कधी काळी गगनीं रंग भरित बैसलो होतो. रंग उणा जाहला म्हणून हृदयाची दौती उघडली. त्यातील रंगांचा माझ्या जवळच्या कुंचल्यांना हेवा वाटला. का कुणास ठाऊक ? वाटेत तिऱ्हाईतास अडवावे तैसे त्यांनी मला खिंडीत गाठले. वाटमारी करणान्या मलंगांनी सज्जड दम भरावा अन् प्राणभयाने वाटसरुने प्राणभिऊन अंगावरचे असले नसले सारे द्रव्य त्यांहाती सोपवावे ऐंसे झालें. प्राप्त परिस्थितीत मी तरी दुसरं काय करणार होतो ? माझ्या हृदयाची कवाडं मी उघडली अन् कान्हुलं थरथरतं इंद्रधनु काढून त्यांहाती सोपवलं, रिता झालो. मुक्त झालो…
ज्याची काळजी करावी अन् सोस धरावा असे क्रियामान संपल्याने चिंता काजळे कुठल्याकुठे निघुन गेली, अजुबाजुचं वादळ विरून जावं अन अंती ओंजळीमध्ये निकी पवित्र प्राजक्ती राहावी ऐंसें झाले. वेगाने फिरणारी भिंगरी जणु जमिनीला स्पर्शून फिरत आहे असे वाटते, तसाच मी या भेदबुध्दीच्या आठवणींना चिकटत गेलो. दुर्वा जुळवाच्या तश्या आठवणी जुळवित गेलो. लिहता लिहता वाटायचं ही पानगळ कशासाठी जमवतोय आपण? कशाचा हा अट्टहास? पुन्हा चैत्र येईल, लालसर हिरव्या कांतीतून पुन्हा लक्षलक्ष गर्द हिरव्या धुनी चढतील. माळावरच्या गवताची लवलव, आभाळातील निळे जांबळे रावे, वेळुबेटातील स्वरवेडी बासरी ऋतुपालटीने पुन्हा कवेत येईल. हे वेड सोडावं असं वाटायचं, अन् असं वाटलं की अंगठ्यावाचुन धनुष्याची प्रत्यंचा ओढणारा एकलव्य माझ्या नजरेसमोर यायचा. मी माझ्या पापण्या जणु त्याच्या चरणांवर वहायचो. किनार्याचे पक्षी तरावाच्या डोलकाठयांवर बसल्याने सारंगाला जो हुरूप येतो त्याच उत्साहात आयुष्याच्या वसंताचे अनेक रंग मी पुन्हा नव्याने डोळ्यांत भरून घ्यायचो.
हा काळ फार फार तर तीन साडेतीन वर्षांचा आहे. या पवित्र पर्वात मी हृदयाची मधुर कंपने पुन्हा अनुभवित होतो. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं वाङ्मयीन तप आचरण्याचा यथामती प्रयत्न करित होतो. या विंशोत्तर एक आठवणी जणु खर्ज, मंद्र अन् तार सप्तकातील, षडज, रिखब, धैवत निषादादी सप्तस्वरांचे मंडल आहेत. या आठवणी म्हणजे हृदयात अनाहत वाजणाऱ्या वेणुची भाषांतरे आहेत. हो, यातील काही आठवणींना प्रभुप्रेमाचा रंग नसेलही कदाचित.. पण पहाट भुपाळीच्या पवित्र अंतःकरणानेच मी त्या गायल्या आहेत, परसदारात पडलेल्या दंवओल्या फुलांचा सडा मी हाती घेऊन कधीचा उभा आहे. अश्वत्थवत भासणाऱ्या या संसार वृक्षाच्या मोहांत अडकण्यापुर्वीच त्या वेणुची अनाहत सुरावट हृदयात घुमू लागली; कधीकाळी थरथरणाऱ्या इंद्रधनुचं इंद्रवज्र झालं, अन् तळजडल्या दिठीने का होईना आज माझ्या भावविश्वाचे उद्यापन करायला मी तयार झालो आहे. कदाचित माझ्या भावसंगीताची ही भैरवीही असेल पण फार आनंदाने मी ती गात आहे.
अधिक काय लिहिणें ?
मी तुमचिया कृपेचे पोसणें..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा