श्रावणाचे दिवस होते. खुप
दिवसांनी आज रामदर्याकडे आलो होतो. गाभार्यातील कोदंडधारी प्रभु श्रीरामाचे
दर्शन घेऊन तळ्याकाठी असणार्या पायर्यांवरती मी बसलो. वार्याने त्या निळ्याशार
तळ्यावरती वलायाकृती तरंग निर्माण केले. त्यातीलच काही वेंधळे कल्लोळ पायर्यांशी
शांत होत होते. तळ्याच्या पैलतटावरती असणार्या वट वृक्षाच्या कुशीमध्ये पक्षांची
झुंबड उठली होती. दुर रानात कुठुनतरी मोरकेका ऐकु येत होत्या. पानापानांत दाटलेली
सांजवेळ हळुहळु पाण्यात उतरु पहात होती अन् वार्याने त्या तळ्याच्या पृष्टभागावर
निर्माण केलेले तरंग पायांशी स्थिरावत अलवार सुखाचा स्पर्श करुन मुक्यानेच निवळत
जात होते. ज्या कल्पदृमाखाली मी बसलो होतो त्याची कलती छाया तळ्यामध्ये पसरली
होती. त्या छायेने भ्रमित झालेला कुणी चुकार जलध्वांश हलकेच पाण्यात डुबकी घेत
होता. श्वेत बकांची एखादी मोहक माला हलकेच पाण्यावरती उडत होती.
उजव्या बाजुला एका आम्रवृक्षाशी जाईची एक प्रसन्न वेली बिलगली होती. कां
कुणास ठाऊक ती हिरवट पोपटी लतिका मला श्यामवर्ण दामोदराला बिलगलेली राधिका वाटली.
मी प्रसन्नपणे हसलो. मनात विचार आला खरचं, एकपणाने एकाचाच
विचार करता येत नाही. राधेचं नाव घ्यावं तर डोळ्यासमोर शामवर्ण मुरलीधराची राजस
सुकुमार मुर्ती उभी रहावी अन् अंतकरणात त्या मुरलीमनोहराचं स्मरण करायला जावं तर
त्याच्याच वामभागी मंदाराची फुले माळलेली, मोहाच्या फुलांसमान कोमल गाल असणारी राधिका दिसावी. अव्दैताचा हा व्दैती
विलासही मोहक वाटावा असाच आहे. काय गंमत आहे पहा ना ! राधा
अन् माधव सर्वशः एक आहेत असे म्हणणे खरे नव्हे. पण दोन आहेत म्हणुं तर दोन
म्हणण्याइतकी दोन नाहित. यांना एक म्हणावं की दोन या प्रश्नातच मन गुंतुन राहतं,
अन् तो गुंताही असा सुसह्य वाटतो की यातुन मोकळिक मिळावी असं देखील
हळव्या मनाला वाटत नाही. मन फक्त मौनात झरु पाहतं. विचारांची वादळं पाणी निवळावं
तशी निवळत जातात. पण गेल्या दोन तीन दिवसात मात्र योगेशचन्द्र राय यांनी डोक्यात
त्या नास्तिक विचारांचं थैमान घातलं होतं त्यालाच समांतर परवा परवा सुमन पारिक
याचा ‘राधा का विकास’ या नावाचा प्रबंध
वाचला अन् उकाडा नसतानाही दुध नासावं तशीच मनाची अवस्था झाली. त्यांनी लिहलं होतं
की, ‘ राधेचा उगम अगदी आर्वाचीन असून ज्योतिष शास्त्रांतील
कविंनी घेतलेल्या कल्पनेतुनच झाला. त्यांनी प्रमाणही अथर्ववेदातील दिलं होतं.’
राधा विशाखा पुष्ये तु सिध्यतिष्यौ श्रविष्ठया ।‘ विशाखा नक्षत्राचं प्राचीन नाव राधा. इ.स.वी सन पुर्व २५०० वर्षांआधी राधा
हेच नाव प्रचारात होतं. अन् राधा-कृष्ण तत्व देखील कुठल्याही धर्माचं मुळ तत्व तस
नव्हतच. त्यांच्या मुळ मौलिक रुपात ती फक्त ज्योतिष तत्वं होती म्हणजे आहेतही.
वेदांमध्ये विष्णु हाच सुर्य कल्पिला आहे. या सुर्यालाच कृष्ण अशी व्याख्या करुन
नक्षत्रमंडळ त्याभोवती रासमंडळ रचित असल्याची कल्पना कविंनी या ज्योतिष
शास्त्रातुनच घेतली. कार्तिकी पौर्णिमेला सुर्य विशाखा नक्षत्रात असतो. म्हणजेच
पुर्वीच्या राधा नक्षत्रात असतो त्यायोगेच राधा कृष्ण यांचा रास सजतो. काही
ज्योतिषतत्वांनी कवितांचा आश्रय घेतला अन् ते रुपकधर्मी झाले. पुढे पुराणकालामध्ये
या रुपकधर्माचा विसर पडला अन् रुपकतत्वे अनायासे सत्य वाटु लागली. अन् अशा प्रकारे
बहुपल्लवित-पुष्पित अशा राधा-कृष्ण लिलेचा उद्वभव झाला.’ शशिभुषणदास
गुप्ता, श्री योगेशचंद्र राय अन् त्यानंतर सुमन पारिक या
त्रयींनी माझ्या आजवरच्या श्रध्देला मोठा धक्का दिला होता. अन् तसही नास्तिक विचार
ज्या वेगाने आस्तिकाला भ्रष्ट करु शकतात त्याचगतीने नास्तिकाला आस्तिक बनवणं
आस्तिकाला जमत नाही. हाच आस्तिकत्वाचा पराभव मानावा काय ? विचारांचं
असंच काहुर उठलं अन् कोपर्यातलं कोळीष्टक झाडुन टाकावं तसाच मी मनातला नास्तिकवाद
झटकुन टाकला. आस्तिकता तिच्या नैसर्गिक कामुकतेवर कलम केली तरी तिचा गुण स्वभावात
उरत नाही असे थोडीच आहे ?
विचार अशा गर्तेत अडकतात तेव्हा मला मुखर व्हावं वाटतं. कुणाशी तरी क्षणभर
बोलावसं वाटतं . कुणाला तरी कानभरुन ऐकावं वाटतं . कालही मी असाच एकटाच राधा
म्हणजे काय ते शोधात होतो. फडताळ्याच्या गाठोड्या शेजारीच अमर कोशाची प्रत होती.
कित्येक दिवसांची धुळ मी त्यावरुन झटकली अन् पान पान शांत चित्ताने शोधु लागलो. शेवटी
‘ राध्नोति साध्नोति कार्यमनया अः’ अशी
सुधाव्याख्या सापडली. मनोवांच्छित कार्यसिध्दी साधणारी सिध्दीस्वरुपा ‘राधा’. मी निर्विकारपणे मनाशीच हसलो.
पाठीमागुन कुणाच्यातरी येण्याची चाहुल लागली. मी
स्वतःशीच वळलो. स्वाती होती. मी सहज तिला विचारलं, ‘’ माई तुला राधा नावाची कुणी मैत्रिण आहे का गं ?’’ तिने
जरासा विचार करुन स्पष्टपणे नकार दिला. अन् चोरटा कटाक्ष टाकुन विचारलं, ‘’
का रे तुला काय करायचयं तिचं..अं...?’’
‘’ अगं तसं नाही गं म्हटलं पहावं की
राधा नाव असणार्यांना स्वतःच्या नावाबद्दल काय माहित असतं ते. ‘’
‘’ मग ठिक आहे....माझीही या नावाची कोण
मैत्रिण नाहीए’’
‘’ माई, राधा
खरंचं कृष्णाची कोण गं ? तिचं कृष्णाशी नातं तरी काय ?
माता ? प्रेयसी ? सखी ?
भगिणी ? की भार्या ? मीच
काय सारे विचारवंतही या कोड्यात आहेत. केवळ कृष्णावरील भक्तीमुळे कृष्णाच्याही आधी
तिचं नावं येत काय ? ‘’
‘’ दादु, राधा या
दोन शब्दांतच त्या श्यामवर्णाचं संपुर्ण सात्विक
अस्तित्व तराळू लागतं ना ?. खरं तर राधा हा जोडशब्द आहे. या
जोडशब्दातील ‘रा’ म्हणजे लाभो अथवा
मिळो तर ‘धा’ म्हणजे मोक्ष. राधा
म्हणजे मोक्षासाठी तळमळणारा जीव! युगंधरामध्ये राधा या शब्दाची लक्षणा अगदी हीच
केलेली आहे.’’ गाथा सप्तशती मध्ये तर इतका छान प्रसंग आहे की
गोपिका श्रीकृष्णास म्हणतात, हे कृष्णा राधिकेच्या
मुखकमलावरती असलेले गोरज फुंकर घालुन तु उडवित आहेस खरंच तु ती धुली उडवत नसुन
आम्हा गोपिकांचा गौरव हनन करित आहेस. किती छान वर्णण आहे ना ? अन् स्वतः श्रीकृष्णाने धुलीकणांवर फुंकर मारुन राधिकेचे मुखकमल नितळ
करावे हा राधेचा केवढा मोठा अधिकार ?
जाई-जुईच्या हिरव्यागार मंडपाखाली नक्षत्राचं
आकाशभाषण किती सुंदर असु शकतं ते मी काल अनुभवलं. कलत्या सुर्याच्या प्रकाशात
उजवीकडे पाने गळुन गेल्यावर नुसत्या पांढर्या फुलांच्या छत्र्या उघडणारे चाफे काल
विशेष लक्ष देऊन आमचं बोलणं ऐकत होते. आणि कधी नव्हे तो मी तिला इतक्या शांतपणे
ऐकत होतो.
कालच्या प्रसंगातील राधिकेच्या नावाची ही व्युत्पत्ती मला आठवली, ती अगदी भावस्पर्शी वाटली. या अर्थानेच माझी चिंतनतळी घुसळुन निघाली.
राधिकेच्या पदरवांच्या मागे माझा मनोरथ धावु लागला. मनात विचार आला; श्रीमद्-भागवतामध्ये राधिकेला कुठेही स्थान नाही. मत्स्यपुराण, पद्मपुराण, ब्रम्हवैवर्त पुराणांमध्ये कुठेकुठे
राधिकेचा निसटता संदर्भ मिळतो. पण श्रीमद्-भागवतासारख्या पुष्टीमार्गाच्या प्रमाण
ग्रंथामध्ये तिच्या अस्तित्वासंबंधी पुसटश्या खुणाही नाहित. विचारांचं एकच काहुर
उठलं मग सॅक मधील श्रीमद्-भागवताची प्रत काढुन अगदी
कृष्णजन्मापासुन मथुरागमनापर्यंतचा भाग मी पुनश्च वाचुन काढला. सर्गामागुन सर्ग
चालत होते राधिकेचा ठाव त्यांना माहीत नव्हता. येणार्या प्रत्येक नव्या ओळीने
राधिकेची ओढ लावावी अन् संपणार्या ओळीने कुत्सितपणे हास्य करत निघुन जावं..
राधिकेचं अस्तित्व रात्रीच्या भेसुर शांततेपेक्षाही पुसट होतं जावं. मी थांबलो.
खरचं वेदवृक्षाच्या परीपक्व फळातील या अमृतरसामध्येही राधा
मला सापडेना. खरचं सापडेना. काही विद्वानांना ती गवसला ती
अनयाऽऽराधितो नूनं
भगवान हरिरीश्वर ।
यन्नो विहाय
गोविन्द, प्रीतो यामेनयद् रह ।।
या श्लोकात ! खरं सांगु ? अनयाऽऽराधितो या
अनुष्टुपातील शब्दसंचाने राधा श्रीकृष्णास बिलगली हे मानण्यास मन तयार होईना.
कारण अनयाऽऽराधितो या शब्दांत शुकाचार्यांनी राधिकेचा परोक्ष उल्लेख
केलाच असेल हे छातीठोकपणे सांगता येत नाही. राधेचं हे
शब्दातीत अस्तित्व कदाचित श्रीकृष्णानेही नाकारलं असतं. आता मात्र गडबड झाली.
राधिकेच्या अस्तित्वासंबंधी प्रश्नचं प्रश्न मनात वादळं उठवु लागले. राधा हे तत्व
शुन्यतत्वात विलीन होत असल्याचा भास मला झाला. श्रीकृष्णाच्या जिवनपटावर
रुक्मिणीपेक्षाही अधिराज्य गाजवणारी मुग्ध नायिका राधा, हळुहळु
पुसट होत चालली होती. मी भागवत घट्ट बंद केला. भोळी श्रध्दा जगताना कधीही उपयोगी
पडत नाही दिपा !! हे गुरुजींचे शब्द आठवले मी अंग अंग शहारलो. मनाची असंख्य कवाडं
एका समेवर अचानक बंद व्हावी असं मला वाटलं. ओठ निपचित पडले. श्वासांची गती
मंदावल्याचा भास झाला. अंगावरती रोमांच उभे राहीले. निबीड आमावस्या मनात दाटली ना
चंद्र दृष्टीस पडत होता ना चंद्रिका. राधा हे तत्व मी गमावुन बसतो की काय असचं मला
झालं. जडावलेल्या पायांनी पुन्हा त्या श्रीरामाचं
दर्शन घेऊन मी परतीच्या प्रवासाला निघालो. खरंच शांत पाण्यावर आज पुन्हा कल्लोळ
उमटले होते.
त्या रात्री बराच वेळ मी जागा होतो. गॅलरीत संथपणे येरझारा मारत होतो.
कदाचित पिधान योग असावा. चंद्र वलयाशेजारीच एक चांदणी उगवली होती. त्या तारकेला
पाहताच राधेचा तोच विचार पुनश्च जागृत झाला. कोण होती राधा !! तिचं अस्तित्व सत्य
की कवी कल्पना मात्र ? तिचं स्वरुप नित्य अनादि अनंत एकरस की,
साधन जगत वा कल्पना जगतात तिचा उत्तरोत्तर विकास झाला ? तिचा कृष्णाशी काय संबंध ? राधा कृष्णाची परिणिता
पत्नी वा परकिया स्त्री ? आज जिच्यावरती भलीमोठी
पुस्तके निघतात. कुठे गवसली ही कुणाला ? की नव्हती कुणी राधा,
गोकुळात ? राधा नावाचे अनंत प्रश्न माझा
पाठलाग करत होते. कदाचित ती मला सतावत होती, तिच्या
अस्तित्वाबद्दल शंका घेतल्याबद्दल. म्हणतात, राधेला त्या
गोविन्दावाचुन काही सुचतच नव्हत. मोरमुकुटधारी, पितांबर धारण
केलेला, देहुड्या मुद्रेने यमुना तटावरती बासरीची अनवट
सुरावट छेडनारा वेणुधर म्हणजे तिचं सर्वस्व ! तिच्या तना मनावर फक्त एकच तान,
कान्हा !! त्याच्या श्वासात, त्याच्या ध्यासात
स्वतला झोकुन देणं एवढी एकच कला तिला माहित. कित्येक राधा माझ्या भोवती उभ्या
राहील्या, अन् लिहायला घेतल्या कि अदृश्य झाल्या. ‘राधा’ या दोन शब्दांखेरीज मला पुढे लिहता येईना ! मी
थांबायचं ठरवलं. आता राधा उमगल्या खेरीज तिच्याविषयी लिहायचच
नाही हा विचार मनाने पक्का केला. वार्याने अस्ताव्यस्त झालेली पानं गोळा केली. आत
आलो. झोपण्याचा प्रयत्न करु लागलो. छतावर फिरणार्या पंख्याच्या पात्यांकडे मी
एकटक पहात होतो. प्रिये चारुशीले प्रिये चारुशीले ही अष्टपदी नकळत ओठावरती आली अन्
अडकली. त्या सावळ्याचे ध्यान होताच मी गडबडलो. राधिकेचा किती मोठा अपराध मी आज
केला होता. कदाचित त्या सावळ्याचाच अपराध मी करत होतो. मी मनोमन त्याला म्हटलं,
माधवा !! नकळत मी हा अपराध करतो आहे.नव्हे तु हा अपराध माझ्याकडुन
करवुन घेत आहेस. आज तुझी राधिका मी तुझ्या पासुन दुर करतं आहे. या मागील कर्ता अन्
करविताही तुच रे! मला का निमित्त करतोय ? मी उजव्या कुशीवरती
वळलो, कॉर्नर टेबलवरच्या श्रीकृष्णाच्या मुर्तीवरती मंद
प्रकाश पडला होता. त्याचा सदैव प्रसन्न असणारा चेहरा आज मला चिंताक्रांत वाटला.
अधरावरती धरलेल्या पोवरीतुन रामकरीचे विरागी स्वर निघत असावेत असं मला उगीच वाटलं,
अचानकपणे त्याच्या वामभागातुन अदृश्य झालेल्या राधिकेचा तो शोध घेत
असावा. सप्तमावतारात विरहाने व्याकुळ झालेल्या श्रीरामांनी कोठे सिता जनकनंदीनी ? हा आर्त प्रश्न लता, वृक्ष, नद्या, वन्य मृग या
वनसंजिवकांनाही विचारला होता. विरह शब्द वाटतो तितका साधा नाही. म्हणुनचं
रामासारखा पुर्णावतारही तो सहजपणे पचवु शकला नव्हता. या
ना त्या प्रसंगाने श्रीकृष्णाच्या आयुष्यात हा विरह त्याने कधी अनुभवला की नाही
याचं उत्तर कदाचितचं एखाद्या धर्मग्रंथात मिळेल. राधिकेसाठी कितीतरी चिंतातुर
भासला तो मला !
मी पुन्हा उठलो. टेबलवर ठेवलेली कवितांची वही उघडली.
कृष्णे वेधिली विरहीनी बोले, जागृती पुसे
साजनी नवल बोलीले अंगणी, घनु वाजे घुणघुणा या सारख्या
विरहीनी मी कित्येकदा ऐकल्या होत्या. ज्ञानोबारायांनी लिहलेल्या सर्वच विरहीनी
मधुराभक्तीतुन लिहलेल्या. पण आज राधिका नव्हे तर स्वत कान्हा विरहात बुडाला होता
राधिकेच्या. मनाच्या गाभार्यात राधिकेवाचुन श्रीकृष्ण एकटा पडला होता. आपलं
उत्तरीयं सावरतं तो तिला शोधण्यासाठी निघाला होता. लेखनीच्या झरझर झरणार्या
शाईतुन, श्यामाची ही विराणी हलकेच कागदांवरती जन्म घेत होती.
जग खिळले भुलले
वाटे
मनी शांत साजिर्या
लाटा
मी यमुना काठी शोधी
तव हिरव्या पाऊल
वाटा ।।१।।
ते दिवस भारले
प्रेमे
ती धुंद भावना ओली
नेत्रांशी खिळलो
दोघे
नयनांत हरविली वाणी
।।२।।
तो श्वास एक
फुललेला
तो स्पर्श लाजरा
देही
ओठांशी ओठ निवाले
चैतन्य जागले रोही
।।३।।
ती ओढ अधिर मिलनाची
रुधिरांत बहरुनी
आली
रामाच्या
देहद्रुमावर
जणु सिता वल्लभ
वेली ।।४।।
ती कुठे राधिका आता
ना साद येतसे कानी
वार्याच्या
हिंदोळ्यांवर
कान्हाची आर्त
विराणी ।।५।।
एव्हाणा शुक्राची चांदणी उगवली होती. राधा नावाची समाधी
लागावी असचं झालं. वास्तविक कृष्ण हा वाटमारी करणारा आहे पण माझ्या बाबतीत तर
राधेनेच वाट अडवली होती. हातातील लेखनी अडली होती राधा या दोन शब्दांत. आता शोध
सुरु करायचा होता राधिकेचा !!! सर्ग, प्रतिसर्ग,
वंश, वंशानुचरिते अगदी बाजुला ठेऊन तिला
शोधायचं होतं. ज्याने या खेळाची सुरुवात केली होती तो खेळिया खुपचं शहाणा होता.
खेळाचा डाव माझ्याही नकळत त्याने माझ्यावरती उलटवला होता. !! अन् हा खेळ खेळता खेळता एक सुचक सल्लाही दिला होता. ‘‘ ऐक खेळिया तुज सांगितलें ऐसें जाणुनि खेळ खेळेरे.....’’
हवेत गारवा वाढला. मी अंगभर शाल ओढुन घेतली. खिडकीतुन आत डोकावु पाहणार्या
जाईच्या मंडपावरील कळया उमलायला लागल्या होत्या. मी मात्र निद्रेच्या आधिन झालो
होतो. .....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा