा मुर्तीमंत झरा म्हणुन खळाळत वहात आहे. अगदी भगवान श्रीकृष्णाचं देखिला गे माये यमुनेच्या तिरी हात खांद्यावरी राधिकेचा हेच वर्णण मला अधिक भावतं. काल त्या अभयारण्यातही मला रहावलं नाही. मनात वाटलं कधी कधी कृष्ण भगवान राधिकेला घेऊन वनविहार करत असतील. वाटेने जाता जाता राधिका अनेक अनोळखी फुलांविषयी विचारतं असेलं . भगवानही तिची जिज्ञासा पुरवित असतील. फुलांचे कितीतरी गुच्छ त्यांनी राधिकेला दिले असतील. त्या नदीतटावरती आल्यानंतर वाटलं स्वतः भगवान श्रीकृष्ण राधिकेला गोकुळ अन् वृंदावन पाहताना हेच म्हणत असतील....

या इथे राधिके थांब गडे

या कालिंदीवर मन हे जडे

या इथे राधिके थांब गडे ।।ध्वृ।।

 

पहा मालती शुभ्र भोवती

मृग शावक ते स्वैर धावती

भ्रमर रंगुनी गंध सेवती

सतरंगी पाखरु गगणी उडे

या इथे राधिके थांब गडे ।।01।।

 

समोर लतिका लाजुन गाली

नवपुष्पांनी बहरुन आली

मृदुगंधाच्या ओष्ठी लाली

गवतात पाचुचे सैल सडे

या इथे राधिके थांब गडे ।।02।।

 

पहा पैल तो याग चालला

यज्ञ धुमाने वायु भारला

देवर्षींनी षड्ज पेरला

हा क्रतु गोकुळी सहज घडे

या इथे राधिके थांब गडे ।।03।।

 

अधीर वाहते यमुनामाई

तटी उभ्या या सवत्स गाई

हृदय मोहवे मोहक राई

राऊळीं चौघडा जलद झडे

या इथे राधिके थांब गडे ।।04।।

 

रंग सांडला निळा गगणभर

कुठे काढीते कोकीळ सुस्वर

सळसळ वारा तृणपर्णांवर

संमिश्र नाद तो श्रवणीं पडे

या इथे राधिके थांब गडे ।।05।।



फले भारले विपुल तरुवर

शाखा पल्लव पसरवती कर

पितरंग अन् अंगी परिकर

परिपक्व फलांना जाती तडे

या इथे राधिके थांब गडे ।।06।।

 

राधे राधे सखे मैत्रिणी

प्राणप्रिये तु स्निग्ध जिवनी

तुझी साथ अन् प्रित जीवनी

तव कटाक्ष माझ्या हृदयी भिडे

या इथे राधिके थांब गडे ।।07।।

 

भान हरवलेल्या हरणीसारखी स्वाती माझं बोलणं ऐकत होती. मी बोलायचा थांबलो. स्वाती परत परत तोच परिच्छेद वाचत होती. अचानक तिच्या मनात काय आलं काय माहीत. ती उठली टेबलावरील खोडरबर घेतला. मघाशी पेन्सिलीने खोडलेले श्रीकृष्णाय वयं नुमः हे शब्द तिने पुन्हा नितळ केले.

 ‘’ दिपदा आणखी एक कॉफी घेणार?’’, स्वातीने विचारलं,

‘’ जा पटकन घेऊन ये ’’ एव्हाना तिन्हीसांज झाली होती. देवघरातुन धुपाचा सुगंध दरवळला होता. रेडिओला आम्हा दोघांचं आवडतं गाणं लागलं होतं. तिन्हीसांजा सखे मिळाल्या देई वचन तुला आज पासुनी जीवे अधीक तु माझ्या.....

अगदी जिंकायला निघालो होतो तुला... पण गाडुन आलो शरणागतीची पांढरीफट्ट पताका.