निसर्गाचं चिरंतन सौंदर्य
पहायचं म्हटलं की कधीतरी रोजच्या रहाट-गाड्यातुन वाट जरा तिरकी करावी. उनाडपणे
वाहणार्या नदीच्या काठावर जावं, त्या पाण्याची खळखळ ऐकावी.
पक्षांची किलबिल, वार्यांची संथ गाणी
त्यांच्यासोबतचं गुणगुणावी. वार्यांच्या झोताने माना जराश्या तुकवुन अंगाअंगाने
नाचणार्या हिरव्या हिरव्या झाडांसोबत ताल धरावा. रानफुलांवरती बागडणार्या
पिवळ्या, केशरी, गुलाबी, निळसर, फुलपाखरांमागे अगदी पाखरु होऊन मुक्तपणे संचार करावा. उंचचं उंच असणार्या
काळ्या कातळाच्या पहाडावर उभं रहावं दोन्ही हात पसरुन घोंघावत येणार्या वार्यासमोर
छातीचा प्रकोट करुन उभं रहावं. मावळत्या सुर्यांची भगवी किरणे ओंजळीमध्ये घेताना
मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज जोडुनी दोहीं करा या गाण्याच्या ओळी आठवाव्या. हे
ज्याला जमतं तोच खरा मुसाफीर ! हे सुख निश्चितचं अर्थातीत नाही. हो पण एक गोष्ट
नक्की हे साधन सोपे अन् गोमटे जरी असले तरी प्रत्येकाला साध्य होईलचं याचीही
शाश्वती देता येत नाही. अशाश्वत जगतातली निरंतर जागृत सुखाची ही वर्मस्थानं
प्रत्येकाला गवसली की किती छानं होईल ना ?
परवाही अगदी असचं झालं, कित्येक दिवसं मनाच्या उतरंडी
चढत होत्या उतरत होत्या. सात दिवसांच्या दिर्घ चर्चेनंतर शेवटी एकदा ठिकाण निश्चित
झालं. गुप्तभुमेश्वर !! सिका झाला. मोर्तबाची मोहरही मनावर उठली. रात्रीचं सॅक तयार
झाली. कसही करुन पाचला निघायचच हा कयास. निघालो, चंदननगर बायपास पासुन मी, वसु, महेश अन् पवन बाहेर पडलो. पहाटे उठायची सवय नसल्याने
डोळ्यांवरची साखरझोप स्नानानंतरही उतरली नव्हती. रस्ताने दाट धुकं पसरलं होतं.
गाडीच्या काचाही धुक्याने डबडबल्या होत्या. भोसरीत माई-वडेवाले जवळ गाडी थांबवली
मस्तपैकी कडक चहा मारला अन् पुन्हा गाडीत बसलो. चहा मारल्याने डोळ्यावरची झोप कुठल्याकुठं गायब झाली. महाबळेश्वरनंतरची ही आमची
पहीलीच ट्रिप होती. प्रवासाचा मार्ग आधीच निश्चित झाला होता.
चंदननगर-चाकण-राजगुरुनगर-घोडेगाव-डिंभे धरण-भिमाशंकर अन् गुप्तभुमेश्वर....
गप्पा गोष्टी अन् विनोदामध्ये
रस्ता जात होता. चाकण, राजगुरुनगर गेलं घोडेगाव जवळुन जाताना डोंगराच्या कुशीत एक मस्त तळं दिसलं.
मह्याने गाडी थांबवली. पवन अन् वसुने तळ्याकडे धाव घेतली. सुर्य जरी वर आला असला
तरी हवेमधला गारवा कमी झाला नव्हता. या तळ्याकाठीच स्थानिक ग्रामस्थ कशल्याश्या
झाडावरुन फळं काढत होती. नाव विचारल्यावर भिभोटा नावाची भगव्या रंगाची फळं आम्हाला
दिली. त्या तळ्याकाठच्या पडीक शेतातचं आम्हाला अगदी शो-पिस शोभावा असा पांढरा
चमकणारा दगड मिळाला. खेड्यापाड्यांच्या रस्त्यावरुन जाताना गर्द राईने भरलेले
डोंगर पाहताना मन मोहरुन गेलं होतं. रस्तातचं उजव्या हाताला आंबेगाव तालुक्यातील
डिंभे धरण दिसतं. घोड नदीवरती बांधलेलं हे धरणं विलोभनीय आहे. धरणाशेजारीच गाडी
उभा करुन आम्ही पाण्याकडे धाव घेतली. आत्तापर्यंत बॅगेमध्येच राहीलेली दुर्बिण
नकळत बाहेर आली. नाभियअंतराच्या कितीतरी पट लांब असणारी काळी कातळं अन्
पैलतीरावरती सजलेली हिरवी गर्दराई नयनपटावरती आली. दोन दिवस कंपनीमध्ये झालेल्या
अतिकामामुळे मनाला आलेली मळभ जरा कमी झाली. निळंशार पाणी पाहताना मनाला अगदी उधान
आलं. आमच्या हौशी चित्रकारांचं छायाचित्रण झालं अन् आम्ही तिकडुन काढता पाय घेतला.
वाटेवरती खेड्यातील गवती झोपड्या, चरायला जाणारी गुरं, शाळेत जाणारी पोरं...ओढ्यावरती धुणी धुणार्या माता, दुहिता, शेताकडे चाललेल्या बैलगाड्या
दिसत होत्या. साधारणतः साडे अकराच्या दरम्यान भिमाशंकरला पोचलो. बारा
ज्योतिर्लिंगापैकी असणार्या या भिमाशंकराचं हर हर महादेव ही घोषणा करतं बेलभंडार
उधळला. हे मंदीर खुप सुंदर आहे. प्रशस्त गाभारा.. तितकाच प्रशस्त सभामंडप कवेत न
बसणार्या स्तंभांनी तोलुन धरलेला आहे. तीक्ष धातुचा ध्वजसंकेताने झळाळणारं हे
मंदीर शिल्पसौंदर्याने तीळतीळ नटलं आहे. दिपमाळेजवळच मंदीराच्या निर्मीतीबाबतचा
शिलालेख आढळतो. चिमणाजी अंताजी भिडे सावकार यांनी हे मंदीर उभारल्याचा स्पष्ट
उल्लेख आहे. या मंदीराची उभारणी राजा रामदेवरायाच्या काळातच झाली असावी. शिलालेख वाचुन आम्ही
गुप्तेभुमेश्वराची वाट धरली.
भोरगिरी ग्रामपंचायती मध्ये हे
तीर्थक्षेत्र येतं. जंगल दाट आहे म्हणुन अगदी गाईड घेऊन जा अशा सुचना झाल्या. पण
गाईड वगैरे न घेताच आम्ही निघालो. जंगलामध्ये उतरायला सुरुवात झाली. सुरुवातीलाच
रंगीबेरंगी पक्षांनी आपले पंख फडफडवुन आमचं स्वागत केलं. वसुसाठी हा उत्तम क्लिक
होता. घराणेदार गायक जसा स्वर अन् समेशी एकनिष्ठ असतो तसाच जातिवंत फोटोग्राफर
त्याच्या योग्य क्लिकशी ! त्याने कॅमेरा काढुन फोटो काढायला सुरुवात केली होती.
वाळलेल्या पानांमधुन चालताना सळसळ आवाज केल्याशिवाय चालताच येत नव्हतं. अन्
सुरुवातीची दमछाक जरा सुरु झाली. अगदी अविचारीपणाने वाढलेले ते वृक्ष रस्तांमध्ये
मार्ग अडवुन उभे होते. जागोजागी झाडांवर, दगडांवर, गुप्त भुमेश्वराकडे असे बाण काढले होते. त्या दगडांचे, झाडांचे, त्या विविधरंगाचे, आकारांचे अन् त्या भटक्यांचे मी
आभार मानतो. ही कृतज्ञपणाची जाणीवही भारीच असते. कधी येईल सांगता येत नाही. ऊन
वाढत होत तरीही विविध आकारांच्या विशाल सावल्यांमुळे ते जाणवतचं नव्हतं. दम
लागायला लागला होता. पाठीवरच्या सॅक मधील पाण्याच्या बाटल्या क्रमाक्रमाने
रिकाम्या होत चालल्या होत्या. वळणावळणावर पुर्वीच्या गडांच्या मोहीमेचे अनुभव आठवत
होते. आठवणी साठत राहतात मग त्या असल्या क्षणी लक्षात आल्या की कितीतरी छान वाटतं.
अशाच कितीतरी जुन्या आठवणींना उजाळात देत अगदी जंगलाच्या मध्यभागी पोचलो. या इकडे
आम्हाला माकडे पळताना दिसली. मोरांचे केकारव तर कोकीळांचे कुहुंकार ऐकु आले.
गितेमध्ये सः शब्द स्तुमलो भवान म्हटलं आहे त्याचीच अनुभुती होत होती. हे अरण्य
खुप सुंदर आहे. वड, पिंपळ, भोकर, आहिण, कुमुद, काळरे, चाफा, नागवेल, पळसं, निलगिरी, केवडा, कन्हेरी, कर्दळ, वेळु, चिंच, आंबा, जांभुळ, लिंब, कदंब, औदुंबर, साल, तमाल, सोनचाफा, अन् सळसळणारं गवत म्हणजे
दंडकारण्य !
या जंगलामध्ये अनेक रानफुलं
आम्ही पाहिली. प्रत्येकाचे वेगवेगळे आकार, रंग, गंध ! फुलांची तशीही एक गम्मतच असते. अंगभर फुलांनी सजलेली
गांधारी, फुलं अनावर झालेला
निळा गोकर्ण, भीषण प्रशुब्ध
अग्निशिखा, भान हरवुन वार्यावरती
डुलणारा विष्णुक्रांत, एकटीच गुणगुणणारी अंबरी, पलाश वृक्षावरती झालेला फुलांचा बोभाटा, झुम चढलेली चाणी, लाजुन चुर झालेली क्षमीका, शुभ्रपांढरी, गर्दनिळी, गुलाबी, लाल, केशरी, पिवळधम्मकं कितीतरी रंगानी
नटलेली फुलं. रानफुलांशी चांगलाच परिचित असणारा महेश झाडांविषयी फुलांविषयी माहीती
पुरवत होता. आवडलेली फुलं मी गुच्छ करण्यासाठी एकत्र करतं होतो. हातात काठी अन्
जुन्या दुर्ग मोहीमांचे किस्से जागवत अंदाजे दिडच्या सुमारास साक्षी विनायकाच्या
मंदिरासमोर पोचलो. दर्शन घेतलं. काही भोळ्या भाविकांनी मंदीराजवळचं लगोर रचावी तशा
दगडांच्या उतरंडी रचल्या होत्या. श्रध्देचं हे भाबडं रुप पाहीलं की हसु येतं.
म्हणतात माणसाची बुध्दी जिथं खूंटते तिथं तो कसल्याही गोष्टी करायला तयार होतो.
असो, साक्षी विनायकाच्या डाव्या
बाजुने खोल जंगलात उतरलं की पाण्याचा खळखळ आवाज येऊ लागला. मोरांचे केकारव, कोकीळांचे आर्त स्वर, चिमण्यांची चिव-चिव अन्
रातकिड्यांचा किर्रर्रर्र आवाज...पण तो खळखळाट म्हणजे बरसलेला गंधारचं म्हणावा
लागेल. हातातील काठ्यांच्या साहय्याने पात्रात उतरलो. पात्रात युगानुयुगे
तपश्चर्या करणार्या मुनीवरांसारखे विशाल दगड बसले होते. नकळतपणे मी हात जोडताना
मह्या उगीच हसला. झुळझुळ करणार्या पाण्याचा आवाज म्हणजे आम्ही पोचल्याचे संकेतच
!! दगडांवरुन उड्या मारतच पैलतिरावरती गेलो. अतिशय निरामय जलधारा पुरुषभर उंचीवरुन
खाली उतरली होती. ती जलधारा म्हणजे शुभ्र वस्त्र धारण केलेली जान्हवीच !! ही
जलधारा अगदी अर्धा चौरस फुटाच्या शिवलिंगावरती पडत होती. पावसाळ्यात प्रचंड
वाहणार्या धारांमुळे हे शिवलिंग गुप्तावस्थेतच असतं. कदाचित म्हणुनच याला
गुप्तभुमेश्वर किंवा गुप्त भिमाशंकर म्हणत असतील. त्या धबधब्यामध्ये आम्ही ओलेचिंब
झालो. जिवंत झर्याच पाणी शरपंजरी भिष्माचार्य का मागत असावेत याच रहस्य मला
उमगलं. त्या गुप्तेश्वराला सौमसुत्री घालुन प्रणिपात केला. हातात आणलेली काही फुलं
आपसुकचं त्या शिवलिंगावरती पडली. आम्ही परतीला निघालो. परतताना मात्र कडा चढुन
जायचं ठरलं. घाम घाम निघतं होता. कपारीमधे हातांची बोटं क्षिथिल होत होती. श्वास
गोठताना कडा चढुन जाण्याचा आनंदच काही वेगळा आहे. त्या प्रचंड उंचीवरुन जंगलाकडे
सहज नजर टाकली. वाटलं, डोळ्यावर लावलेला धुंदीचा काळा चष्मा काढला तरचं हे अस्सल
सौंदर्य पहायला मिळतं. नाही का? मोहीम अगदी फत्ते. गाडीत बसलो. जंगलातल्या आठवणी जागवत
आम्ही नाचलो. संध्याकाळी ढळणार्या सुर्याला नमस्कार करुन परत निघालो. डोळ्यांवर
आता मात्र झोप दाटली. ‘ सारी उम्र हम मर मर के जी लिये, एक पल तो अब हमे जिने दो जिने
दो.. ही डेकची धुन अन् मह्याची गाण्यावरची शिळ ....अस्पष्ट होत गेली...
सकाळी उठलो. आंघोळ करुन आलो.
कॉर्नर टेबलवर फुलदाणीत ताईने घरची ताजी अन् मी आणलेली काही फुलं ठेवली होती. त्या
पुष्पसमुहाकडे बघुन मन प्रसन्न झालं. काल रात्री यायला झालेला उशीर त्यातुन अर्धवट
झालेली झोप सार काही विस्मृतीत गेल्यासारखं झालं. चहा घेताना मी कितीतरी वेळ त्या फुलांकडे बघत होतो. वाटलं
फुलही भावनाप्रधान असतील. किंबहुना फुलांच्या रुपकांत मानवी स्वभावाला सहज गुंफता
येईल. विष्णुक्रांताची जांभळी फुलं, पळसाच्या लालभडक फुलानंतर, नागकेशराचा भगवा, अबोलीचा फिक्कट भगवा, मग केवड्याचा गर्द पिवळा, त्यानंतर पाडलीचा फिक्कट पिवळा, अन् शेवटी मालती, माधवी, जाईचा शुभ्रवर्ण भावनांना सहज
चित्रित करु शकतील. गंधातुनही, दरवळ, सुवास, घमघमाट अन् तिव्र सुगंध हा क्रम लावता येईल. टेबलवरचं पेन
हातात आलं. अन् कागदावरती ही कविता तयार झाली….
माझिया मनाचा
मोगरा फुलला
आनंद खुलला
अगणित ।।1।।
माझिया मनाची
बहरली जाई
वेडावली जुई
लाजुनिया ।।2।।
माझिया मनाशी
विचारी धोतरा
शब्दाने तोतरा
पवित्र तो ।।3।।
माझिया मनाने
पाहिला गोकर्ण
असे श्यामवर्ण
विष्णुक्रांत ।।4।।
माझिया मनाशी
बोलते अबोली
अग्निशिखा ओली
दवांतली ।।5।।
माझिया मनाचा
कोवळा प्राजक्त
भासे मज सुक्त
नारदाचे ।।6।।
माझिया मनात
डोलते अंबरी
एकाकी शबरी
काननाची ।।7।।
माझिया मनात
आलासे वसंत
न मिळे उसंत
एक क्षण ।।8।।
माझिया मनाचा
पेटला पलाश
गेले आशापाश
जळोनिया ।।9।।
दिनांक 20.04.2023 ;
वरील प्रवासवर्णण लिहुन झाली
असतील अंदाजे नऊ एक वर्षे; कित्येक वर्षानंतर मी हे वाचतोय. आणि वाचता वाचता विचार
करतोय…
शुचौ देशे
प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः । नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥ ११ ॥
पार्थाला
अष्टांगयोग सांगताना यम, नियम सांगुन झाला आहे. आता आसन सांगायचे आहे. पातंजल
योगसुत्रांत यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधि या अष्टांगांचा विस्तृत विचार आला आहेच.आतां माऊलींना
बोलायाचे आहे. ज्ञानदेवांचा योग हा सिध्द योग होता. सुत्र रुपाने सांगणे हा
माऊलींचा स्वभाव नाही. तैसा वाग्विस्तारु । गितार्थे विश्वभरु ही विस्ताराची
भुमिका माऊलींची आहे. तत्वज्ञान शाखेच्या आत्मसंयम या गंभीर विषयाचा माऊली आपल्या काव्यकुसुमांनी उलगडा
करताहेत. आसनाचेही स्थान इतुके अवर्णनिय असावे की जेथे बैसले असतां वैराग्यास
दुणीव चढेल.. पहा..
जेथ आराणुकेचेनि कोडें । बैसलिया उठों नावडे ।
वैराग्यासी दुणीव चढे । देखलिया जें ॥ १६४ ॥
जो संती वसविला ठावो । संतोषासि सावावो ।
मना होय उत्सावो । धैर्याचा ॥ १६५ ॥
अभ्यासुचि आपणयातें करी । हृदयातें अनुभव वरि ।
ऐसी रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ॥ १६६ ॥
जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथा ।
पाखांडियाही आस्था । समूळ होय ॥ १६७ ॥
स्वभावें वाटे येतां । जरी वरपडा जाहला अवचितां ।
तरी सकामुही परि माघौता । निघों विसरे ॥ १६८ ॥
ऐसेनि न राहतयातें राहावी । भ्रमतयातें बैसवी ।
थापटुनि चेववी । विरक्तीतें ॥ १६९ ॥
हें राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेंचि असिजे ।
ऐसे शृंगारियांहि उपजे । देखतखेंवो ॥ १७० ॥
जें येणें मानें बरवंट । आणि तैसेच अतिचोखट ।
जेथ अधिष्ठान प्रगट । डोळां दिसे ॥ १७१ ॥
आणि जनाचेनि पायरवें । रुळेचिना ॥ १७२ ॥
जेथ अमृताचेनि पाडें । मुळेहीसकट गोडें ।
जोडती दाटें झाडें । सदा फळतीं ॥ १७३ ॥
पाउला पाउला उदकें । वर्षाकाळेंही अतिचोखें ।
निर्झरें का विशेखें । सुलभें जेथ ॥ १७४ ॥
हा आतपुही अळुमाळु । जाणिजे तरी शीतळु ।
पवन अति निश्चळु । मंद झुळके ॥ १७५ ॥
बहुत करुनि निःशद्ब । दाट न रिगे श्वापद ।
शुक हन षट्पद । तेउतें नाहीं ॥ १७६ ॥
पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें ।
कवणें एके वेळे बैसे । तरी कोकिळही हो ॥ १७७ ॥
निरंतर नाही । तरी आलीं गेलीं कांहीं ।
होतु कां मयुरेंही । आम्ही ना न म्हणों ॥ १७८ ॥
परि आवश्यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा ।
तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ॥ १७९ ॥
दोहींमाजी आवडे तें । जें मानलें होय चित्तें ।
बहुतकरुनि एकांते । बैसिजे गा ॥ १८० ॥
म्हणोनि तैसें ते जाणावें । मन राहातें पाहावें ।
राहेल तेथ रचावें । आसन ऐसें ।। १८१ ॥
वरि चोखट मृगसेवडी । माजी धूतवस्त्राची घडी ।
तळवटीं अमोडी । कुशांकुर ॥ १८२ ॥
माझे एक मित्र आहेत. डॉ.
राजेंद्र मधुकर मणेरीकर- मुळचे मुंबईचे, पुण्यात असता
नारायण पेठेत रहायचे. माणुस अफाट आहे. माझा जीवनाकडे पहायचा दृष्टिकोन या माणसाने
बदलला आहे. मी त्यांना गुरुजीच म्हणायचो. त्यांनी मराठी
भाषेत गितार्थविलास हे लघुप्रस्थानस्थळीच्या श्रीमद्भगवतगिता या
ग्रंथावर केलेले भाष्य आहे. शांकरांच्या अद्वैत सिध्दांतावर बोलता बोलता ते सहज
बोलुन गेले, कि मला आता आचार्य कळाले, ज्ञानदेवांची गरज वाटत नाही. त्यानंतर मी मात्र
ज्ञानदेवांच्या वाटेने चालत आहे. शंकराचार्य समजल्यानंतरही ज्ञानदेवांची गरज का
आहे ?. या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले पण त्यांना ते पोचवावे ऐसे
कधी वाटले नाही. असो, संगिताचेही एक प्रयोजन आहे.
वेदान्तोऽर्थः सर्वेषाम् काव्याद् रसविभावना छंदात् तु
ताललालित्यम् स्वराद् हृदयरंजनम् एतत्सर्वं हि संगीते भक्तिसौख्यप्रदं भवेत्
राग - ताल - रसो - मोक्ष इति तेषां प्रयोजनम्
असो, तेणें अमृताचे ताटीं । जाण नरोटी ठेवीली ।। असं एकनाथ का
म्हणाले याचे प्रयोजन मुख्य आहे. पण आकाशाचा अंत न कळुनही चिमणे पक्षी प्रयत्न
करतातच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा