सकाळचे
पाऊणे सहा झाले असतील. गाभार्यातील श्रींच्या स्वयंभु मुर्तीसमोर हात जोडुन मी
उभा होतो. दोन्ही समयांच्या उजेडात गाभारा प्रकाशला होता. गजाननाच्या कपाळी असणारा
चंदनाचा गंध लक्ष वेधुन घेत होता. चिंतामणीची ती मोहक मुर्ती पाहताना अंतरात
कुठेतरी रुजलेल्या दर्शनाच्या हिरव्यागार वेलीवरची सारी फुलं एकाचवेळी उमलली.
ओठांवरती अथर्वशिर्षाच्या ओळी जमु लागल्या. उमलतीकडे झुकलेल्या दोन लालचुटुक
जास्वंद कळ्या मी मनोभावाने गजाननाला वाहिल्या. गाभार्यातुन बाहेर पडलो.
पुर्वेकडे नुकतेच तांबडे फुटायला सुरुवात झाली होती. सुर्यनारायण आपल्या
सहस्त्रावधी हातांनी रंगाची उधळण करीत गगणपटावर येत होता. कोवळी किरणे मंदिरावरील
देवध्वजेभोवती नुकतीच जमायला सुरुवात झाली होती. पक्षांना नव्याने कंठ फुटत होते.
मधुन मधुन मंदिरातील घंटेचा ताजा नाद कानावर पडत होता. मला हे पुन्हा पुन्हा
अनुभवायला खुप आवडतं.
थेऊर !!
मुळा मुठा नदीच्या काठावर वसलेलं एक टुमुदार गाव. माझ्या लहाणपणीचा काही काळ इकडेच
गेलेला. माझ्या शैशवावस्थेतील कितीतरी गोड मधाळ आठवणी अजुनही या वार्यात भरुन
राहिल्या आहेत. मी तेव्हा दहा बारा वर्षाचा असेन. ब्राह्ममुहुर्तावर उठुन पेशवेवाड्यातील
लालमातीत सुर्यनमस्कार घालावे, मातीच्या
मेहेंदीने रंगलेले छोटे हात जोडुन
ओम्
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् ।
तत्त्वं
पूषन्नपावृणु सत्य धर्माय दृष्टये ।।
या
प्रार्थनेने सुर्य नारायणाचे आवाहन करावे. उगवत्या सुर्यासोबत आन्हिकं उरकली की
ओल्या सोवळ्याने आम्ही एकमेकांचे हात हातात घेऊन श्रींच्या दर्शनासाठी जात असु.
उत्तरव्दारातुन चिरेबंदी पिंपळ दिसला की पळापळ व्हायची. घोषवतीला आधी स्पर्श कोण
करणार यासाठीच ती लगीनघाई असायची. पेशवाईतील विधुर चिमाजी आप्पा यांच्या वसई
विजयाची साक्ष देणारी ही प्रचंड घंटा होती. अश्वत्थ वृक्षाच्या पुर्वेला एक दहा
बारा हात अंतरावरती ही घंटा एका तिवईवरती टांगली होती. पांडवदादा तिला घोषवती असं
म्हणायचे. त्यावेळी घोषवती हे नाव कुणाचं होतं हे समजण्याइतकी समज आमच्यात आली
नव्हती. तरीही तिचा कंठ मोठा गोड वाटायचा. अंगारिणीच्या ओवरीकडे जास्वंदींची,
प्राजक्ताची दोनचार दाट झाडे होती. पाच साडे पाचला जर
आलो तर तिकडे फुलांचा सडा पडलेला असायचा. फुले वेचुन झाली की कारंजे मंडपात
अथर्वशीर्षाचा पाठ सुरु व्हायचा. पाठानंतर पंखा मंडपात जाताना व्दारावरील श्री
मोरया गोसावींच्या प्रतिमेला स्पर्श करण्यासाठी अगदी टाचा उंच करुन कसरत करायचो.
त्यावेळी तिथे हात पोचतचं नसायचा, आता हात पोचले
तरी त्या महात्म्याच्या चरणांना स्पर्श करताना मन कचरतं.
वायव्येला
अडकवलेल्या कमंडलुमधील अभिषेकाचे तीर्थ प्राशन करावे, शेंदुराने मढवलेल्या, पुर्वाभिमुख,
वामशुंडा गजाननाच्या दिड-दोन हात उंच बैठ्या मुर्तीसमोर
तेच कोवळेशार हात जोडावे, कांचोळ्यातील
अष्टगंध एकमेकांच्या कपाळी लावावा, प्रसाद घेताना
मंगलमुर्ती मोरया असा प्रसन्न कंठाने गजर करुन गीतेच्या संथेसाठी निघुन जावे हाच
आमचा नित्यक्रम झालेला होता. जीवनातील जे काही क्षण मी मर्मबंधात ठेऊ इच्छीतो,
ते सारे क्षण जणु हा वारा माझ्या श्वासाश्वासांत भरत
होता.
मंदीराच्या
उत्तरव्दारातुन मी बाहेर पडलो. शिवपंचायतन चौकातुन नदीकाठी जाणारा रस्ता अद्यापही
धुक्याचं पांघरुन घेऊन कुडकुडत होता. चांदीच्या तबकामध्ये दुर्वा, जास्वंदीची फुले घेऊन सोवळे नेसलेले पुजारी मंदिराच्या दिशेने
घाईत निघाले होते. मंदिरामधील भावओल्या भुपाळीचे उर्जस्वर मनाला भावुन टाकत होते.
पायांनी नदीची वाट धरली. पावलोपावली धुके घट्ट होत होते. घाटाच्या पायर्या उतरलो
अन् समोर मुळा मुळेच्या पाण्याचा खळखळाट ऐकु येऊ लागला. प्रवाहातुन जणु धुक्याच्या
दुल्लडी बाहेर पडत होत्या. नदीचा पैलतट मात्र धुक्यामुळे धुसर दिसत होता. चालता
चालता थांबलो, सहज डाव्याबाजुला लक्ष गेलं. हिरव्यागार पानांच्या मांदियाळीत चाफ्याचं
एखादं शुभ्र फुल उठुन दिसावं तसच धुक्यांच्या सोनसळी पडद्यामध्ये रमाबाईंचं वृंदावन
दिसत होतं. वृंदावनावरती महिरपी आकारातील चाफेखणी बांधणीची मेघडंबरी शोभुन दिसत
होती. नदीप्राकारातच एक नौका वार्याच्या झोक्यावरती हिंदोळे घेत होती. त्या
होडीच्या सज्ज्यावरती मी जाऊन बसलो. महासती रमाबाई माधवराव बल्लाळ हे नाव अगदी
इकडुन देखील स्पष्टपणे डोळ्यांत भरत होते. माझ्या लहाणपणी या वृंदावनावर मेघडंबरी
नव्हती. त्यावेळी दादा माधवराव पेशवे अन् रमाबाई यांची गोष्ट सांगायचे. त्या अबोध
वयात राजा राणी म्हटलं की रमा आणि माधव हीच नावं आम्ही ठेवत असु. सहजचं ओठावरती
धनुर्वेदातील श्रमक्रिया प्रकरणातील
व्दामिमौ
पुरुषो लोके सुर्यमंडल भेदिनौ ।
परिव्राङ
योगयुक्तश्च रणेचाभिमुखो हतः ।।
हा श्लोक
आला. आप्पाजी त्र्यंबकपंत आपल्या पत्रात रमाबाईंच्या सती जाण्याच्या प्रसंगाबद्दल
हेच वर्णण करतो. ती योगीनी सुर्यमंडल भेदुन श्रीमंतांसोबत सती गेली. रियासतकारांनी
तळटिपेमध्ये हाच संदर्भ दिल्याचं मला चांगलं लक्षात होतं. या श्लोकाचा परिणाम
म्हणा वा दुसरं काही, सताड उघड्या पडलेल्या गवाक्षातुन
वार्याची मंद झुळुक यावी अन् इतिहासाची पानं उघडी पडावी असचं माझं झालं.
पटवर्धनांचे मोडी दफ्तर असो वा पेशवाईतील महत्वाची पत्रे, त्यातील शब्दांचे वेटोळे आकार पुन्हा माझ्याशी बोलु लागले. त्या कागदांनीच
मला त्यांची भाषा शिकवली होती. रमा-माधवाबद्दल मी जेवढं काही वाचलं होतं ते अक्षी
डोळ्यांच्या पटलावरती येऊ लागलं. पाण्यावरती होडी झोके घेत होती. सोहनींची बखर,
ऐतिहासिक पत्रसंग्रहातुन मी मात्र भुतकाळाच्या डोहात
बुडत चाललो होतो. समोर सारी दृश्य उभी ठाकली होती.....डोळ्यासमोर भुतकाळ उभा
राहिला होता.
घाटाच्या पायर्यांवरुन श्रीमंतांची पालखी
तिच्या अंतीम मुक्कामाकडे येत होती. पालखीमागे रमाबाई संथपणे चालल्या होत्या. त्या
करुणमुर्तीकडे पाहताना मनात दुःखाचा डोंब उसळत होता. तिने शुभ्र रेशीम वस्त्र
परिधान केले होते. उंचपुर्या कपाळावर मळवट भरला होता. चंद्रकोर कुंकवाखाली
तुळशीची मोहकशी आकृती गोंदली होती. डोळ्यांच्या कडा काजळाने मंद काजळलेल्या
होत्या. गळ्यात हिर्यांचा लफ्फा चमकत होता. कानातील लकाकणार्या कुड्यांवर
मोत्यांच्या बाळ्यांनी साज चढवला होता. नाकात हिर्यांची नथ होती. दंडामध्ये नागनक्षी बाजुबंद अन् येळा दिसत
होत्या. हातांतील कांकणांना पाचु माणकांचे खडे जडवले होते. पाठीवरती काळाभोर
केशसंभार रुळत होता. नभोमंडपी नुकत्याच जन्मलेला आकाशगंगेचे तेज तिच्या चेहर्यावर
सांडत होते. रमाबाईंची सतीची वस्त्रे, मस्तकीचा
अथांग मळवट, अन् शांत मुद्रा पाहुन सार्यांची
मने चरकली. दुर्दैवाने खेळ साधला होता. व्रत वैकल्याने कृश झालेल्या रमाबाई वरुन
ग्रीष्मकालीन नदिसारख्या अशक्त तरीही शांतच वाटत होत्या. वाटेवरती सोन्यारुप्याची
फुलं उधळली जात होती. गुलाबपुष्पांच्या पायघड्या पडत होत्या. रमाबाईंच्या
चरणांच्या स्पर्शनेच पाकळ्या गंधीत होत होत्या. आज त्या अनंताच्या प्रवासाला
निघाल्या होत्या. लौकीक जगताची वाट आता इथेच तुटणार होती. मुळामुठेच्या घाटावरती
आज रमामाधवाचा संगम होणार होता. जातीचा, धर्माचा,
वयाचा, मानाचा, कसलाही मुलाहिजा न ठेवता प्रत्येकजण रमाबाईंच्या चरणाला
स्पर्श करुन पुनित होत होता. सान थोर हा भेद उरलाच नव्हता. मेहेंदीने रंगलेल्या
नाजुक हातांनी रमाबाईं मोहरा वाटत होत्या, आयाबायांना
अंगावरील दागिने उतरवुन देत होत्या.
संधीकाळ हळुहळु जवळ येत होता. अशक्त झालेलं
ऊन नदिपात्रात सावळं झालं. तिरझाडीवरुन उजेड आणि अंधकार यांच्या मधील अवस्था सुन्न
होऊन सारं पहात होती. अखेरचा निरोप द्यायला सारी मराठ मंडळी तिरावरती जमली होती.
श्री राजाराम नरपति हर्षनिधान, माधवराव बल्लाळ
मुख्यप्रधान ही मुद्रा आता कुठल्याही रुमालावर उमटणार नव्हती. सार्या रियासतीवर
एका मलुल, उदास छटेचा तवंग उठला होता. माणसांचा वावर
असुनही खिन्न करणारी शांतता पसरली होती. ईश्वरसत्ता प्रमाण असते, डोळ्यादेखत हातातील मोत्यांची सर तुटते, रोखायचं बळ मात्र दुबळ्या मनुजांच्या हातात नसतं.
एकादश आहुतींनी प्रदिप्त
गार्हपत्याग्नी जवळ रमाबाई आल्या, त्यावेळी
कानांतील कुड्यांखेरीज फक्त सौभाग्यालंकार गळ्यात उरला होता. दुरवर सुकुन कोळ
झालेल्या लतिकेसारखी मैना उभी होती. रमाबाईंनी तिला जवळ बोलावलं. दोन्ही हातांनी
कानांतील कुड्या काढुन तिच्या ओंजळीत घातल्या. आक्कासाब...म्हणुन मैनेने
रमाबाईंच्या पायांना मिठी मारली. मैनेचा हा आक्रोश मात्र रमाबाईंच्या निर्धारासमोर
अगदीच थोकडा होता. इतक्यावेळ सर्वात मागे तोंड लपवुन उभ्या अललेल्या पार्वतीबाई
तोंडाला पदर लावुन हुंदके देत रमाबाईंकडे आल्या. त्यांनी तीच्या गाल्यावरती हात
फिरवला,तिला मिठीत घेऊन कुरवाळत पार्वतीबाई
कळवळल्या..रमा...ऽऽ जाऊ नको गं..ऽऽ त्या शब्दांबरोबरच नदीचा काठही थरारला. सार्यांच्या
नजरा त्या महासतींवर रोखल्या गेल्या. त्यातील एका सतीचा चुडा आधिच पाणपतावर फुटला
होता, तरीही ती अखंड सौभाग्यवती होती. तिच्या
पातिव्रत्यावर वहीम घ्यायला परमेश्वरही असमर्थ होता. कंठ सद्-गदीत झालेल्या
पार्वतीबाई रमाबाईंना थांबवण्याचा अखेरचा प्रयत्न करु पहात होत्या. त्यांनी
रमाबाईंचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. खोल विहिरीतुन आवाज यावा तसा पार्वतीबाईंचा
आवाज पुन्हा घुमला. ‘ रमा, सती जाणे हा
पेशव्यांचा कुळाचार नव्हे. त्यांचा आवाजात विशिष्ठ सांप्रादायिकता आली होती. मंद
आवाजात रमाबाई उत्तरल्या..‘’सासुबाई, इकडच्यांकडुन दुर
राहुन संसाराचा हा अर्धा राहिलेला सारिपाट मला खेळता येणार नाही हो. ..मला जाऊ
द्या ..तुम्हाला गजाननाची शपथ मला जाऊ द्या..आता जगण्याची कांक्षा उरली
नाही..ईश्वरेच्छा प्रमाण...’’
सार्यांच्याच
मनात चर्रर्र झालं. पार्वतीबाईंना भोवळ आली. चित्रा अन् मैनेनं त्यांना सावरलं.
आता सार्या शक्यता मावळल्या होत्या. चैत्रबाहुलीसारख्या पेशव्यांच्या स्नुषा
रमाबाई माधवरावांच्या पावलांवर पाऊल ठेऊन चालल्या होत्या. त्रिवार वंदन करुन त्या
धर्मशिळेवर उभ्या राहिल्या. धर्मशिळा म्हणजे स्वर्गाची पायरीच ! ‘धर्मेच अर्थेच
कामेच म्हणुन बांधलं गेलेलं नातं आज उजवणार होतं. धर्मशिळेवरती सौभाग्यवायने वाटली
जात होती. रमाबाई स्थिर बुध्दीने दान करित होत्या. अखेर गजाननाची आकृती असलेला
कुंकवाची कोयरी त्यांनी गंगाबाईंच्या हातात सोपवली, मोत्याच्या सरी असलेला कमरेचा छल्ला काढुन मोठया प्रेमाने त्यांच्या हातात
ठेवला, गंगाबाईंच्या डोळ्यात अश्रु तराळले.
रमाबाईंनी तिचा हात घट्ट दाबला. गंगाबाईंना आता भान उरले नव्हते. त्यांनी
रमाबाईंना घट्ट मिठी मारली. पण त्या तर सुख दुःखापार पोचल्या होत्या. रमाबाईंनी
मिठी सोडवली. वायने वाटुन झाली होती, धर्मवेदीवर उभ्या
राहिलेल्या एखाद्या योगीनी सारख्या त्या दिसत होत्या. समोरच पुरुष दिड-पुरुष
उंचीची चंदनाच्या लाकडांची चिता रचण्यात आली होती. रमाबाईंनी जमलेल्या अथांग
जनसमुदायाला एकवार हात जोडुन चितारोहन केले. हाती असलेला क्षण लांबवता येईल तितका
लांबवण्याचा प्रयत्न जो तो करत होता. माधवरावांचे मस्तक त्यांनी आपल्या मांडीवरती
घेतले. विस्तिर्ण नदिकाठावर एकदा नजर टाकली. माश्यांच्या डोहाजवळची तिरझाडी पाण्यात लवुन पहात होती. काळ्या
पत्थरांनी रेखित गेलेला काठ डोळ्यात भरत होता. सळसळत येणारा वारा पाण्यासोबत
मनावरही कल्लोळ निर्माण करत होता. रावसाहेबांना हा घाट अगदी लहाणपणीपासुन आवडायचा.
रमाबाईंनी या घाटावरची तिन्हीसांज यापुर्वी फक्त माधवरावांच्या शब्दांतुनच ऐकली
होती.हा घाट त्यांनी पुर्वी फक्त माधवरावांच्या शब्दांतुन पाहिला होता. पैलतटावरची
झाडी, आंब्यांची राई, नारळी पोफळीच्या बागा मनास भुरळ घालत होत्या. पाखरे परतीला निघाली होती.
भानुबिंब हलकेच क्षितीजाला टेकले,. सजल, सांध्य घाट सुंदर दिसत असला तरी त्यावरती दुःखाची किनार पडली
होती. रमाबाईंनी हे दृश्य डोळ्यांमध्ये साठवुन घेतलं, त्यांचे नेत्र पुन्हा माधवरावांच्या चेहर्याकडे झुकले. एकवार पुन्हा
रमाबाईंनी आपल्याकडे पहावं अस सार्यांनाच वाटलं पण ती नजर माधवरावांच्या
मिटलेल्या पापण्यात केव्हाच कैद झाली होती. एकाग्र दृष्टीने त्या माधवरावांना
न्याहाळत होत्या. मिटलेल्या या दोन पापण्या यदाकदाचित उघडल्या तर आपण पुन्हा एकदा
त्यांच्या प्रेमात पडु असं वाटुन त्यांच्या सुकलेल्या ओठांवरती क्षणभर स्मित
झळकलं. जनसमुदायाचा शोक आता कानांवर पडत नव्हता. मावळतीला सुर्य आपलं काळं तोंड
लपवुन पसार झाला, अग्नीडाग देण्यात आला. अचानक ते
दृश्य धुरकट होऊ लागले. ढोल, ताशे, दमामे वाजवणारे टिपर्या सरसावुन उभे होते. हिरव्या वेळु
काठ्या रखवालदारांच्या हातात आश्चर्यमुग्ध उभ्या होत्या. असा सोहळा कुणी उभ्या
जन्मात पहिला नव्हता. धाकले सरकार, राघोबादादा,
पंत, रामशास्त्री,
नाना ही खाशी माणसं विस्मयाने तो प्रकार पहात होती.
अग्नी धडाडत होता. वातावरणात चंदनाचा गंध दरवळु लागला पण, ब्रह्मवृंदांच्या मुखातुन निघणारे मंत्र अन् चंदणाच्या फुटणार्या
लाकडांखेरीज कर्णपुटींवर कसलाच आवाज पडत नव्हता. सप्तपदीतील एक विथीका पुर्ण झाली
होती. अग्नीसमाधित, कैवल्या सविकल्पावस्थेत ते दोन जीव
ओथंब भिजत होते...निस्तब्ध..
कसल्याश्या आवाजाने मी भानावर आलो.
सकलसौभाग्यसंपन्न महासती रमाबाईंनी आपल्या स्वामींसोबत सहगमन केले होते. थेऊर
मुक्कामी डेरे पडले की माधवराव याच तिरावरती येत असत. या घाटावर आपणांस घेऊन जाऊ
हा शब्द अनावधाने कधी माधवरावांनी रमाबाईंना दिला असेल पण, श्रींच्या मसनदीची सेवा करताना आपल्या उण्यापुर्या अठ्ठाविस वर्षाच्या
आयुष्यात तो पुरा करु शकले नाहीत. तरीही प्राक्तनाच्या सारीपाटावरती एक अनवट-अनर्घ
दान पडलेच .... मला शब्द फुटले. घाटावरती जरी शेवटी तुझीयासंगे आले
माधवा.....
दिव्यत्वाचे
वान सतीचे
आज घेतले
मी हे नाथा
शांतविल
मज अग्नी तोही
अपुल्यासंगे
जाता जाता ।।१।।
गजाननाचे
चिंतन करिता
मना लागते
सदा शांतता
गजाननाच्या
या नगरीला
चिंतेने
का आली शुन्यता ।।२।।
प्रित
आपुली कुणा न समजे
कुणा न
उमजे कथा आगळी
सुखद असे
ही राई सदोदित
शांत
भासते आज भाबडी ।।३।।
घाटावरती
जरी शेवटी
तुझिया
संगे आले माधवा
काळी
कातळे आज खिन्न कां
स्मरतिल
का ही रमा माधवा ? ।।४।।
अमरप्रित
ही अमर असु दे
ईच्छा एकच
उरे राघवा
या
लाटांनी या मंत्रांनी
आशिष
द्यावे रमा माधवा ।।५।।
कधि-कधी
मनात विचार येतो की त्या गोठवणार्या थंडित ही गाथा मला का सुचावी ? आकर्षणाची अशी कोणती लाघवी घडण असावी ज्यायोगे रमा-माधव या पुष्पसंभाराभोवती मनाने भ्रमर होऊन
गुंजारव करावे ? मनास काही क्षण वाटतं ही उत्तरं शोधुन तरी मिळणार काय ? नक्षत्रांचे देणे असे सहजा सहजी फिटते काय ? आणि अट्टाहासाने उत्तरं शोधायला बसलं की कपातील संपणार्या
कॉफीसोबत उत्तरं मिळत जातात पण संम्प्रि नावाचा एक संस्कृत कवि जे म्हणतो कि, प्रश्नातज्जायते
प्रश्नं न प्राक्तुं शक्नोती उत्तरम् प्राप्तमुत्तरम् भवति प्रश्नः प्रश्नाग्रे
प्रश्न स्थित ।। हे कवण सत्य वाटु लागतं. मिळणार्या उत्तरांसोबत मनात मणभर
प्रश्नांनी दाटी होते; मग मी जरा थांबतो. न संपणार्या प्रश्नांआधी कपातली कॉफी मात्र
संपलेली असते. खिडकीच्या पडद्याशी उनाड वारा झोंबत असतो. बाहेर पावसाची रिमझिम
सुरु झालेली असते. हातातील कप टेबलाशी हलका करुन खिडकीच्या थंड पडलेल्या गजांवर मी
हात घट्ट करतो.
श्रीकृष्णार्पणमस्तु
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा