गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४

गड रायगडीं आनंद


सकाळी सकाळीच महाडवरुन निघालो. आकाश निरभ्र असलं तरी हवेत गारवा होता. रायगडाचा पायथा इकडुन आणखी चोविस किलोमीटर असावा. कोकण म्हणजे भुलोकावरील स्वर्गचं ! त्यातही रायगड म्हणजे देवाघरचे देणे. समुद्रसपाटी पासुन साधारणतः पावणे नऊशे मीटर उंची वरती असणारा हा गिरीदुर्ग ! पश्चिमेकडील जिब्राल्टरचे ठाणे जितके अभेद्य, दुर्गम तितकाच रायगड अजिंक्य !  मोहीम आखली तेव्हाच मनात थोरल्या महाराजांचे शब्द घुमत होते. तक्तास जागा हाच गड करावा. अगदी एका दिवसात आखलेली ही मोहीम. सुरुवात करायची ती तुळापुराच्या संगमावरुन, मग थेऊर मार्गे सासवड, काळदरी मार्गे भोर, महाड अन् रायगड. मनसुबा पक्का. पाठीवरती भटकंती साठी सदैव तयार असणारी सॅक टाकली अन् निघालो. 

पाचाडातुन दोन किलोमीटर पुढे आलं की, रायगडाचा पायथा लागतो. गाडी तिकडेच पार्क केली. गाडीतुन उतरलो अन् गाईड पाहीजे का? असा एका शाळकरी मुलीचा किनरा आवाज आला. अंगाभोवती उबदार कपडे घातलेली ती मुलगी प्रसन्नपणे आमच्याकडे पहात होती. 

 '' नको’’ , मी म्हणलो. 

 '' मग चहा तरी घ्या इकडे, एकदम कडक गवती चहा’’

का कुणास ठाऊक पण त्या कन्येचा आग्रह मोडणं मला जिवावर आल्यासारखं झालं.   

कॉफी मिळेल ? दोघांच्या संवादाला मध्येच तोडत आमच्या अहो.. 

''होऽऽ... ...या.. ना.. , त्या चिमुरडीने सहज उत्तर दिलं ...

मी इकडच्यांकडे पाहिलं. तिने अंगाभोवतीचं स्वेटर घट्ट केलं. थंडीने कुडकुडत ओठ थरथर नाचत होते. हातांचे दोन्ही तळवे एकमेकांशी घासल्याने उब मिळत असली तरी ओठांची अस्पष्ट हुसहुस चालुच होती. तिला थंडी खुपच जाणवते. कॉफिचा उष्ण कप हातात आला अन् अनवाणी पायांनी रखरखणार्‍या उन्हात पायपीट करणार्‍या पांथस्थाला एखादी सोनहळवी सावली मिळल्यानंतर त्याच्या मनाची जी स्थिती होते तसचं माझ्या मनाचं झालं. हिची नजर अजुन तरी माझ्या नजरेच्या टप्प्यात आली नव्हती. राग अजुन गेला नव्हता. चाफेकळीसारखं नाक रागाने लालबुंद झालं होतं. कालच्या गरम झालेल्या कानाच्या पाकळ्या कदाचित आत्ताही गरम असतील असं मला वाटलं.  मी मुद्दाम काही न बोलता कप खाली ठेवला अन् चित्त दरवाजा समोर येऊन उभा राहिलो. कॉफीचा कप तिच्या ओठांशी भिडत होता. मी स्थब्धपणे तिच्याकडे पहात होतो. चांदण्यारात्री विरळ धुकं पडावं अन् त्या धुक्यातुन असंख्य नक्षत्र-तारकांनी सजलेल्या अंधुक आकाशाकडे पहावं..तिच्याकडे बघताना मला तसाच काहीतरी भास झाला. त्या विचारांच्या विरळ धुक्यातुन मी काहीसा बाहेर आलो. स्वतःशीच जरा फिरलो. रायगडाच्या पहिल्या वहिल्या पायरीला हाताने स्पर्श केला. पहिल्या पायरीवर पहिलं पाऊल पडणार तोच.. 

'' थांब '', तीचा आवाज

'' काय झालं ? ’’ 

'' सेल्फी घेऊया दोघांचा. '' 

सुटलो !! मी सुटकेचा निश्वास टाकला. रायगडाच्या चित्त दरवाजाच्या पहिल्या पायरीवरती या चित्तचोरटीने आम्हा दोघांचा सेल्फी घेतला. जिव भांड्यात पडला. मनात म्हटलं एकवेळ जळता निखारा हाती शांत करायला काही वाटणार नाही, पण क्षुब्ध अवस्थेतील हे रानफुल शांत करणं हे कर्म कठीणं… सिध्दीस गेले बरे झाले. या रानपाखरासोबत भटकंती अन् मुसाफिरी खरचं काहीतरी शिकवुन जाते म्हणुणच तिचा क्षुब्धपणा परवडण्यासारखा नाही. रायगडाच्या या पहिल्या पायरीला नमस्कार करण्यासाठी ओणवतांना आम्ही फक्त एकमेकांकडे पहात होतो. एक दहा पंधरा पायर्‍या चढलो की खुबलढा बुरुज स्वागताला उभा असल्यासारखा वाटला. सत्तावीस फुट उंच अन् पन्नास फुट घेर असणार्‍या त्या लढवय्या खुबलढा बुरुजाचे आता फक्त अवशेषच उरले आहेत. या चिरंजीव वृध्दत्वाने त्याचे चिरे आज खिळखिळे झाले आहेत. तरीही हिरव्यागार झाडांची पालवी आपल्या छातीवरती घेऊन हा योध्दा अजुनही उभा आहे. 

पावला-पावला गणिक गड सर होऊ लागला. तशी इतिहासाची पानं फडफडु लागली. या रायरीच्या इतिहास ग्रंथाची पाने मोठ्या कष्टाने जुळवित बसलेला काळ कोळीष्टकांनी बुजवलेल्या घरात कित्येक वर्षे पडुन होता. आमच्या अहो इतिहासाच्या वारकरी असल्याने प्रमाण ग्रंथाची अन् ग्रंथकारांची इत्थंभुत माहिती तिच्याकडे आहे त्यातुन ईश्वरदत्त कवीमन अन् बुध्दीचे तेज यांचा संगम असल्याने हा गड पहावा तो तिच्या नजरेतुन हा अलिखित नियम मनाशी ठरवुन मी त्या धुक्यातुन चालु लागलो. चालता चालता एकीकडे तीन फर्लांग अंतरावर नाणे दरवाजा दिसु लागला. वाडीमार्गे गड चढु लागलो की नाणे दरवाजा पाहता येतो पण यामार्गी धुक्यातुन होणारे त्याचे आकाशदर्शन विलोभनीय वाटते. हिरव्यागार साजाने सजलेला अन् निळ्या गर्द ध्यानाने वेढलेला नाणेदरवाजा मोठा राजबिंडा कर्तबगार सरदार वाटु लागतो. त्याच्या माथ्याशी हलकेच एक ढग उतरला जणु तो शीरपेच चढवत होता. हाताला जरा उष्मा जाणवला म्हणुन मी त्या नयनमोहक चित्रातुन बाहेर आलो. हिने हात हाती घेतला होता. मी काही सुचेनासं होऊन उगीच बोलावं म्हणुन बोललो.. 

आज तशी गर्दी कमीच दिसतेय ना ?

'' काहीतरीच काय ? भरपुर गर्दी आहे की, आता प्रवासाची साधने झाली म्हणुन जमतात लोक... अन् करतात गर्दी इकडे विकेंड वगैरे साजरे करण्यासाठी. पण तुला एक गम्मत सांगु ? म्हणजे अठराशे अठरामध्ये जो रायगड पडला त्यानंतर जवळ जवळ अठराशे त्र्याऐंशी पर्यंत हा गड रोज रोज एकटा पडत गेला. मराठमंडळीही इकडे फिरकत नसत. त्र्याऐंशी सालापर्यंत फक्त एका इंग्लीश तरुणीने रायगडाचा प्रवास केला होता. ‘ मुंबईहुन नागोठाण्यापर्यंत बोटीने यावे. तेथुन टांग्याने रखडत रखडत चढउताराच्या रस्त्यावरुन शरीराला हिसके बसताहेत अशा स्थितीत प्रवास करायचा . नागोठाण्याहुन पहाटे चार वाजता प्रवासाचा प्रारंभ होई. मार्गात धुके पसरले आहे, सकाळच्या हवेतील थंडावा जाणवत आहे अशा स्थितीत प्रवास घडे. गड दाखवायचे काम पाचाडचे मुजावर सैद अहमद किंवा वाडी येथील श्रीधर भगवान शेट सोनार हे करत. हे दोघेही मला रायगडाबद्दल अन् शिवाजीबद्दल अनेक रंजक दंतकथा सांगत ‘ हे सारं ती आपल्या रोजनीशीत लिहुन घ्यायची ज्यावेळी रिचर्ड डग्लसने आपलं बुक ऑफ बॉम्बे प्रसिध्द केलं त्यावेळी हे वर्णण उतरवायला तो मुळीच विसरला नाही.’’ चालता चालता ती बराच वेळ बोलत होती. 

आता पर्यंत बरीचशी चढण चढुन आम्ही वर आलो होतो. मनात आलं की ही कसली कसली पुस्तकं वाचते ? त्या पुस्तकातही तिची सौंदर्य दृष्टी देखणी होती. मी काहीसा चोरटा कटाक्ष तिच्याकडे टाकला. या बोचर्‍या थंडीतही तिला घाम आला होता. मी काहीवेळ बसुया म्हणुन पाठीला रायगड घेऊन बसलो. खुप वेगाने नजर धावु लागली हळुहळु आकाश उजळु लागलं होतं. समोर कालकाईचा अन् गुरकाईचा डोंगर आपल्या अंगाखांद्यावरती अहिन, साग, अर्जुन, शिसवी, मोह, पळस, आपटा, निलगीरी या महावृक्षांना घेऊन उभा होता. कां कुणास ठाऊक तो मला ज्ञाना, नामा, चोखा आदी संतभार अंगाखांद्यावरुन वाहणारा लेकुरवाळा विठु वाटला. त्याच्या समचरणांशी तिष्ठत असलेली कौलारु घरं, सोन पिवळ्या वाटा, हिरवीगार शेतं, तांबडे फुटलेले पलाश पाहिले की वाटलं सृष्टीने ही फुलापानांची पुजा त्याच्या चरणांशी बांधली आहे.  

  टाकावरती टाक चढावा तसा क्षणाक्षणांनी प्रहर बनत होता. निसर्ग माधवी धुंद होऊन नाचत होती. दोन पक्षी उंच आकाशात उडत राहावेत अन् त्यांना गगणाचेही भान राहु नये अशीच आमची स्थिती झाली असावी. धुक्याचे पडदे विरळ होता होता पायांखालच्या पायर्‍यांवरुन पायांवर अन् पुन्हा पायरीवर आतुरलं पाणी खळखळुन वाहत होतं. पाय भिजत होते. तिच्या गौरवर्ण पायांतील पैंजने मधुर झंकारत होती मी काही काळ तिच्या पायांकडे पहातच चालत होतो. अत्तराचा सुगंध दरवळावा तशी एक सानुली आठवण दरवळुन गेली. तिच्या वाढदिवसाचा दिवस होता तो.. त्या टळटळीत उन्हामध्ये कुठेतरी पाटातुन उनाट पाणी खळाळत होतं. उष्मा बाहेर निघावा म्हणुन ती पाय धुण्यासाठी पाटाच्या पाण्यात उतरली. पण त्या प्रवाहात तिला निटसं उभा राहता येईना. आधारासाठी तिने मला जवळ बोलवलं. एखाद्या कातळात कोरलेल्या मुर्तीसारखा मी तिच्या शेजारीच जाऊन उभा राहिलो..तिने पायातील पैंजन काढलं, क्षणभर ते रुणझुणलं. हातात घेतलेलं पैजन तिने पाण्यामध्ये नितळ केलं अन् आपल्या गौरवर्ण पायांत घातलं. हा पैंजनाचा शृंगार मी साद्यंत पहात होतो. वेडावल्यासारखा...मी तिच्या प्रेमात पडलो. मनास वाटलं की रुपकळी पावलं आपल्या जीवनाचं अंगण किती मोहक सजवतील ? ही चैत्रबाहुली आपल्या आयुष्यात...मी विचाराच्या गर्त्यात सापडलो असताना पाण्याचा एक झपका अंगावर आला. माझे प्रणयरंजन एक हजार फुटावरुन खाली कोसळले.. ती अंगावर पाणी उडवित होती..हौदोस मांडला होतास.. हुऽऽश...माझ्या मनावर शुभ्र चांदणं पसरलं. त्या आठवणीतुन बाहेर याव अस कुणालाच वाटलं नसत.  त्या दिवशीची पाणी उडवणारी एक उनाट पोरटी .. किती फरक पडला होता तिच्यात..मी तिच्या चेहर्‍याकडे पाहिलं. तेच लाघवी हास्य, कुंदकळीसारखी देखणी, हरणीसारख्या डोळ्यांची लावण्याची खाण.. ! तोच चिरपरिचित पण प्रत्येक वेळी अपरिचित वाटणारा तुझ्या पैंजणाचा आवाज, पक्षांची दाट किलबील, वार्‍याचा मंद घोगरा खर्जा, हिरव्या तांबुस पानांची सळसळ अन् त्यात मिसळलेला तुझा ईषत् उत्तेजित स्वर..

'' काल स्वप्नात जे पाहिलं सारं सारं तेच सुंदर...आनंदवनभुवनी..'', ती

'' अं...?...''

'' समोर पहा.. स्वप्नी जे देखिलें रात्री । ते ते तैसेची होतसे । हिंडता फिरता गेलो । आनंदवनभुवनी ।। '', ती...

''हल्ली अशाही अनुभुती येतात का तुला.. ..? '', माझा मिश्किल सवाल.. 

अन् उत्तरादाखल केलेलं साक्षात जगदिश्वरालाही मोहवुन टाकणारं तुझं निर्मळ हसु... निशब्द उत्तर..खरं सांगु चित्रालंकाराचं सर्वांग सुंदर उदाहरण मला गवसतं ते तिच्या मोहक चेहर्‍यावर.. ! तिच्या लकेरी हास्यातुन जणु नवनवीन प्रश्न जन्म घेतात. मला मग माऊलींची ओवी आठवते. हे शब्देवीण संवादिजे..

मी समोर पाहिलं. महादरवाजा अगदी नजरेच्या टप्प्यात आला. मला सभासद आठवला. त्या आत्मविभोरावस्थेत मी बोलु लागलो.

'' पुढे रायरी गड अदलशाही होता तो घेतला. राजा खासा जाऊन पाहातां गड बहूत चखोट, चौतर्फी गडाचे कडे तासिल्याप्रमाणे, दिड गांव उंच, पर्जन्यकाळी कडियावरि गवत उगवत नाही. आनी धोंडा तासीव एकच आहे असा चखोट. दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोकडा, दौलताबादचे दशगुणी गड उंच. असे देखोन बहुत संतुष्ट जाले आणि बोलिले, तक्तास जागा गड हाच करावा ‘’

माझं बोलुन संपण्याच्या आगोदरच तिचं जेधे शकावलीतील आकाशभाषण सुरु झालं

'' सके 1577 संवत्सरी पौष शुध्द चतुर्दस राजश्री सिवाजी राजे याणी देशमुखाचा जमाव घेऊन जाऊली घेतली. चंदरराऊ पळोनी राइरीस गेले. तेथे राजश्री स्वामींनी किलीयास वेढा घातला. पुढे वैशाखमासी सके 1578 शिवाजी राजे भोसले याणी रायरी घेतली.’’ 

आम्हां शेजारीच चारदोन वृध्द जोडपी उभी होती. तिचं बोलणं संपलं तेव्हा अनपेक्षितपणे वृद्धत्वाकडे झुकलेल्या टाळ्या तिच्यासाठी वाजल्या. तिच्या चेहर्‍यावर लाख कळ्या एकदम उमलल्या. त्या सांजवलेल्या चेहर्‍यांचा निरोप घेत पाय पुढे चालु लागले.  अगदी दीड दोनशे फुटावरती, भल्या उंचीवरुन एक जलप्रपात धबधब्याच्या रुपात कोसळत होता. दुधी धारांमध्ये काही तरुण तरुणी चिंब भिजत होते.. त्या दुग्धधारा शिरी घेताना वाटलं की माथ्यावर शशी पियुषाभिषेक होतोय. तडातड पाण्याच्या धारांचे तडाखे बसत होते. भिजलो.. पण पायाखालची वाटदेखील त्या श्रीमान रायगडाला भेटण्यासाठी अधीर झाली होती म्हणुन पुन्हा निघलो.. तुझ्या कविता अन् विनोदामध्ये पायर्‍या सरत होत्या. विरत होत्या. 

समोरच्या खळग्यातुन जरा माथ्यावर आलो तो वायव्यदिशेला तोंड करुन स्वर्गलोकाचा महादरवाजा आपल्या दोन्ही भुजा उंच उभारुन सामोरा आला. त्याच्या सोबतीला जय अन् विजयांच्या रुपालाही लाजवणारे 65 अन् 75 फुट उंचीचे मस्तवाल बेमिसाल बुरुज आले. यांच्या पिळदार वलयावरती त्यांना साजेश्या अन् सुप्रमाण जंग्या आहेत.दरवाजावर बाहेर सुर्यविलासीनी कमलाकृती आहेत. त्या रायगडाचे थोर, बांकी, बेलाग रुप पाहताना मन मोहरुन जातं. उजवीला अगदी टकमकापर्यंत, अन् डावीकडे हिरकणीच्या बुरुजापर्यंत असलेली, काळ्या कातळांनी रेखीत गेलेली तटबंदी पाहिली की तो महादरवाजा आपले विशाल पंख पसरलेला जटायु वाटतो. तो देखावा डोळ्यात भरुन पुढं निघावं लागतं. महाव्दारातुन थोडं पुढं आल्यावरती हत्ती-तलाव दिसला. सध्या गळती लागल्याने हा तलाव कोरडा पडला होता.त्यापुढेच शे-दिडशे फुटावर निळ्याशार पाण्याने तुडुंब भरलेला गंगासागर तलाव दिसला; वाटलं सप्तनद्यांच्या पाण्यांनी पवित्र झालेले जलकुंभ याच पुष्करणीमध्ये रिते झाले होते. या जलाशयाच्या पश्चिमेकडे काही अंतर सोडुन आम्ही उभे राहिलो, अक्षीपटलावरती उभं राहलं  ते राजधानी रायगडाचं विभव. गगणपटावरचं सुंदर दृश्य धुक्याने अधिकचं सुंदर झाल्याचा भास झाला. स्वराज्याच्या या राजधानीचे गंधर्व असलेले व्दादश कोनी नक्षीदार स्तंभ गंगासागराच्या धुमतीकडे तेजाळल्यासारखे वाटले. मनामधली एकएक दिवली दिपमाळ झाली. फांदीवर बसलेल्या पाखरांनी स्थिर बुबुळांनी तळ्यासारख्या दिसणार्‍या स्तब्ध हिरव्या रानाकडे पहावं तसचं आम्ही कित्येक वेळ त्या मनोर्‍यांकडे पहात होतो. 

खुप वेळ झालं तरी शब्द हरवल्यासारखे आम्ही फक्त चालत होतो. पालखी दरवाजातुन बालेकिल्यात पाऊल टाकलं शेवाळलेला राणीवसा अन् मुनई फुटलेला मेणा दरवाजा पाहुन आम्ही राजभवनाकडे फिरलो. सुर्य एव्हाना माथ्यावरती आला असला तरी पिंजलेल्या ढगांनी जणु त्यांवर पांघरुन घातलं होतं. रत्नशाळा, अष्टप्रधानांचे वाडे पाहिले अन् थेट राजभवनाकडे पाय वळले. ही जागा थोरली. सिंहासनाच्या जागेकडे जाताना आम्ही पुन्हा पायावर पाणी घेतलं. सिंहासनाची ही जागा गेंदाच्या फुलांसारखी तुडुंब भरली होती. मी मनोभावे हात जोडले. शांत सजल मौनातुन अन् मिटलेल्या दिठीतुन काहीक्षण शिवतीर्थ अवतरतं गेलं..मी अशरीरी होऊन राज्याभिषेक पहात होतो.  

 गाद्या, लोड, पडदे, किनाती, शालरी, झुंबरे, अत्तरदाण्या, पुष्पसंभारांच्या माला आणि अनंत श्रृंगारांनी सजवलेली राजसभा ! रत्नांची तोरणे, अन् पाचुची आरास, मखमली साज, सप्तरंगानी रेखलेल्या रांगोळ्या, उंचपुर्‍या सहानपुरी धुपदाण्यांतुन निघालेली सुगंधी धुराच्या वेटोळ्या छताशी घुटमळत होत्या, बैठकीच्या दोन्ही बाजुला शिसवीच्या तिवईवर मुरादाबादी चांदीच्या पिकदाण्या ठेवल्या होत्या. छताशी नक्षीदार चिरागदाने हिंदोळे घेत होते; राजसभेच्या सदरेत पाऊल बुडेल असा इराणी गालिचा अंथरलेला होता. पडद्यांच्या वरच्या अंगाला लावलेल्या मोत्याच्या तोरणांचे पाचुचे लड पडद्याच्या किनारीवरती झुलत होते. समोरच खाजगीच्या बाजुला अर्धापुरुष उंचीची लोडा तक्यांची बैठक आईसाहेबांसाठी केली होती.सिंहासनाच्या दोन्ही बाजुंना सुवर्णांकित भाल्याच्या टोकांवर अनेक अधिकार निदर्शक व राजसत्तेची द्योतक चिन्हे मला दिसली.उजव्या हाताला दोन मोठी मोठ्या दातांच्या मत्सांची सुवर्ण शिरे होती. डाव्या बाजुला अनेक अश्वपुच्छे एका सुवर्ण भाल्याच्या टोकावरती अडकवली होती. समोरच एक सोन्याच्या तराजुची पारडी न्यायचिन्ह म्हणुन तळपत होती. ब्राम्हणांचे मंत्र कानावर येत होते.

नत्वा गणेशं शिवशारदेच मुलं समालोच्य च विष्णुधर्मम् । राज्याभिषेकस्य महाप्रयोगं विश्वेश्वरो दैनकरिस्तनोती ।।

त्या श्लोकांसरशी मी सुक्ष्म देह टाकुन कारण देहाकडे झुकलो. अष्टांगभाव जागृत झाले. कोरलेल्या औंदुबराचं लाकुड पाहुन खांद्यावरचं यज्ञोपवित थरारलं..पण तुळशीच्या मंजिरीभोवती गिरकी मारणार्‍या भ्रमराच्या गुंजारवा सारखा अस्पष्ट पण गोड आवाज कानावर आला. त्या शब्दाशब्दात मधु काव्य गुंफलं होतं. 

‘’ छत्र जडावाचे मोतीलग झालरे करुन मस्तकावर धरले. छत्रपती असे नाव चालविले. कागदीं पत्रीं स्वस्तिश्री शक, सिंहासनावर बसले त्या दिवसापासुन नियत चालवला.कृतायुगीं, त्रेतायुगीं, व्दापारी, कलयुगाचे ठायीं पुण्यश्लोक राजे सिंहासनी बैसले. येणेप्रमाणे राजे सिंहासनारुढ जाले. या युगीं सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा. हा मर्‍हाटा पातशाहा येवढा छत्रपती जाला. ही गोष्ट काहीं सामान्य जाली नाही. ‘’

गुलाबाच्या पाकळ्यांसारख्या ओष्ठव्दयीं वर किती ग्रंथ, बखरी,शकावली लुप्तावस्थेत राखुन ही योगिणी माझ्या वामभागी उभी आहे हा विचार मनात आला. मी प्रसन्नपणाने हसलो. तिच्या लाघवी पापण्या जणु स्वप्नात रमुन गेल्या होत्या. डोळ्यांच्या कडा हलक्या काजळीने रंगल्या होत्या. धारधार नाक, पातळ ओठ, रेखीव काळेभोर डोळे, उंच मान तिच्या चेहर्‍याच्या गोडव्यात भर घालीत होती. मी स्वतःला सावरलं..पुन्हा पुन्हा सावरलं. डोळ्यासमोरच्या सुबक चौथार्‍यावरती त्या पुण्यश्लोक राजाची अष्टस्तंभी मेघडंबरी होती. आम्ही त्या शिवप्रभुंच्या चरणांवरती मोगर्‍याची फुले मोठ्या मनोभावे वाहिली. 

जडपायांनी तिथुन निघालो. सरासीन पध्दतीच्या नगारखाण्याच्या प्रवेशव्दारातुन बाहेर आलं की कुशावर्त, वाघदरवाजा अन् दुरवर पोटल्याचा डोंगर दिसु लागला. मंदावलेल्या पावलांची गती वाढवत आम्ही होळीच्या मैदानातुन, पुरुषभर उंचीच्या बावीस दुकानांच्या शेष राहिलेल्या जोत्यातुन, बाजारपेठेच्या चाळीसफुट रुंद रस्त्यातुन जगदिश्वराची वाट धरली. डाव्या अंगाला आपलं एकटेपण अबाधित ठेऊन एक देऊळ दिसलं बहुदा दे शिर्काईचं देऊळ...गडावरची मुख्य देवता...

आनंदडोही तरंगणारे दोन जीव जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाले होते. नुक्तीच पावसाची सर येऊन गेली तिच्या थेंबओल्या खुणा वाटेवर किती सहज दिसत होत्या. त्या थेंबटपोर पाऊलखुणा वाचुन कुणीही सांगितलं असतं की, ही वाट स्वर्गाला जाते. धुकं थोडसं गडद होत होतं. काळ्याकुट्ट ढगांखाली जगदीश्वर आभाळभान हरवुन बसला होता. जगदीश्वराचा गाभारा उजळला होता. शिवलिंगावरती फुलांची आरास किती शोभिवंत दिसत होती. मी बाहेर आलो तेव्हा कठोर अंधकारात क्षणभर एखादा काजवा चमकुन जावा तसाच महामृत्युंजय मला गाभार्‍यातुन ऐकु आला. ती बाहेर आली तिच्या चेहर्‍यावर एक अनोख तेज सामावलं होतं. पुर्वदरवाजातुन बाहेर येतानाच दिसते ती शिवप्रभुंची समाधी... पण आल्या-आल्या ती त्या पायरीला स्पर्श करण्याकरता ओणवली. सबब पायरीवरती जगप्रसिध्द ‘ सेवेंचे ठायीं तत्पर हिरोजी इंदलकर ‘ हा लेख होता. मला तिच्या या श्रध्देचं मोठं अप्रुप वाटलं. श्रध्दा जाणुनबुजन जेव्हा आंधळेपण पत्करते तेव्हा ती गांधारी सारखी पुण्यवान होत असावी...

शेजारीच एक आठदहा ओळीचा शिलालेख होता. त्यावरती दोन्ही हात फिरवुन मी वाचु लागलो. 


।। श्री गणेशाय नमः ।।

प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानन्दोऽनुज्ञया श्रीमच्छञपतेःशिवस्य नृपतेःसिंहासने तिष्ठतः ।

शाके षण्णव बाणभुमिगणनादानन्द संवत्सरे ज्योती राजमुहुर्त किर्तीशुक्लेष सार्पे तिथौ ।।


अर्थ तयारच होता. सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके पंधराशे शहाण्णव; आनंदनाम संवत्सर चालु असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. अगदी योग्य अर्थ काढला होता तिने. याच शिल्पलेखांत रायगडाच्या हिरोजी नावाच्या शिल्पकाराने सरोवरे, गजशाळा, रस्ते, स्तंभ, राजगृहे निर्माण केली आहेत ती यावत्-चंद्रदिवाकरौ सुखाने नांदो असे आशिर्वचही आहे. पुर्वदरवाजाच्या समोरच अष्टकोनी चौथार्‍यावरती चिरनिद्रिस्त असलेल्या त्या शककर्त्या राजापढे आम्ही दोघेही नतमस्तक झालो. काही मिनिटं तिथेच बसलो. वाटलं सभासद किती सुंदर बोलतो.  ‘’ राजा साक्षात केवळ अवतारीच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदा पासुम रामेश्वरपर्यंत व्दाही फिरली. देश कावीज केला. अदलशाही, कुतुबशाई, निजामशाई, मोंगलाई ह्या चारी पातशाह्या व समुद्रातील बेवीस पातशाहा असे जेर जप्त करुन, नवेच राज्य साधुन मराठा पातशाहा सिंहासनाधीश छत्रपती जाहाला. प्रतीइच्छा मरण पावून कैलासास गेला. ये जातिचा कोणी मागे जाहाला नाही. पुढें होणार नाहीं. ‘’ जाग्यावरुन उठलो. वाघ्याकडे पहाताना नकळत मला गडकरी मास्तरांचे शब्द आठवले.. ‘’हे समर्था घरचे श्वान खरोखरीच सर्वांनी मान देण्यासारखे होते.  हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे, अखेर, प्रभुचे शुभावसान झाल्याबरोबर या मुक्या इमानी जीवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली. ‘’ खरंच, चतुष्पाद असला म्हणुन काय झाले. गजेंद्रही पशुच होता. वेद बोलणारा रेडाही चतुष्पादचं होता ना ? या फाटक्या नरदेहाचा फुका अभिमान सोडुन या डोंगरपठारीवरच्या रानफुलांची पखरण त्याच्या समाधीशी करुन ठेवावी असं मला मनोमन वाटलं. मी विचारांच्या काहुरात गुरफटत चाललो होतो..पण तिच्या प्रश्नाने मला तंद्रीतुन बाहेर काढलं. 

'' अरे हा तर परवाच्या राजसंन्यास मधील डायलॉग ना ?’’ 

''  हो. परवा पाहीलेलं नाटक. राजा म्हणजे प्रजेचा उपभोगशुन्य स्वामी ! राज्योपभोग हाच राजसंन्यास..!! ‘’

समेवरती येताच जशी नकळत टाळी पडवी तशीच ही ओळ आम्हा दोघांच्याही ओठावर आली.  


आज कित्येक दिवसांनी आम्ही दोघेच फिरायला आलो होतो. जगदीश्वराच्या राऊळाकडुन परतीच्या प्रवास सुरु झाला. टकमक टोकाकडे कुणीच नव्हतं दोघांचेही पाय अनायासे तिकडे वळले. एकाबाजुला निमुळतं होत जाणारं हे ठिकाणं खुप सुंदर आहे. पुर्वेस लिंगाणा, ईशान्येस काळ नदीचं खोरं, पश्चिमेला गांधारी नदी, अग्नेयेला दुरवर धुरकट तोरणा,नितळ वातावरणात राजगड, उत्तरेला कोकणदिवा, कावल्या-बावल्याचे डोंगर, दक्षिणेला प्रतापगड, मकरंदगड, वासोटा दिसला की मन कसं प्रसन्न होऊन उठतं. म्हणुनच की काय रिचर्ड टेंम्पलने रायगडाच्या अनेक देखाव्यांची चित्रे रंगवली. कुठुनसा चुकलेला एक ढग आला. त्याच्या ओंजळीतुन आलेल्या सरींसोबत ती जरा जवळ आली. सुटलेल्या वार्‍याने तिच्या डोळ्यांत काहीतरी गेलं. खळकन दोन मोती गालावर ओघळले. डोळ्यातील काळ्याभोर काजळांच्या कडयावरुन उडी घेताना आसवांनी तिचे गालही उजळवुन टाकले होते. मी त्या चिमुकल्या झर्‍यावरुन फुंकर घालुन तिचे डोळे उजळ केले. अन् सहज म्हणुन गेलो..                                                                                                                                 "बघितलस? वार्‍यांवरुन येणारी धुळचं कधीकधी डोळ्यांत पाणी आणते. जात्याचाच निखालसपणा असला की डोळयांत पाणी तरी याव कोठुन ? "    

"तुच भांडतोस कितीतरी तावातावाने; मुद्देसुद ! इंजिनीअरींग उगीच केलं. अगदी फिलोसॉफर शोभला असता. ‘’

मी अचानक शांत. पाणी मारून विझवलेल्या विस्तवासारखा...! चुकल्याचुकल्यासारखं झालं. माझं सॉरी ऐकुन घेण्याच्याही मनस्थिती ती नव्हती. तिने मला घट्ट मिठी मारली. कितीवेळ तरी वेळ फक्त मुसमुस चालु होती तिची. 

भिजुन गेलेल्या तिच्या डोळ्यांकडे पाहताना मला काहीच समजत नाही. काही उमगत नाही. बोलणार तरी काय ?        अगदी चिंब ओल्या केशरासारखी सारा नुर पालटते. हो अन् त्यातही                                                                      ‘ असुवन जल सींच सींच प्रेमवेली बोई’ हे मिरेचं पद गायल्याच्या अविर्भावात; आत्मबेभान होऊन पहात असतेस माझ्याकडे.....                                           

''अशा प्रसंगी..असं काहीतरी...नेहमीच कस जमत गं...तुला?

ओठांवरचं मिश्किल हास्य दाबुन, कार्तिकातल्या नितळ आकाशी डोळ्यांनी ती फक्त बघत असते.

'' थांब...थांब...मला माहितीये उत्तर...तू आता एक दीर्घ श्वास घेऊन म्हणशील...दिपा, कविता ऐकव नाऽऽ” 

इतकावेळ अदृश्य झालेलं तिचं लाडीक हसु पुन्हा तिच्या ओठांत अवतरलं. 

'' सगळं कसं समजतं रे तुला.. माझ्या मनातलं....मग ऐकव ना कविता..’’

जिने आयुष्य हे सुंदर कविता म्हणुन जगायला शिकवलं. जिच्या प्रेमस्वरुप प्रेरणेतुन कविता घडत होत्या तिलाच मी ही कविता ऐकवु लागलो.


मिरा निर्गुण, निर्गुण,

कृष्ण साजन साजन

राधा उताविळ मन

कृष्ण विश्वाच गोंदन ।।1।।


मिरा अधिर-बधिर

कृष्ण सावळा सुधीर

राधा बासरी बासरी

कृष्ण श्रावणाच्या सरी ।।2।।


मिरा सुगंध, सुगंध

कृष्ण झरा मंद मंद

राधा भुपाळी भुपाळी

कृष्ण भक्त प्रतिपाळी ।।3।।


मिरा विदेही, विदेही

कृष्ण नांदे सर्व देही,

राधा अनोखा प्रवास

कृष्ण मातिचा सुवास ।।4।।


मिरा गोविंद, गोविंद

कृष्ण रामिचा मिलिंद

राधा मुकुंद मुकुंद,

कृष्ण धारा एक कुंद ।।5।।


मिरा गंधार, गंधार

कृष्ण सुरस मंदार

मिरा विनिता विनिता

कृष्ण दीपकू दिनीचा ।।6।।


तिच्या दिठीमध्ये पाणी तराळलं. तिने पुन्हा मला मिठी मारली. कदाचित तिच्या मनातल्या सार्‍या सुरवंटांची एकदम फुलपाखरं झाली. मला जग मिठीत सामावल्याचा भास झाला. 

 निघताना कितीतरी वेळ तो सुंदर देखावा मी मनात भरुन घेत होतो. एक सर येऊन गेली होती.  भावओल्या डोळ्यानी आम्ही इंद्रधनुष्याची टपोर वेलांटी पहात होतो.भिजलेली पाखरं मुक्तपणे वार्‍यावर उडत होती. काळ्या कपारीतुन दुधाचा कल्लोळ उठला होता. निळ्या निळ्या घुंगरांनी खळाळणारी शेती, भान विसरुन ओथंब भिजलेले आभाळ, गवतात कुठेतरी उतु गेलेली सोन्याची हळद पाहताना दोन पाखरं एकमेकांच्या प्रेमात रंगुन गेली होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा